मिल्या

इंद्राणीची करणी

Submitted by मिल्या on 7 September, 2015 - 14:19

मिडीयामध्ये जिकडे तिकडे इंद्राणी धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्स अॅपवर विनोदांचा पूर आलाय. मी म्हटले आपण पण वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेऊ -

इंद्राणीची करणी ! नमू तिच्या चरणी ! मिडीया भजनी ! लागीयली

कन्येला बहीण ! जगा भासवून ! लग्ने लपवून ! कांडे केली

अंड्यांचे पक्षीण ! शेताचे कुंपण ! करीती रक्षण ! हाचि नेम

घडे विलक्षण ! मातेने वैरीण ! होऊन भक्षण ! केली शीना

सखा शामवर ! खन्नाही तयार ! प्री-प्लॅन्ड मर्डर ! केला म्हणे

पैशाची ही खाज ! पाच पतीराज ! नाही लज्जा लाज ! तीच्या ठायी

बोले मिखाईल ! कशी ही बाईल ! कॅरॅक्टर सैल ! आहे तीचे

विषय: 

वारी

Submitted by मिल्या on 4 June, 2015 - 23:48

पावसाची सुरू पुन्हा वारी
त्यास विठ्ठल जणू धरा सारी

आरशाचे सदैव का ऐकू?
एवढीही नकोच लाचारी

ह्या सुखाच्या महाग वस्त्रांचा
पोत नसतो कधीच जरतारी

आंधळी न्यायदेवता इथली
आणि सारेच देव गांधारी

मांजरासारखे अती लुब्रे
दु:ख येते पुन्हा पुन्हा दारी

दूर गेलीस खेद ना त्याचा
गंध का धाडलास माघारी?

स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी

दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी

मिलिंद छत्रे

विषय: 

रात्रीचे

Submitted by मिल्या on 10 April, 2015 - 03:34

मुग्ध एकांत, किती शांत प्रहर रात्रीचे
उलगडूयात, मऊसूत पदर रात्रीचे

दिवसभर सूर्य रुबाबात किती वावरतो
झेलतो चंद्र मुक्यानेच कहर रात्रीचे

सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे

वेदना रोज, करे संग नव्या देहाशी
पाळते मात्र तिचे पाप ... उदर रात्रीचे

दिवस काढून फणा ताठ डसे गात्रांना
आतल्या आत भिनत जात जहर... रात्रीचे

वीज कापूर, शशी ज्योत, तबक तार्‍यांचे
मेघ चौरंग, धुके धूप, मखर रात्रीचे

मिलिंद छत्रे

मी जगतो त्या आयुष्याची मजाच न्यारी

Submitted by मिल्या on 23 February, 2015 - 01:57

मी जगतो त्या आयुष्याची मजाच न्यारी
सावजही मी, मीच बाण अन् मीच शिकारी

रोज मनाच्या खिडकीवरती टकटक करतो
देह जणू हा सिग्नलवरचा कुणी भिकारी

फुटो पाहिजे तितक्या वाटा ह्या रस्त्याला
नेतीलच त्या फक्त तुझ्या अन् तुझ्याच दारी

तो आला, पोहला, पोचला पैलतिरावर
केव्हाचा अदमास घेत मी उभा किनारी

अर्ध्या रात्री जो रस्ता अंगावर येतो
अंग चोरुनी बसला असतो तोच दुपारी

अपुल्यामध्ये सेतू येईलही बांधता
पसार कोठे झाल्या पण मौनाच्या खारी

सूर्य, चंद्र, तार्‍यांची येते दया मला तर
कैद्यांना येइल का घेता कधी भरारी?

शब्दांच्या काही पारंब्या मनात रुजल्या
अर्थ कोणते बघू तरी घेतात उभारी

तू पण मी पण

Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10

विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण

रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

- मिलिंद छत्रे

ढोल

Submitted by मिल्या on 13 January, 2015 - 07:54

सांग माझे ढोल मी बडवू कशाला?
सूर्य मी आहेच तर मिरवू कशाला?

स्पर्श कर्जाऊ तिने काही दिलेले
रेशमी देणे असे चुकवू कशाला?

आत्मशोधाची कथा सांगून जाती
चेहर्‍यावरचे चरे लपवू कशाला?

जी कधीही माणसे घडवीत नाही
मी तरी मूर्ती अशी घडवू कशाला

मी तुझ्या डोळ्यांमधे आकंठ बुडतो
दु:ख मग दारूमधे बुडवू कशाला?

ठिकठिकाणी फाटले नाते जरी हे
वीण आहे घट्ट तर उसवू कशाला?

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

Submitted by मिल्या on 25 September, 2014 - 04:09

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना

मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना

विषय: 

आभाळ

Submitted by मिल्या on 2 July, 2014 - 07:30

काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं.
त्याला पाहून माझा आनंद गगनात मावेना.

मी भारावून त्याच्या पाया पडलो.... त्यानेही माझ्या पाठीवरून हात फिरविला.

उभ्या अंगातून एक वीज सळसळत गेली...
पण ही वीज जाळणारी नव्हती तर उबदार होती...
अगदी गुलजार साहेबांच्या एखाद्या तरल कवितेसारखी.

मंत्रमुग्ध अवस्थेत मी चाचरतच आभाळाला म्हटलं, " माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण..."

आभाळ प्रेमळपणे हसलं अन् म्हणालं, " अरे बाळा, ... पाऊस कधी खालून वर जातो का? "

असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या मुलायम हातात घेतला, गालावर प्रेमाने थोपटलं आणि एक पाऊस मला भेट म्हणून दिला.

सखे तुझ्या केसांमधले

Submitted by मिल्या on 14 April, 2014 - 07:02

सखे तुझ्या केसांमधले गजरे दरवळतात किती
जीभ, कान, डोळे माझे नाकावर जळतात किती

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

विषय: 

माझे तुझे नाते कसे?

Submitted by मिल्या on 20 February, 2014 - 05:25

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे

झिडकारले त्यांनी मला
कवटाळले मी आरसे

मी सत्य साधे बोललो
धावून आली माणसे

रडलो जगासाठी जरा
झाले जगामध्ये हसे

मिळताच टाळ्यांची गुटी
धरले अहंने बाळसे

सोयरसुतक का बाळगू?
हा देह तर माझा नसे

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे

अश्रूंस ओहोटी तरी
डोळ्यातले मिटले ठसे

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मिल्या