दिव्य सोहळा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 June, 2025 - 01:58

पुन्हा तोच ध्यास, परमसुख आस
वेड पंढरीचे लागे पावला, पावलास
बरसला मेघ कृपाळू, दयाळू सावळा
मिटे भूक, तहान जाता पंढरीस

गाव, गाव झाले जागे, पीसे मनमानसी
लागिरले मन, भारलेले तन विठूरायाने
घेऊनीया नेसूचे, धावे जो तो पंढरीसी
सांडीला संसार गळाले देहभान वेडाने

घेरला आसमंत, दिंड्या, पताकांचा भार
तरारले माळ, दुमदुमले रान नामघोषी
नाचती पाने, नाचताती फुले वाटेवर
वेड्या तनमनात युगा युगांची बेहोशी

प्रेम परीमळ, टीळा चंदनाचा
हवेत हुडदंग रंग सावळ्याचा
भारावल्या वाटा, बदलती दिशा
ध्यास लागे त्यांसी पंढरीचा

मेळा वैष्णवांचा, चित्ती परमानंद
युगे अठ्ठावीस पांडुरंगी छंद
असा दिव्य सोहळा नाही वैकुंठीही
कौतुक करण्या गेला दंगुनी मुकुंद

© दत्तात्रय साळुंके
२४-५-२०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली.
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... ची आठवण झाली.

urmilas
केशवकूल
रूपालीताई
ममो
निकु
चेराज
कुमार सर
asp

खूप धन्यवाद..