पावसा तुझा रंग कसा

Submitted by ज्योती पाठक on 24 June, 2011 - 12:08

अमावस्येची अंधारी रात्र, बाहेर मिट्ट काळोख. अचानक कडाडणार्‍या विजा, आपलेच पाऊल वाजले तरीही दचकायला होइल अशी निरव शांतता आणि मग त्या गूढ वातावरणात आणखीनच भर घालत सुरु झालेला पाऊस...

भर दुपारी लागणार्‍या उष्ण झळा, कातडी रापुन टाकणारा आणि घशाला कोरड पाडणारा शुष्क उन्हाळा, माळरानामधे असलेला रखरखाट, प्राणी आणि पक्षी पाण्यासाठी व्याकुळ होवुन दाही दिशांना पाण्याच्या शोधार्थ भटकत आहेत. शेतकरी मोठ्या आशेने आभाळाकडे नजर लावुन बसला आहे. अचानक आभाळ दाटून येते. ढग गडगडायला लागतात. आणि मग सुरु होतो मुसळधार पाऊस....

तिच्या आठवणीने झुरणारा तो. तिला भेटून किती महिने, किती वर्षे झाली याची गणिते आजही त्याच्या मनात धिंगाणा घालत आहेत. तिच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण आज डोळ्यापुढे येत आहे. खिडकीसमोर उभा राहुन तो बघतोय खरा, पण मनात तिच्याच आठणींनी फेर धरला आहे. एकाएकी ढग भरुन आले आहेत.त्याच्या मनात तिच्या आठवणींचे ढग दाटून आले आहेत.आणि एकदम समोरच्या खिडकीत ती दिसते. हे कसले भास होऊ लागले आहेत म्हणून पहिल्यांदा तो दुर्लक्ष करतो, पण तेव्हढ्यात तीच त्याला हात करते. आता हे स्वप्न आहे की सत्य हे न कळल्यामुळे तो वेडापिसा झाला आहे.आणि जणूकाही त्याला "अरे हे सत्य आहे , तुमच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार मीच होतो आणि आता या भेटीचा देखील मीच आहे" असे सांगुन भानावर आणण्यासाठी सुरु झालेला तो मुसळधार पाऊस....

एक छोटसं झोपडीवजा घर. आतून कोणाच्यातरी कण्हण्याचा येणारा आवाज. बाहेर काही चिंताग्रस्त नातेवाइक काळजीने येरझारा घालत आहेत. आयुष्यभर खूप केलं हो या बाईने सगळ्यांचे, आणि आता कुठे सुखाचे दिवस आले आहेत तर हे आजारपण... असे काहीतरी बोलल्याचे ऐकू येत आहे. तिचा मुलगा डॉक्टरने दिलेली औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडला आहे. आज आपल्या आईला वाचवण्यासठी द्रोणागिरी देखील उचलुन आणण्याची त्याची तयारी आहे.मनात काळजीने काहूर मांडले आहे, आणि पाय आईच्या ओढीने घराकडे धाव घेत आहेत. दूर कुठेतरी गाण्याच्या ओळी ऐकू येत आहेत:
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता....
त्याच्या मनाचा बांध आता मात्र फुटलेला आहे.घर आता दृष्टीपथात आले आहे, आणि त्यावर पसरलेले उदासीचे सावट त्याचा डोळ्यातुन सुटलेले नाही. आतून रडण्याचा आवाज येत आहे.आता हे ऐकू येत असलेले गाणे आपलं आयुष्यच बनलेले नाही ना.. असा विचार त्याचा मनात येवून जातो. आणि मग सत्याला समोर जाता जाता सुरु होतो मुसळधार पाउस....

आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगात बेमालुम पणे मिसळून गेला आहे हा पाऊस. नक्की कसा आहे हा पाऊस? आनंदाने बरसणारा, दु:खात बुडुन गेलेला, romantic की ज्याचा थांग लागत नाही असा गूढ...
खरं तर मला असे म्हणावेसे वाटते, "पावसा तुझा रंग कसा, ज्याला जसा दिसेल तसा." आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावनेशी एकदम समरस झालेला आहे हा पाउस. आपल्या मनातील प्रत्येक भावना अशा उलगडुन दाखवतो की तोच त्या भावना जगतो आहे असं वाटतं.
लहान मुले त्याला "येरे येरे पावसा" म्हणुन साद घालतात, तर एखाद्या प्रेमात पडलेल्या प्रियकराला तिच्यामध्येही पावसाचाच भास होतो आणि तो म्हणतो:
कधी तु कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात...
असा हा पाउस लहानांपासुन मोठ्यांना सर्वांनाच आपलासा, अगदी आपल्याच वयाचा वाटतो. जसे कुठलेही कार्य देवाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही, तशी आपल्या मनातली कोणतीही आठवण पावसाचा ओलावा लागल्याशिवाय पूर्ण होउच शकत नाही.

पृथ्वीच्या सौंदर्याचा शिल्पकार आहे पाऊस, सर्व ग्रहांमधे पृथ्वीला जे वेगळेपण प्राप्त झाले आहे ते पावसामुळेच.सजीवांच्या जीवनाचा एक आवश्यक घटक आहे हा पाऊस. Evolution theory मधला सर्वात महत्वाचा element. कधी तो तहान शमवणारा आणि अन्न मिळवुन देणारा असतो, कधी मुलात मुल होवून बरसतो, कधी एकाकीपणात हुरहुर वाढवतो, कधी तो धीर गंभीर असतो, तर कधी २६ जुलै च्या पावसा सारखा थैमान घालणारा आणि कत्तल करणारा निर्घुण बनतो.

कृष्णाची जशी अनेक रुपे आहेत; नटखट, गूढ, सावळा पण तरीही सुंदर, निर्गुण-निरंकार,कुठल्याही आकारात आणि बंधनात न बसवता येणारा. हा कृष्ण आपल्याला कळलाय असं वाटुनही कधी कधी न कळलेला.अगदी तसाच आहे हा पाऊस. सर्व जगाला त्याने व्यापून टाकले आहे आणि सर्व मनांना सुद्धा. त्याला रंग रुप आकार काहीच नाही पण त्याचं अस्तित्व मात्र सर्वांनाच जाणवतं.आपल्याला तो खूप जवळचा आणि ओळखीचा वाटतो, आणि मग कधी कधी जाणवत की आपल्याला अजून तो पुरता कळलेलाच नाही आहे म्हणुन.विशेषतः आपल्या हवामान खात्याला तरी नक्कीच असे वाटत असणार. Happy
इतकी वर्षे हा पाउस बरसतो आहे, त्याची असंख्य रुपे दाखवतो आहे. तरीही आपल्याला तो पूर्ण कळलाच नाही आहे म्हणूनच बहुतेक तो असाच बरसत रहाणार आहे. आणि आपल्या सुख-दु:खात सामील होत जगाच्या अंतापर्यंत तो आपल्याला थोडा थोडा कळतच रहाणार आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: