निळी रेशमी फीत नक्षीली
आसमंताची झाकते लाली
पुन्हा हवेत लहरत जाते
कोकिळेची शीळ गोडुली
त्या देशाचा सुगंधित वारा
परिमळतो किरमिजी बनातून
कोवळाईचा बहर पाहतो
उमलणार्या वेलींची स्वप्ने
तरूणाईच्या ऋतूचा सोहळा
क्षितिजाच्या सीमेवरती
आम्रवृक्षाच्या छायेमधे
पौर्णिमेच्या भरतीसंगे
दर्यासारखा फुलून येतो !
कुठेतरी दुरूनी कानी येते
मंद लकेर वीणेची
वसंता
तू आहेस ना ?
तुझा गंध,
तुझा स्पर्श
तुझी जाणिव
तुझा बहर
माझ्या
रंध्रांना
गात्रांना
संवेदनांना
रोमांचित करतो
तुझ्या अस्तित्वाने
प्रफुल्लित होतात
सर्व चेतना
तुझ्या निळ्या रेशीमफिती
पुन्हा हवेत लहरताना
गोड शीळ घालत
कोकिळ पक्षी
चिरपरिचित सुगंध घेऊन
माझ्या कृश खांद्यावर गातोय
तुझेच रंगीत गाणे
मंद वीणेची लहर म्हणते
ऐकतेस ना ?
वेशीवर शुभ्र फुलांच्या माळा घेऊन
येतेस ना ?
स्वागतगीत गाण्यासाठी
सज्ज होतेस ना ?
कोवळाईच्या भिरभिरी स्वप्नांच्या
रांगेतून वाट काढत
एक वेडा निळा फकीर
मंत्र म्हणत जातो
चरैवेति चरैवेति
वीणेची मंद लहर
त्याच्या एकतारी मधे
विलीन होत जाते
विरघळवत राहते
अस्तित्व आपले
निळ्या रेशमी नक्षिल्या फिती
आणि स्वप्ने सुगंधी
आणि
खुद्द वसंताचे निळे पक्षी
येतात नि जातात
कोकिळेचं गाणं बदलत जातं
चरैवेति चरैवेति
ऋतू कूस बदलून येतो
शिशिराची धूसर सांज उजाडते
कधी न कधी
मावळतीच्या उंबर्यावर
भगवी कोकिळ गात राहते
चरैविति चरैविति
( एक जर्मन कविता खूप वर्षांपूर्वी वाचनात आली होती. सौमित्रची "ऋतू चक्क डोळ्यांसमोर कूस बदलत जातो ही ओळ ऐकताना ती अंधुकशी आठवली. आठवायचा प्रयत्न करताना पुढ्यात ही कविताच येऊन उभी राहिली )
खूपच सुंदर.
खूपच सुंदर. चरैविती रैविती म्हणजेच तो दुसरा शब्द कोणता? - चक्रिणेनिमिक्रिणे का काही तरी.
'चरैवेति चरैवेति' असं आहे
'चरैवेति चरैवेति' असं आहे बहुतेक..
पुनर्वसु , आभार
पुनर्वसु , आभार
अनिरुद्ध , चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. __/\__