कथा एका मरणाची

Submitted by कुणी दिवाणा on 30 September, 2017 - 01:20

कलेवर माणुसकीचे, बेवारस पडले होते
देवांवरती दगडांच्या पुष्पघोष सडले होते

ही प्रेते जीवंत सारी, सरणावर आयुष्याच्या
पाहुन स्मशानामधले थडगेही रडले होते

तु दुरुन गेलीस जेव्हा, टाळुन जवळचे नाते
या उरातल्या र्हदयाचे मनसुबे रखडले होते

त्या उनाड वाटासंगे, मी जरा आगळीक केली
ते भले चांगले रस्ते, यावरती अडले होते

एका माझ्या मरणाची, ही कथाच नव्हती वेड्या
हे जगणे कित्येकांना, असेच नडले होते

Group content visibility: 
Use group defaults