विषय क्रमांक २ - आमच्या दाते बाई
जून-जुलै महिन्यातील एक दुपार आणि बाहेर पडत असलेला धुवाधार पाऊस. तिसर्या मजल्यावरच्या आमच्या वर्गात खिडकीजवळच्या बाकावर बसून आषाढातल्या पावसाचे विहंगम सौंदर्य पाहण्यात मी गढून गेले होते. सायन स्टेशनबाहेरचा तो एरवी गजबजलेला परिसर, दुपार आणि त्यात पाऊस यामुळे शांत पहुडला होता. फळे, भाज्या विक्रेते आपापल्या गाड्यांवर प्लॅस्टिक घालुन आडोशाला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अशोक, वड, पिंपळ ही झाडे नुकत्याच न्हाऊन आलेल्या, ओलेचिंब केस पाठीवर मोकळे सोडलेल्या, हिरवाजर्द शालू नेसलेल्या नवरीसारखी तजेलदार दिसत होती. त्यावर काही पक्षी अंग चोरुन बसले होते.
