हेगलच्या नावाने बोंब हाय;
कान्ट तुला मार्क्स कधी कळणार न्हाय.
कामू-सार्त्र ची भांडी धुते,
ती बी धारावीची रमाबाय.
आरथिक-मंदीचा ह्या कारण काय?
खालती डोकं वरती पाय.
क्रांतीची बती म्होरना येती,
पायाने जरी ती गोगलगाय.
शहीद घोगरे तुझ्या पिंडीला,
कोरटाचा न्याय शेवटी शिवलाच न्हाय.
[ऑगस्ट २०२४]
(मूळ इंग्रजी कवितेचा अनुवाद)
साय तिच्या त्वचेतून पाझरत राहिली.
किळस तिच्या चेहऱ्यावर वावरत राहिला.
अंधकार – ज्याने तिचे आयुष्य झपाटले होते –
तिच्या पापण्यांखाली घट्ट तो बंदिस्त राहिला.
पैसा बेरहम, तिच्या ओठांवर हसण्याची बळजबरी —
तिच्या शरीरावर माझी मालकी, दीड तासभरासाठी;
तिच्या कत्तलेची माझी जबाबदारी, दीड तासभरासाठी;
दोन बोटांनी मानेखाली अलगद खुपसले आणि,
दूध घळघळा वाहून गेले, दीड तासभरासाठी.
मला ब्लॅक-होलं मधला सूर्य दिसू लागला होता त्या वेळेची गोष्ट …
बेंबीच्या देठातून अल्लाहला दिलेल्या यातनेचा अस्मान चढलेला स्वर, कोकीळ उतरवणार होता.
शतकानु शतकांच्या वाटेचे रक्ताने बरबटले पाय स्वच्छ धुऊन निघाले होते;
भविष्यांच्या मेंदूतील जाळी-जळमटे अदृश्य होणार होती.
वर्षानुवर्षांचे नागडे प्राण पांघरलेली भूकेली जठरे पंचपक्वानांचा स्वाद हुंगत होती.
भाईचार्यांच्या वायद्यांचा दबदबा होता;
अजरामर चुंबनाची प्रदर्शने देऊन अबसोल्यूट माणुसकीची प्रात्यक्षिके आयोजित केलेल्या शो ची,
सारी तिकिटे विकली गेलेली होती.
माझ्या हृदयाला पालवी फ़ुटायचीच होती,
पावसासारखे तिचे येणे फक्त निमित्त झाले कदाचित.
आता ही वर खाली आडवी तिडवी पसरलेली हिरवळ;
हृदयाच्या चारही भिंतींवर शेवाळे माखलेली हिरवळ;
धो धो बरसण्यारा ढगालाही गिळू पाहणारी उंचगिरी हिरवळ;
तिला आवरण्याचे सामर्थ्य माझ्यात उत्पन्न होऊ शकेल का?
तिची न माझी वाट ही कधीच न जुळणारी;
जुळूनही कदाचित मिसळू न शकणारी;
हे ठीक आहे, असेच चांगले आहे.
तोपर्यंत दोन-चार दिवस तरी फुलांची शेती करावी म्हणतो;
नंतर तिच्या आठवणीचा श्रावण-झेंडाही मिरवता येईल कदाचित.
[सप्टेंबर २०२२]
आदि शंकराचार्यांनी केलेल्या ’परापूजा’ ह्या अतीव सुंदर संस्कृत रचनेचा समश्लोकी मराठी भावानुवाद (सुमंदारमाला वृत्तामध्ये).
++++++
मूळ रचना:
अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरुपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ।।
पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुत: ।।
निर्मलस्य कुत: स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् ।।
निर्लेपस्य कुतो गन्ध: पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलन्कारो निराकृते: ।।
तेजोमय आकाशदीप हा
प्राचीवर लाविला कुणी
किरणांची आरासही पहा
रंगावली जणु नभांगणी
भल्या पहाटे गात भूपाळी
विहग विहरती वनोवनी
वृक्ष लेवुनी तिलक कपाळी
कृतार्थ होती मनोमनी
दाही दिशांना गुलाल उधळुनी
लीन मेघ शरदाच्या स्तवनी
पाही कौतुके दीप उजळुनी
सरिता ती जलदांची जननी
इच्छा धरिते एक इथेची
दिपावली ही सृष्टीची
कथा सरावी दुष्काळाची
व्यथा नको अतिवृष्टीची
शाश्वत करण्या मार्ग आपुला
साथ हवी ऋतुमानाची
तिमिर भेदण्या अज्ञानाचे
ज्योत हवी विज्ञानाची
"कवितेचं पान" या मधुराणीताईने चालवलेल्या नितांत सुंदर चॅनेलवर एक आशयघन कविता ऐकायला मिळाली. रश्मी मर्डी या कवयित्रीने सुरेख लिहिलीये, आणि गायलीयेही फार अप्रतिम. नक्की ऐका -
"तुला भावणारी" - रश्मी मर्डी (https://youtu.be/DVe2EKZS1nA?t=94)
तुला भावणारी अशी रोज नवखी कशी होत गेले मला ना कळे
किती यत्न केले तुला जिंकण्याचे तरी ना कसे रे तुला आकळे
तुझ्या जाणिवांना जपावे किती सांग मी रोज आतून कोमेजते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते
मावळत्या शुक्रामागुन
मधुरात्र लाजरी येईल
किरणांना खेळायाला
दंवबिंदू देऊन जाईल
चांदवा - प्रियाचा भास!
बरसेल सखीची प्रीत
हेव्याने धरणी लाविल
चंद्राला काजळतीट
वाळूवर लपलप लाटा
सा-याच खुणा पुसतील
उमटेल पुन्हा आशेने
कधि पाउल संयमशील?
थकलेली पिवळी पाने
गळतील तळ्याच्या काठी
आरक्त-धवल शोकाकुल
प्राजक्त मूक सांगाती
तुज अलगद आठवताना
मन गवतफुलांचे होईल
हुरहूर - मधाचा ठेवा!
त्या फूलपाखरा देईल
* दिली पावसाने हाळी *
दिली पावसाने हाळी
रोमांचले रंध्र रंध्र
धरा कस्तुरीचा फाया
पसरला मृदगंध...
दिली पावसाने हाळी
ऊब भिनली गात्रात
नखशिखांत शहारे
मोती नदीच्या पात्रात...
दिली पावसाने हाळी
पिसाटला रानवारा
ओले घरटे; पाखरू
शोधी आडोसा निवारा...
दिली पावसाने हाळी
हरखल्या वृक्ष वेली
पोरसवदा धरती
आज न्हातीधुती झाली...
चिंब पावसात सखी
उभे निथळे लावण्य
मन भरतीची लाट
देह पेटले अरण्य...!
***
मरगटलेला वृक्ष होतो मी
तू चैत्राची पालवी होतीस
आज पुन्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस..
पाणी नव्हते घोटभर जिथे
तू पावसाची धार होतीस,
दुःखाच्या पुरात बुडताना
तूच माझा आधार होतीस,
दुःखात जीवन कंठत होतो
तू सुखाची चावी होतीस,
आज पून्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस..
वाट चूकलेला वाटसरू मी
तूच माझी दिशा होतीस,
वाट तापली उन्हानं तेव्हा;
तू थंडगार निशा होतीस,
जूनाटलेल्या मनास माझ्या
तू झळाळी नवी होतीस,
आज पुन्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस...