पहिला पाऊस

पहिला पाऊस

Submitted by सौरभ उपाध्ये on 29 June, 2012 - 09:30

पहिला पाऊस
रिमझिम सर पावसाची , मन जायी मोहरून ;
ओल्या मातीच्या गंधाने, माझाच मी गेलो हरवून.

पाहताना त्या सरीला , ऐकू आली अलगुज;
थेंबा-थेंबाच्या स्वरांनी, सूर उमलले आज.

सुटे सोसाट्याचा वारा, झाडे घेती खुला श्वास;
येत्या पावसाची होती,त्यांनाही वेडी आस.

पाखरे लपण्यासाठी ती,सारी सैराभैरा झाली;
उन्हाच्या चटक्यांना, आज शीतलता आली.

असा निसर्गाचा खेळ, जणू वेगळा परीस;
माझ्या मनी दाटलेला,असा पहिला पाऊस.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

देशील का?

Submitted by मंदार-जोशी on 15 August, 2011 - 08:36

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पहिला पाऊस