प्रदक्षिणा
तुम्ही मला चहा पाजलात.. त्यामुळे कुतूहल
दाखवण्याचा तुम्हाला हक्क मिळालाय.
अर्थात, तुमच्या नजरेतलं हे कुतुहल माझ्याही
ओळखीचं होतं कधीकाळी.
माणसं असलं भिकारछाप आयुष्य कसं काय जगू
शकतात, हे आरामशीर कुतूहल..!
पण माझ्या असण्यामुळंच तुमच्याही असण्याला
थोडाफार अर्थ आलाय, हे तुम्हाला माहिती आहे ना?
पण ते स्वतःशीच कबूल करताना तुम्हाला अस्वस्थ का
वाटतंय ?
कारण तो विचार तुम्ही लगबगीने झटकून टाकताय हे
मला स्पष्ट दिसतंय..!
"माझ्यावर अशी वेळ आली तर मी ताबडतोब आयुष्य
भिरकावून देईन", असंही तुम्हाला वाटतंय का?