पाऊसगाणी

Submitted by सागर कोकणे on 28 July, 2011 - 09:33

जुलै महिना सुरु झालाय आणि पाऊस आता मुक्तहस्ताने बरसू लागलाय. उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीस तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदसोहळा सुरु झाला. पावसाच्या ओघानेच मग पाऊसगाणीही साऱ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली. कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. म्हणूनच पाऊसगाण्यांनी भिजलेला हा ओला लेख.

पावसाचे वेड तर तसे सगळ्यांनाच आहे आणि तसेच पाऊसगाण्यांचेही. पण ब्लॉग मराठी असल्याने आणि मराठी भाषेवर आणि संगीतावर हिंदीहून जास्त प्रेम असल्याने आज केवळ मराठी पाऊसगाणीच ऐकुया. पावसावर कविताही असंख्य लिहिल्या गेल्यात पण त्यांची संख्या आणि उपलब्धता पाहता त्याच्यावर लिहिणे फारच कठीण आहे. म्हणून आपल्या आवडीची, मनोमनी रुजलेली व काही नवी पाऊस गाण्याची मैफिल आज ब्लॉगच्या दरबारी सादर करीत आहे.

बालपणीचा पाऊस म्हटला कि सर्व प्रथम आठवणारे बालगीते म्हणजे -'येरे येरे पावसा...'ज्या कुठल्या मराठी कुटुंबात हे गाणे पावसाकडे पाहून पालकांनी आपल्या चिमुकल्यांस शिकवले नसेल ते मराठी कुटुंब नाही. बालगीतांमध्ये आणि खास करून पाऊसगाण्यांत हे गाणे म्हणजे सगळ्यात पहिल्या क्रमांकावर...त्या शिवाय 'नाच रे मोरा' आंब्याच्या वनात आहेच. या गाण्यावर लहान मुलांसकट सगळेच गाण्याच्या तालावर नाचू शकतात इतके गोड गाणे आहे. काही जणांना माहित नसेल पण हे गाणे पु.ल.देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे.लहानांसह लहान होऊन नाचण्या-गाण्याची गंमत पुलंनाही कळली ती अशी. शाळेत जायला निघालो आणि बाहेर पाऊस सुरु झाला की मग' सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?' असे गाणे गावेसे ही वाटले आणि मग 'शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?' अशी स्वप्ने पाहणे हे त्या वयात 'शाळेला सुट्टी म्हणजे काय मोठी गोष्ट' वाटायचे...आणि सुट्टीच्या दिवशी पाऊस पडला की ' ए आई मला पावसात जाऊ दे...' असा हट्ट धरणारी मुले आणि आईचा डोळा चुकवून भिजल्यावर पाठीत धपाटे खाणारी मुले यांनाच काय ती पावसात भिजण्याची गंमत कळली. बाकीची मुले केवळ छत्र्या आणि रेनकोट मधून भिजली आणि ती ही नाईलाज म्हणून...

बालपण ओसरले तरी पाऊस मात्र ओसरत नाही. तारुण्यात नव्या रंगात, नव्या रुपात तो बरसू लागतो आणि मग लहानपणीची अल्लड, खेळकर पाऊसगाणी सोडून प्रेमाचे सूर आळवू लागतो. तारुण्यात जिथे-तिथे हिरवळ शोधणारे मन निसर्गाच्या हिरवळीकडे पाहून अजूनच खुलते. मराठीमध्ये तरुणाईला ज्या गाण्यांनी शब्द-सुरातही ओले चिंब केले असा अल्बम म्हणजे 'गारवा'. सौमित्रच्या शब्दांनी नटलेली आणि मिलिंद इंगळे यांच्या स्वरांनी आणि संगीताने सजलेली सदाबहार गाणी यांनी गारवा म्हणजे पाऊस आणि तरुणाई यांचे समीकरण झाला.ज्यांना पाऊस आवडत नाही किंवा ज्यांना गाणी आवडत नाही असेही लोक या गाण्यांच्या माध्यमातून मनसोक्त भिजले. गारव्यानंतर लगोलग 'सांज गारवा' ही आला. अजून पावसात भिजण्याच्या स्मृती वाळल्याही नव्हत्या आणि हा जणू सायंकाळी आकाशी इंद्रधनू बनून साकारला. पुन्हा सारेच तृप्त, शांत आणि कानात घुमत राहिले ते काही पावसाचे आवाज. गारवा आणि सांजगारव्याने तरुणाईला प्रेमात पडायला शिकवले. यातील प्रत्येक गाणे खास पाऊस पडत असतानाच ऐकले जावे. ही गाणी उन्हाळ्यात ऐकण्यासारखी नाही. ती लिहिली गेली ती पावसासाठीच आणि पावसावर प्रेम करणाऱ्यांसाठी. काही वर्षांपूर्वी आलेला 'गंध गारवा' हा अमोल बावडेकर याचा अल्बम ही छान आहे पण त्यास फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर पावसाची वेगवेगळी रूपे दाखवणारी गाणी यात ऐकायला मिळतील.

मराठीत आधीही बरीच सुंदर पाऊस गाणी रचली गेली आहेत. त्यातील बरीचशी तर मंगेशकर कुटुंबियांच्याच नावे आहेत. गर्द रानात भटकंतीला गेल्यास आणि पाऊसही सोबतीला असल्यास ना.धों. महानोरांचे 'चिंब पावसानं रान झालं' हे गाणे गुणगुणतच कित्येक भटक्यांनी ओल्या पायवाटा तुडवल्या असतील. त्यांच्याच शब्दांत पुन्हा 'घन ओथंबून येती' आणि लतादीदींच्या स्वरांसवे बरसती. लतादीदींप्रमाणेच आशाताईंनीही एकाहून अनेक सुंदर पाऊस गाणी गायली आहेत.' झुंजुर मुंजुर' पावसात भिजता भिजता 'सोसाट्याच्या आला वारा' अन 'भिजुनिया देह चिंब झाला' आणि त्यासाठी खऱ्याखुऱ्या पावसात भिजायची ही श्रोत्यांना गरज भासली नाही. याच गाण्याचे अजय-अतुल मधील अजय गोगावले यांच्या आवाजात एक नवे गाणे ही रेकॉर्ड करण्यात आले आहे. नव्या चालीत बांधलेले हे गाणे मूळ गाण्याहून मुळीच कमी नाहीये.

पावसावर द्वंद्व गीते फार कमी लिहिली गेलीत. त्यातील एक सुंदर गाणे म्हणजे बाबूजी आणि आशाताईंच्या आवाजातील 'पावसात नाहती'.पाऊस आणि प्रेम यांचे अतूट असे नाते आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात पाऊसही वेळ साधून आला तर शब्दांची माळ गुंफण्यास इतके निमित्त पुरेसे आहे..

पाऊस म्हणजे बहुतेकदा प्रेमी युगुल किंवा नुसतेच पावसाचा आनंद व्यक्त करणारे गाणे असते. याला अपवाद ठरणारी ही काही गाणी आहेत जसे -ग्रेस यांनी लिहिलेले 'पाऊस कधीचा पडतो'. याशिवाय 'ती गेली तेव्हा' हे हृदयनाथजींच्या आवाजातील गाणे तितकेच हृदयद्रावक. काहीशा गंभीर स्वरूपाची हि गाणी ऐकताना आपण अंतर्मुख होऊन जातो.

श्रावण महिना हा तर सगळ्यांचा लाडका. कवी आणि गीतकारांनीही या महिन्याचे वेळोवेळी गुणगान गायले आहे. 'श्रावण आला ग वनी' म्हणत कधी आशाताई त्याचा दरवळणारा गंध आपल्या पर्यंत पोहोचवतात तर 'झिमझिम झरती श्रावणधारा' म्हणत सुमनताई 'प्रियाविन उदास वाटणारी रात' गातात. उषाताईंनीही 'पाऊस पहिला जणू कान्हुला' म्हणत पावसाचे स्वर आळवले आहेत. पण श्रावणाचे सगळ्यात सुंदर वर्णन कुठल्या गाण्यात आले असेल तर ते म्हणजे मंगेश पाडगावकरांचे 'श्रावणात घन निळा बरसला' या गाण्यातून. खळेकाकांच्या जादुई संगीताने नटलेले आणि त्यात पुन्हा लतादीदींच्या मोहून टाकणारा स्वर म्हणजे अगदी 'दुग्ध शर्करा' आणि असेच बरेच काहीसे योग इथे जुळले आहेत. प्रत्येक ओळीतून श्रावण असा सांडला आहे की बस्स...

काही वेळेस संगीतकाराच्या हातून असे काहीशी किमया घडते की केलेल्या सर्व कलाकृतींना सुवर्णस्पर्श लाभावा जणू. 'ऋतू हिरवा' मध्ये श्रीधर फडके यांनी ती किमया केली. इतर वेळेसही श्रीधरजींनी सुंदर चाली दिल्या पण या अल्बम मधील गाण्यांची बात काही औरच. आशाताईंनी तर वेडेच करून सोडले श्रोत्यांना. 'ऋतू हिरवा' असो की 'घन राणी'- आशाताईंनी कमाल केली आहे. आशाताईंचे अजून एक सुंदर गाणे आठवते ते म्हणजे -'नभ उतरू आलं' आदिवासी पाड्यातील रानामाळातले चित्रीकरण आणि त्यावर हे गाणे...अहाहा...' ये रे घना...ये रे घना...न्हाऊ घाल माझ्या मना...' म्हणत आपणही त्यांच्यासह गाऊ लागतो.

पाऊसगाण्याची भुरळ आजच्या नव्या गीतकार आणि संगीतकारांस ही पडली आहेच. नवी-नवी पाऊस गाणी नव्या पिढीस नव्या पिढीकडून ऐकायला मिळत आहेत. 'आईशप्पथ' चित्रपटातले 'ढग दाटुनी येतात' हे पुन्हा एकदा सौमित्रलिखित पाऊसगाणे अशोक पत्कींनी संगीतबद्ध करत त्यांच्या 'चिर'तरुण संगीताचा पुरावा दिला आहे. एरवी लोककला आणि आधुनिक संगीत यामध्ये अधिक रमणारे अजय-अतुल यांनीही 'चिंब भिजलेले रूप सजलेले' या गाण्यातून प्रणयधुंद पाऊसगाणे रसिकांना भेट दिले आहे. नायक आणि नायिका यांच्यावर चित्रपटात पाऊस गाणी चित्रित करणे म्हणजे हमखास प्रसिद्धी मिळणार असे असले तरी ते गाणे तितके सुंदर नसेल तर ते केवळ प्रेक्षणीय होते पण श्रवणीय होत नाही. 'इरादा पक्का' मध्ये निलेश मोहरीर यांनी केलेले 'भिजून गेला वारा' हे गाणे या दोन्ही अटी पूर्ण करते म्हणून नव्या पाऊस गाण्यात त्याचा विशेष उल्लेख.

नव्या पिढीचा लाडका संगीतकार अवधूत गुप्ते यांचे पावसावर जरा अधिकच प्रेम आहे म्हणून त्यांनी 'पाऊस' या नावाचा खास अल्बम केला आहे. वैशाली सामंत यांनी गायलेले 'अंगणी माझ्या मनाच्या...' हे सुंदर गाणे तसेच अवधूत यांच्या आवाजातील 'थेंबभर तुझे मन...' हे संथ लयीतून रॉक कडे जाणारे गाणे यातून पावसाचे निरनिराळे रंग यांचा आविष्कार गुप्तेंनी साधला आहे. वैशाली सामंत यांच्या आवाजातील 'स्वर पावसात भिजतात' या अल्बममध्ये तर अस्सल रॉक संगीताचा वापर करत गाणे रचले आहे.

पावसावरचे प्रेम इथेच थांबत नाही. 'अमृता सुभाष' या गुणी अभिनेत्रीने देखील गायन क्षेत्रात पाऊल ठेवले ते 'जाता जाता पावसाने' या पाऊस गाण्यांच्या अल्बम मधूनच. नाजूक गळ्याच्या गायिकांच्या परंपरेला छेद देत अमृताने या अल्बममधून एक नवा पायंडा पडला आहे. भटकंती करत सारा महाराष्ट्र पालथा घालणारा अभिनेता 'मिलिंद गुणाजी' यांनीही कवितेवरील प्रेम व्यक्त करण्यास 'मन पाखराचे होई ' म्हणत पावसाशी नाते जोडले आहे.

नव्या पिढीची लाडकी जोडी सलील आणि संदीप यांनी 'आयुष्यावर बोलू काही' म्हणत सगळ्यांना मुग्ध केले आहेच. त्यांनीही आपल्या कार्यक्रमातून पाऊसगाणी सादर करून प्रेक्षकांना आणि रसिकांना पावसात भिजण्याचे नवे बहाणे दिले आहेत. लहानग्यांसाठी 'अग्गोबाई ढग्गोबाई' गाताना हे दोघे लहान मुलांचे बोबडे विश्व आपल्यासमोर उभे करतात आणि तितक्याच सहजपणे तरुणाईच्या प्रेम भावना व्यक्त करणारे 'तुझ्या माझ्या सवे' म्हणता पावसालाही गाणे गायला भाग पाडतात. प्रेयसीच्या आठवणीत रमणाऱ्या मनाला पाऊस अधिकच बेचैन करून सोडतो तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताना 'पाऊस रुणझुणता असा ...पैंजणे सखीची स्मरली...'अशा ओळी आठवल्या नाही तर त्याने हे गाणे ऐकले नसावे या कारणखातरच केवळ माफ करण्यात यावे.

पाऊसगाण्यांचा शेवट माझ्या एका अतिशय आवडत्या गाण्याने करीत आहे. संदीप खरे यांचे शब्द-संगीत आणि स्वर असा तिहेरी संगम जिथे जुळून आला आहे त्या 'सरीवर सर' या गाण्यातून पावसाचे आणि निसर्गात रमणाऱ्या भटक्या मनाचे वर्णन अनुभवायचे असेल तर पाय घराबाहेर टाकून पावसाच्या कधी उधाणत्या आणि कधी थेंबांच्या संथ लयीच्या धारा अंगावर झेलत बाहेर पडायला हवे. मग हे शब्द आणि अंतरंगात उमटणारा हर्ष पावसासंगे एकरूप होऊन जातात. सर्वत्र केवळ पाऊस आणि पाऊस...सरीवर सर बरसतच राहतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ह्या पाऊस गाण्याच्या मैफीलीत - दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो - आला आला ग सुगंध मातीचा हे सुमन कल्याणपुर ह्यांचेही गाणे जरुर घ्या---- कारण आता श्रावणही सुरु झालाय Happy

आता ही मैफील कमीत कमी आठवडाभर तरी मनात चालू रहाणार

मनःपुर्वक धन्यवाद Happy