पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे
पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९
मिहीरातूनी वर्षासरी
भरभरून बरसताना
थेंब न् थेंब ती पिते त्वचेने
मुखावर अलवार झेलताना
जलधारांचा स्पर्श असा
अतृप्त करून सोडणारा
अनुभवला जरी कितीही
तरी हवाहवासा वाटणारा
भिजण्यात चूर ती असताना
नभ ते निरभ्र होई
निष्पाप त्या नयनात तिच्या
अवघी नीलिमा येई
अन् मग ती त्या नभास पुसते
थांबलास का रे असा अचानक
बरसशील का पुनः एकदा
मन तृप्त नाही झाले अजून
मिहीरातूनी वर्षासरी
भरभरून बरसताना
थेंब न् थेंब ती पिते त्वचेने
मुखावर अलवार झेलताना
जलधारांचा स्पर्श असा
अतृप्त करून सोडणारा
अनुभवला जरी कितीही
तरी हवाहवासा वाटणारा
भिजण्यात चूर ती असताना
नभ ते निरभ्र होई
निष्पाप त्या नयनात तिच्या
अवघी नीलिमा येई
अन् मग ती त्या नभास पुसते
थांबलास का रे असा अचानक
बरसशील का पुनः एकदा
मन तृप्त नाही झाले अजून
चिरतरुण
तो येतो दारावर परिचित दस्तक देत
मी दार उघडतो
बघतो तर हा चिरतरुण, नखशिखांत
ओलाचिंब
कानात अत्तराचा फाया, नजरेत नशीला सुरमा , पायात मस्तवाल मोराची चाल, ओठावर थेंबांची सरगम
मला म्हणतो चल
मी म्हणतो वय झाले सर्दी होईल
तो खट्याळ पोरासारख्या उड्या मारतो
छपरांवर , पागोळ्यांवर, रस्त्यावर
बघता बघता वयात येतो
छत्रीतून जमेल तशी अंगचट करतो
कधी व्रात्यपणाने छत्री उडवतो
बागेतला ओलेता प्रणय पाहतो
थेंबात प्राण ओतून तिला चुंबतो
नशेत भेलकांडत केसातून
पाठीवर रोमांच रेखतो
रिपरिप (मुक्तछंद)
तुझे बंद ढगाळ डोळे अन्
त्यांतून सरणारा पाऊस
आता ओळखीचा झालाय.
पण एक खरं सांगू का,
पावसाच्या अमाप सरींनंतर
तुझ्या ओठांवर पडणारं,
फिक्कट गुलाबी इंद्रधनु,
मला खरंतर जास्त आवडतं!
तुझ्या मनाच्या या आभाळाला
कुठला असा काठच नाहीये!
अपरिमित अथांग आहेस तू.
म्हणून कधीकधी अवघड जातं
तुझं मन पूर्ण समजून घेताना.
फेसाळत्या अथांग समुद्रालाही
कुठेतरी किनारा लागून असतो.
त्यामुळं तू सागराहून गूढ आहेस.
पावसाविषयी असूया
पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले
गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग
पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली
ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला
गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले
पाषाणभेद
०७/०७/२०१९
नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस
धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस
झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस
कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस
हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस
अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस
ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस
गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस
- पाभे
३०/०६/२०१९
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!