कुणी वसंता केले?

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 April, 2025 - 07:18

लकाकली चैत्र गुढी
केलं ऊन्हानं हो न्हानं
थंडाव्याला शिरी धरी
कडू लिंबाचं वं पान

आक्रसली जलाशये
माती उन्हानं तापली
लाही, लाही, जीव, जीव
करी सावली आपली

ऊन झळा बोलबाला
जीव जीव हो कावला
आम्र वृक्ष डहाळीत
गाणं कोकीळ गायला

अंग अंग शहारले
पान पान मोहरले
वृक्षवृक्षी हर्ष दाटे
कुणी वसंता हो केले?

फुलं, फळांची परडी
आला ऋतुराज दारा
जेव्हा माणसाच्या अंगी
खा-या घामाच्या हो धारा
खा-या घामाच्या हो धारा
© दत्तात्रय साळुंके
१४-४-२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो खूप खूप धन्यवाद , खूप काळाने सवांद साधला बरं वाटलं.
केशवजी लेखणी वसंतासाठी रुसली होती. असो खूप खूप धन्यवाद. मलाही तुमच्याशी संवाद साधता आला त्या निमित्ताने. तुम्ही कसली वाट बघताय? का तुमचं असं होतंय का
कुणी जाल का ,सुचवाल का त्या कोकिळा.... Happy

छान कविता!

आंब्याच्या डहाळीत = ७

बेफी...
अनेकानेक धन्यवाद प्रतिसादासाठी आणि दुरूस्ती साठी...

सुंदर वर्णन..
गाणं कोकीळ गायला... हे अगदी योग्य.

फार फार सुंदर कविता!

वरती स्वयम् ऋतुराज तुम्हाला प्रतिसाद द्यायला आला आहे. Happy

गाणं कोकीळ गायला... हे अगदी योग्य >> इथेही कोकिळ वि. कोकिळा वादात कोकीळची बाजू घेऊन वन्यजीवशास्त्र मध्ये आणलं गेलं आहे अध्यक्ष महोदय. Wink

छान!

हपा
मुजरा घ्या... Happy
मला वाटतं मी कोकिल पासून तयार झालेला तद्भव कोकिळ ऐवज कोकीळ लिहिले का? चुकले असेल तर दुरुस्त करतो. तुमच्या व्याकरणाच्या अफाट ज्ञानावर माझी नितांत श्रध्दा आहे.
कोकीळ ची बाजू घेऊन.....समजलो नाही. जरा समजवा. Happy

नाही हो, व्याकरण म्हणून नाही... मी पण कदाचित चुकीचा लिहिला असेल तो शब्द.

वसंत ऋतूत गाणारा पक्षी हा कोकीळ की कोकिळा ह्यावर वाद होतात, त्यात कोकीळ हे उत्तर योग्य आहे असं तज्ज्ञ सांगतात. बऱ्याच इतर मराठी हिंदी वगैरे काव्यात कोकिळेला गायला लावलेलं आहे. पण तुम्ही योग्य निवड केलीत असं ऋतुराज वरती म्हणालेत. मी फक्त त्यांना उद्देशून (आणि डोळा मारून) म्हणत होतो की कवितेचा आस्वाद घेता घेता त्यांच्यातल्या वन्यजीव अभ्यासकानेही अभ्यासू मत जाता जाता दिलं आहे. Happy

>>>त्यात कोकीळ हे उत्तर योग्य आहे असं तज्ज्ञ सांगतात.>>>> असं शिकायला मिळतं म्हणून मायबोलीकर, सुज्ञ जाणकार आहेत याचं कौतुक वाटतं. Happy

मनीमोहोर खूप धन्यवाद .

ऋतुराज शास्त्रशुद्ध प्रतिसाद आवडला. धन्यवाद .

कुमारसर पावलो.

अनन्त_यात्री अनेकानेक धन्यवाद.

केशवजी, हपा पुन्हा एकवार धन्यवाद.

शशांकजी खूप धन्यवाद..

सामो खरं आहे. पुरुषांनी शिकण्यासारखं आहे. अगं ऐकलं का असं उध्दटासारखं म्हणू नये तर प्राणेश्वरी इकडनं जरा ऐकनं होईल का म्हणावं. Happy
>>>ती तर कावळे मामाला कामाला लावते,>>>एकटा नवरा किती काम करणार. दया येत असेल. कावळा ते आनंदाने करतो, स्री दाक्षिण्य. Happy
तुमची कामं नकळत इतरांकडून करून घ्यावीत. स्पेशल स्कील Happy
फार‌एण्ड अनेकानेक धन्यवाद....