कविता

माझे आवडते प्रश्न...

Submitted by हर्षल_चव्हाण on 31 July, 2012 - 06:03

डोंगराच्या टकलावरती,
हिरवे कुंतल कसे उगवती?
मेघांच्या डोळ्यांतून काळ्या,
अश्रू का हो ओघळती?

आकाशाच्या अंगावरती,
रोजच शर्ट निळा कसा?
धरतीला पण रोज नव्याने
मिळतो नवा झगा कसा?

सरसर धावत येते सर पण,
कुशीत आईच्या जाते का?
हिरवे पाते कुठून येते?
असते त्यांचे नाते का?

झाडांच्या बाहूंवरती,
पक्षी आनंदे झुलती,
पंखांचे बळ; खोलण्या
दार नभाचे पुरती?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आग-डोंब !

Submitted by सुचेता जोशी on 31 July, 2012 - 02:13

पावसाची
रिमझिम
पान-पान
ओलचिंब

उभ्या-उभ्या
शहारतो
परसात
कडुलिंब

गवताच्या
पातीवर
उसासतो
थेंब-थेंब

डहाळीला
सोसवेना
वा-याची ही
झोंबा-झोंब

मातीतून
धुमारतो
कोवळासा
कोंब-कोंब

सख्याविण
श्रावणात
अंग-अंग
आग-डोंब !

गुलमोहर: 

प्रेमाची किंमत

Submitted by रसप on 31 July, 2012 - 01:59

रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात माझ्या रुजती
खळखळते ओहोळ पाहुनी तरंग नकळत उठती
तुझी नि माझी बालपणीची कागदहोडी ओली
तसाच पाउस, तसेच पाणी, पण मी तीरावरती

कळले नाही मलाच माझे कधी जाणता झालो
वर्तमान जगण्याचे सोडुन 'उद्या' पाहता झालो
प्रश्न तुझ्या डोळ्यांना पडता नव्हते उत्तर काही
व्यवहाराच्या दुनियेमध्ये प्रेम शोधता झालो

क्षणाक्षणाला सुखास वेचून बरेच संचित केले
वणवण माझी वाऱ्यावरची उडून सारे गेले
आज पुन्हा ना हाती काही, पुन्हा पावले थकली
प्रश्नाचे उत्तर पाण्याने सोबत वाहून नेले

मनात होते काय तुला मी आज खरे सांगतो..
फूल हासरे, झुळझुळ पाणी, तिथे तुला पाहतो

गुलमोहर: 

उत्तरं

Submitted by तुटता तारा on 30 July, 2012 - 09:40

हरवू नये म्हणून जास्तच नीट कुठेतरी ठेवलेली वस्तू का सापडत नाही
पांढरे केस कधी का गळत नाहीत
चंद्र-चांदण्यांकडे का पाहत रहावस वाटत
पावसाळ्यातल्या सकाळी उदास उदास का वाटत

या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं

मला अजूनही मिळालेली नाहीयेत

- तुटता तारा

गुलमोहर: 

एन. आर. आय. ही कविता वाचून सुचलेली कविता

Submitted by shrikant lele on 30 July, 2012 - 06:48

श्री लेले साहेब,
सप्रेम नमस्कार.
आपण पाठवलेली
कविता आवडली,
मनाला भावली,
मग लेखणी हाती धरली

प्रारंभी धनाच्या मोहानी,
माणूस हरपून जातो,
पण नंतर मात्र,
स्वसुखालाही हरवून बसतो.

आपले ते संस्कार,
सोडू शकत नाही,
पळत्याच्या पाठी धावणे,
रोकु शकत नाही.

मायेचे पाश,
गुंफलेले असतात घट्ट,
तडफड पाहत राहणे,
कारण अंधार काळा कुट्ट

योग्य असतात
जुन्या म्हणी
''दुरून डोंगर साजरे'',
असेच येते मनी.

सुरेश कुलकर्णी, इंदूर ह्यान्च्या सौजन्याने

गुलमोहर: 

प्रार्थना

Submitted by shilpa mahajan on 29 July, 2012 - 13:54

प्रार्थना

युगे युगे मी वाट पाहते
जन्मामागून जन्मच घेते
प्रभूकृपा परी मज न लाभते
सांग कोणती होऊ पायरी
मी तव चरणस्पर्श मिळवाया
माझा जन्म सफल हा व्हाया

शिळा अहिल्या उद्धरण्याला
अरण्यात राघवा पातला
तिच्याच पुढची असून शिळा मी
चरण धूलीकण मज न लाभला .
का पक्षपात केला रघुराया?
गेला शिळा जन्म मम वाया!

तव स्पर्शाला अति आतुरले
शबरी हाती 'बोर' जाहले,
तव भ्रात्याने मला फेकिले
हिणवून 'उष्टे' रे रघुराया !
ही पण तुझीच की रे माया !!
गेला 'बोर-जन्म' मम वाया!

कुब्जे हाती सहाण झाले

गुलमोहर: 

पैंजणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 July, 2012 - 13:02

थबकत थिरकत तुझी पावुले
येता वाजत
रुणझुण रुणझुण गाण वाटते
चाले पायात

डौल तुझा दंभ ही उमटतो
अचूक तालात
नाजूक पावला भार होतसे
असे जाणवत

या ध्वनीने चकित झाला
थबकून राहिला वात
पद तळीची मृतिकाही
शहारली सुखावत

पुराण वृक्ष वट म्हणाला
ऐकले हे प्रथमत
पुन्हा उर्वशी म्हटला पर्वत
डोळे आपले उघडत

आणि आसमंत धुंद झाले
राहिले तुजकडे पाहत
तशीच चालते मंदपणे तू
सा-यांना दुर्लक्षत

पायी ल्याली सजली तुझिया
ती पैंजणे धन्य होत
हाय अभागा करतो हेवा
त्याचा मी सतत

गुलमोहर: 

निरोप...

Submitted by बागेश्री on 28 July, 2012 - 08:07

जाणारा रेंगाळला की,
अस्वस्थता वाढतेच...
त्रास दोघांनाही!
त्या जाणार्‍याला आणि मागे राहणार्‍याला..

डोळ्यांचे मूक संवाद,
हातांची चाळवा-चाळव,
भिरभिरून स्थिरावणारी नजर,
आणि नेमक्या वेळी डोळच्या पाण्याची निग्रही प्रतारणा...!!

जाणार्‍याला, नवा प्रवास,
नवी जागा,
नव्या आठवणी....

मागे राहणार्‍याला मात्र-
तीच जागा,
सोबत घालवलेल्या क्षणांचं पुसट अस्तित्व...
उमटून विरत आलेल्या पाऊलखूणा,
काही थकलेले कयास,
काही निश्वास,
उंबर्‍यात अडकून राहिलेले भास...!

पण म्हणून,

निरोप टळतात थोडेच?

गुलमोहर: 

आषाढी सांज

Submitted by ओवी on 27 July, 2012 - 14:11

ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची

ओलेत्या मनात हव्याशा स्वप्नात
खरीखुरी चिंब जगायची

धुक्याच्या कुपीत धारांच्या मिठीत
थेंबथेंब नक्षी रेखायची

सजल छायेत देवाच्या मायेत
चातक चोचीने झेलायची

हिरव्या रानात पिवळ्या ऊन्हात
भान हरपून भूलायची

वार्‍याचा मारवा शिरशिर गारवा
थरारुन झोकात फुलायची

नाना परींच्या नाचर्‍या सरींच्या
पाऊलखुणा शोधायची

आभाळ तोलीची हिरव्या बोलीची
अवखळ गीते बोलायची

ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची

क्षणांच्या गतीत हळव्या स्मृतीत

गुलमोहर: 

निळाई ( गीतासह)

Submitted by भारती.. on 27 July, 2012 - 08:58

निळाई
https://www.youtube.com/watch?v=Zx-FSyUuTMI&feature=youtu.be

किती धीरगंभीर लाटा उसळल्या
कुणी आत्मघाती तटाशी विखुरल्या
कुणी सोज्वला कोमला उर्मिला त्या
तरंगात काही उसासून गेल्या. .

कुणी मत्त कोणी जिव्हारीमनस्वी
कुणी मुक्त कोणी उदासीतमस्वी
कुणी चंद्रसाक्षी - धरे बिंब वक्षी
कुणी ऐन मध्यान्ही तळपे तपस्वी
निळ्या वैभवाच्या तर्‍हा वेगळाल्या

किती लक्षकोटीक लाटा सतंद्रा
जळ-अप्सरांच्या जणू भावमुद्रा
निळाई परि सागराची समग्रा
एकांतिका.. एकता .. रुपरुद्रा
क्षितीजास कक्षा तिच्या रेखलेल्या ..

निळाई अशी ही अपारा उदारा
न आटे न ओलांडते वा किनारा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता