लेखनसुविधा

हिरवी बाजीगरी

Submitted by पुरंदरे शशांक on 11 August, 2017 - 03:00

हिरवी बाजीगरी

पाऊस सरता ऊन्हे कोवळी रेशीम धाग्यांपरी
दंवबिंदूंची झालर उमटे हिरव्या पात्यांवरी

नेत्रसुखद रंगांची उधळण कडे पठारांवरी
भिरभिरणारी अातषबाजी चित्र करी साजिरी

शीळ मधुर पक्ष्याची अलगद येता कानांवरी
सुंदरतेला नाद लाभला दूर दूर अंबरी

वाटा भिजल्या, हिरव्यारंगी कातळही गहिवरी
मुक्त मनाने श्रावण परते काळजात हुरहुरी

हिरव्यारंगी रंगवूनी मन देत उभारी खरी
सतेज करते पुन्हा सृष्टीला हिरवी बाजीगरी

बाळाची आई

Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2017 - 03:05

बाळाची आई

बाळाची अाई
कामात का बाई
हाका किती मारू
ये ना गं आई....

दुपटं ओलं
कळतं तुला
म्मम्मम लागे
समजतं तुला

येतेस ना लवकर
अाई गं अाई
कोणी घेतलंय मला
कळतंच नाही...

शब्दखुणा: 

मायबोलीवरचं लेखन व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मिडिया वर शेअर करण्याची सोपी सोय

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कालपासून मायबोलीच्या लेखनांखाली तुम्हाला रंगीबेरंगी बटने दिसायला लागली असतील. मायबोलीवरचे लेखन सोशल मिडिया वर शेअर करणे सोपे व्हावे म्हणून ही सोय केली आहे. ही सोय पूर्वी ही (६ महिन्यांपूर्वी) होतीच पण व्हॉट्सअ‍ॅप वर अणि पिंटरेस्टवर शेअर करण्याची सुविधा मायबोलीसाठी नवीन आहे.
व्हॉट्सअ‍ॅपकारांच्या धोरणाप्रमाणे फक्त मोबाईलवरूनच आणि तेही तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप असेल तर शेअर करता येते.
व्हॉट्सअ‍ॅपसोडून इतर सोशल मिडीया वर डेस्क्टॉप किंवा मोबाईल दोन्ही पद्धतीने शेअर करता येईल.

प्रकार: 
शब्दखुणा: 

देव भक्त

Submitted by पुरंदरे शशांक on 18 July, 2017 - 23:23

देव भक्त

पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी

पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने

दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत

देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण

भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...

खेळिया

Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2017 - 04:59

खेळिया

खेळ मांडूनि पुढ्यात
गेला कळेना कोणास
खेळामधे दंग सारे
माथी एक कासाविस

कधी हासूनी मजेत
कधी रडती जोरात
त्याच सार्‍या विवंचना
एकरूप त्यात मस्त

धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन
विचारती अांत अांत
कोण खेळिया महान

खेळियासी ओळखता
मनी कौतुक दाटले
रूप मनींचे अाघवे
उभे पुढ्यात ठाकले

खेळियाने विचारले
कोण व्हावे सांगा फक्त
हासोनिया संत बोले
देव तूचि, मी तो भक्त....

प्रेमतीर्थ

Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2017 - 06:16

प्रेमतीर्थ

कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।

भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।

होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।

भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।

देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।

सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।

जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....

मिराशी - परंपरागत हक्क

सगुण ब्रह्म

Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2017 - 02:29

सगुण ब्रह्म

वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा

भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने

धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत

चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....

अंगाई.... चांदोमामा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2017 - 03:03

चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान

चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे

चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल

डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना

डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....

प्रवासी

Submitted by पुरंदरे शशांक on 9 May, 2017 - 06:45

प्रवासी

ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?

शब्दखुणा: 

माऊली कृपा

Submitted by पुरंदरे शशांक on 4 May, 2017 - 01:41

ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।

शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।

निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।

ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।

सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।

एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।

देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।

समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा