मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?

Submitted by अनन्त्_यात्री on 12 September, 2017 - 04:52

[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही Happy ]

वॉट्सअ‍ॅप व आंतरजालावरील सर्व मराठी संस्थळांवरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्‍याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.

शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, मराठी टंकनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभंग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-संवेदनशील बनत जातो.

सोशल मिडियावरच्या सध्याच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्‍या शब्दांची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे:

मि, हि, तु, हीला, तूला, खुप, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे, ईत्यादी.... ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे, इत्यादि.... च्या ऐवजी).

माझे आणखी एक निरीक्षण असे आहे की मराठी शुद्धलेखनाबाबत अनास्था दाखविणारे अनेक जण इंग्लिश लिहिताना मात्र स्पेलिंग बद्दल काटेकोर असतात.

भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सांगू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.

Group content visibility: 
Use group defaults

लेख पटला. मगाशीच व्हॉट्सॅपवर एकाला मी एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत असे सूचित करुन आलो, आणि हा लेख वाचला.

अनन्त्_यात्री,
तुम्ही अनन्त मधल्या त चं पण तंगडं मोडलय का? का?

शुद्धलेखन नसेल तर पूर्वी माझ्या पण डोक्यात तिडीक जायची. मग हळू हळू (उशीरा) समजून घ्यायला लागले की अट्टाहास नको. अर्थ समजून घ्यायला पाहीजे. लेख, कविता, इमेल्स, वगैरे असेल तर अशुद्ध असेल तर खडा लागल्यासारखे वाटते मधेच. कारण लोकांनी समजून, उमजून, वाचून, तपासून पोस्ट केले पाहीजे असं वाटतं. एवढा वेळ तर द्यावाच आपल्या कलाकृतीला प्रत्येकाने असं (मला) वाटतं.

घाईत लिहीलेले प्रतिसाद, वॉट्सअ‍ॅप वरचे मेसेज, घाईत लिहीलेली इमेल्स, असे असेल तर कीस पाडत बसण्यात अर्थ नाही असं वाटतं. लिखाणासाठी वेळ घेतलाय की नाही यावर शुद्धलेखन किती महत्त्वाचं धरावं अस विचार करायला लागलेय मी हल्ली. अर्थाचा अनर्थ होत नाही इथपत नीट लिहील्याशी कारण! तशीच गरज पडली तर बदल सुचवते. हे सर्वच भाषांसाठी.

एखादि व्यक्ती कायमच विचित्रं लिहीत असेल तर तिला इग्नोर करणेही जमायला लागलय. कधी कधी वाटतं की हे आपलेच चोचले! त्यांना काही पडली ही नाहीय, जाऊदे, मरूदे, गेलं खड्यात!
ही स्थिती यायला बरेच कष्ट पडतात, पण जमतं.

मोबाईल वर तरी माझ्यामते किबोर्ड आणि डिक्शनरी चा फॉल्ट असावा. उदा. mi or mee टाईपलं तरी देवनागरी शब्द मि असा येतो. पुढे तो निगुतीनं जाऊन दुरूस्त करणे इ. चा कंटाळा वगैरे कारणं...

लेख वगैरे लिहितांना विचार जसे येतील तसे उतरवणं होतं. त्यानंतर खरंतर मुशो करायला हवं. नाही आपल्याला जमत तर कुणाची मदत घेऊन. आणि वाक्यरचना, एकातून दुसरा अर्थ निघत नाहीय ना ते पाहाणे किंवा तसं अपेक्षितच असेल तर त्यानुसार रचना बदलणे इ. हे शक्यतो कुणी करत नाही.

योकु आयफोन किबोर्ड सेटिंग मध्ये मराठी किबोर्ड एनेबल करा. मग हव्या त्या वेलांट्या, उकार देता येतील.

तुम्ही अनन्त मधल्या त चं पण तंगडं मोडलय का? का? >> सोनू सॉरी पण अनुस्वाराचे पण प्रकार आहेत आणि ते त्या प्रमाणेच दिले गेले पाहिजेत असं प्रमाणबद्ध मराठीत सांगतात पण आजकाल आपण सर्रास अनुस्वार म्हणजे डोक्यावर टिंब देतो आणि रिकामे होतो. पण अनुस्वाराचे प्रकार
न, म, ण, ङ् असे आहेत. (कदाचित अजूनही असतील)

त्यामुळे अनन्त मधला न हा योग्य लिहिला आहे. आनन्द
दुसरे उदा. गोपाळ निळकण्ठ दाण्डेकर यांचे घेऊ. त्यांच्या पुस्तकांवर त्यांचे नाव कायम असेच लिहिलेले असते.
गोपाळ निळकंठ दांडेकर असे नव्हे.
वाङ्मय लिहिताना आपण वांग्मय असं का बरं लिहित नाही?
लोकमंगल हे सुद्धा चूक आहे योग्य शब्द पुण्याच्या महाराष्ट्र बॅन्केच्या शिवाजी नगर शाखे बाहेर लिहिला आहे. (इथे मला तो नीट लिहिता येत नाहिये)

असो हे माझे तुटपुन्जे ज्ञान आहे. जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.

योकु आयफोन किबोर्ड सेटिंग मध्ये मराठी किबोर्ड एनेबल करा. मग हव्या त्या वेलांट्या, उकार देता येतील. >>>
हे ठीकच. पण माझ्यामते ट्रान्सलिटरेशन मेथड जास्त सोपी पडते. उदा. liha > लिहा.
अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स वर 'गुगल इंडिक किबोर्ड' हे एक उत्तम ट्रान्सलिटरेशन माध्यम आहे. हे अ‍ॅप डालो करून फार फास्ट आणि अचूक लिहिता येतं. आयओएस वर हे उपलब्ध नाहीय अजून. Sad

योकु मी मोबाईल वर गुगल इंडिक किबोर्ड वापरते. खूप छान आहे. शब्द जवळपास अचूक टाईप करता येतात.
अगदी ज्ञ वगैरे पण... सोपं आहे आणि खूप.

दक्षिणा त्यांनी लिहिलेल्या अनन्त मधिल त हलन्त आहे असे वाटते: अनन्त्
त्याबद्दल सोनू विचारत आहेत.

मानव, हो.
दक्षिणा, त्यांनी त चं तंगडं मोडलय न अर्धा लिहून सुद्धा, अनन्त् असे. ते विचारत होते.

आयफोन किबोर्ड सेटिंग मध्ये मराठी किबोर्ड एनेबल करा. मग हव्या त्या वेलांट्या, उकार देता येतील. >>
अँड्रॉइड वाल्यांनी वाट लावलीय त्यांच्या कीबोर्डची. मी ही अजून पर्यंत अशा वेलांट्या देऊन लिहीत होते. पण अपग्रेड मधे त्यांनी कीबोर्ड अल्फाबेटीकल केला जो आधी (मराठी) QWERTY होता. भिरभिरायला होतं. शिवाय काना मात्रा वेगळ्या देता येत नाहीत. क टाईप केलं की वरची ओळ क का कि की अशी येते त्यातून आपल्याला हवं ते क्लिक करायचं. वैताग वैताग. इंग्रजी कळा दाबून उठणारे मराठी शब्द अजून मोबाईलसाठी बरे नाही वाटत. लॅपटॉपवर चालतात. आता दोन्ही प्रकारांची सवय करतेय. Sad

त चा पाय मोडलेला आहे नक्की पण तो बहुधा नजरचुकिने झालेला असू शकतो.
एक जास्तीचा अ नावात टाईप केला तर ओके होईल.

सोनू. वर सांगितलेला गुगल इंडिक किबोर्ड ट्राय करा. डालो केल्यावर सेट अप करतांना बाकी सगळे किबोर्ड्स डिसेबल/अनिन्स्टाल करा.

गुगल इंडिक किबोर्ड ट्राय करा. >> त्याचच रडगाणं गातेय. त्यातले काना मात्रा गेलेत. स्टोरमधे जाऊन या किबोर्ड च्या वापराचा विडियो बघा.

अशा प्रकारच्या मराठी शुद्धलेखनाच्या चुकांसोबतच आणखी काही प्रकर्षाने जाणवणाऱ्या काही चुका:
१. पेन 'भेटलं', वही 'भेटली', ट्रेन/बस 'भेटली', जॉब 'भेटला' इ.
२. मी 'आला', मी 'जेवला', मी 'बोलला', मी 'झोपला' तसेच मी 'आली', मी 'जेवली' इ.
३. माझी मदत कर ('मला मदत कर' च्या ऐवजी) अशा प्रकारचे वाक्य मालिकांमध्येही ऐकू येते.
(इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना (अगदी मराठी कुटुंबातील मुलांनासुद्धा) मराठी बोलताना पाहणे, हा तर एक विचित्र अनुभव असतो!)

अशुद्धलेखन वाचताना त्रास होतो हे खरेय.

हा त्रास व्यक्तीसापेक्ष असतो. म्हणजे मी मायबोलीसारख्या मराठी संकेतस्थळावर वावरतो त्यामुळे माझा बेंच मार्क व्हॉटसप फेसबूकवर बागडणार्‍यांपेक्षा जरा वरचा आहे. त्यांचे अशुद्ध लेखन मला खटकते.
पण तेच ईथे एखाद्याला माझे लिखाणही अशुद्ध वाटू शकते. नव्हे वाटतेच. कारण ते तसे आहेही. बरेचदा माझ्याकडून हिंदी शब्दही वापरले जातात कारण तेच मराठी नसून हिंदी आहेत हेच माहीत नसते. मुंबईत भैय्या, गुज्जू, मुस्लिम, बोहरी, मारवाडी वगैरे लोकांमध्ये वाढल्याचा परीणाम असेल. तसेच मला व्याकरणाचे नियम माहीत नाही. शुद्ध शब्दात लिहिलेले ईतरांचे लेख वाचून ते शब्द ओळखीचे होतात. आणि ते तसे झाल्यावर माझ्यापरीने कटाक्षाने शुद्धच लिहायचा प्रयत्न असतो. कारण मराठी जगावी असे मला मनापासून वाटते.

पण कोणी एखाद्याला कमी लेखत मराठीचा अट्टाहास धरत असेल तर ते नाही आवडत. अशी लोकंही आपल्या वर्तणूकीने मराठीचा नाश करतात असे वाटते.
बाकी मी लोकांचे सल्ले ऐकतो आणि माझे मराठी सुधारतो. ज्यांनी गेल्या काही काळात माझे लिखाण पाहिले असेल त्यांना थोडाफार बदल नक्की जाणवला असेल.

सोनू., इंडिक कीबोर्ड चे दोन सेटींग आहेत. एक आहे तुम्ही म्हणता तसे मराठी कळफलकाचे. दुसरे आहे क्वार्टी रोमन कळफलकाचे.

तुम्ही इंडिक की बोर्ड सिलेक्ट केल्यावर ळ असे अक्षर व त्या ळ च्या खाली एक छोटासा बाण दिसतो का. त्या बाणावर टिचकी मारा व क्वार्टी आणि देवनागरी कळफलकात टोगल करा

माझ एक निरीक्षण...

आपण जेव्हा मराठी शुद्धते विषयी बोलतो ते म्हणजे.. शब्दांच्या स्पेलिंग बद्दल बोलतोय, बरोबर ?
म्हणजे अस कि, उच्चार व त्या प्रमाणे योग्य स्पेलिंग (स्पेलिंग साठी मराठी शब्द सुचत नाही आत्ता) असायला हव..
वरील लेखा मध्ये अशी उद. दिलेली आहेत त्या प्रमाणे तर तसच वाटत...

जर मुद्दा हा स्पेलिंगचा असेल तर ते उच्चारा प्रमाणे व्हाव हि अपेक्षा रास्त आहे..
पण एखाद्या शब्दाचा/शब्दांचा उच्चार वा वापर ठरावीक प्रमाणेच व्हायला हवा असे म्हणने योग्या ठरणार नाही.
( उ. दा. "विसरलो" व "इसरलो" (ग्रामीण) ) या मध्ये दोन्ही स्पेलिंग बरोबर आहेत जर उच्चार करणार्‍याने तसा उच्चार केला असेल तर.
एखाद्या शब्दाचा उच्चार शुद्ध वा अशुद्ध ठरवणे योग्या ठरणार नाही..
जर मुद्दा फक्त उच्चारा प्रमाणे योग्य स्पेलिंग ..अस असेल तर ते रास्त आहे..

कारण भाषा ही प्रवाही आहे.. शब्दांचा उच्चार वा वापर कालानुरुप बदलत जातो..

पेन 'भेटलं', वही 'भेटली', ट्रेन/बस 'भेटली', जॉब 'भेटला' इ. हे अशुद्ध नाही. मराठी मूठभरांच्या मालकीची बटकी नाही.
कधीतरी आपल्या पेठेबाहेर पडून पहा. बरंच काही भेटेल.

जॉब भेटला वगैरे अशुद्ध नाही. बोलीभाषेचा कोणताच ढंग अशुद्ध नाही. फक्त प्रमाण भाषा नाही, इतकेच. (बाय द वे, देजा वू- इथे भाषेवर आक्षेप घेतलेली दोन उदाहरणे पेठेतलीच काय पण पुण्यातलीपण नाहीत. तेव्हा जरा भाषेबद्दल कोणी लिहीले तर पेठांवर घसरायचे कारण नाही Wink )

पण चक्रपाणी शब्द असा लिहीणे, किंवा सर्वांचे धन्यवाद - हे अशुद्ध आहे. कोणत्याही बोलीभाषेत.

दक्षिणा : पण अनुस्वाराचे प्रकार न, म, ण, ङ् असे आहेत. (कदाचित अजूनही असतील)
>>>>

हि खुप छान माहिती आहे .. धन्यवाद दक्षिणा.

शुद्ध असो वा अशुद्ध, मराठी टिकवून ठेवलीय हे काय कमी आहे का.. पुढची पिढी माबो वर येऊन शुद्ध मराठी टाईप करणार आहे का... इंग्लिश माध्यमाचा कोणी आला तर पळून जाईल इतके कॉम्प्लिकेटेड करून ठेवलय शुद्ध, अशुद्ध.

इंग्लिश माध्यमाचा कोणी आला तर पळून जाईल इतके कॉम्प्लिकेटेड करून ठेवलय शुद्ध, अशुद्ध.
<<
मराठी माध्यमाच्या कुणालाही आपोआप येईल अशी इंग्रजी भाषा व तिचे शुद्धलेखन व व्याकरण असते का? ते शिकावेच लागते ना?

बाकी चर्चेत मिञ मधला ञ राहिला Lol

१) लोकमङल
२) लोकमङ्गल <-- बहुधा हे बरोबर असावे.
अनुस्वाराचे प्रकार - चांगली माहिती

कभी हां कभी ना धाग्यावरून शुद्ध लेखनचे प्रतिसाद इकडे आणतोय.
>>>>>>

हाब, बरेच दिवसांपासून विचारणार होते, आता विचारतेच. तुम्ही लिहिताना असे रँडम अनुस्वार का वापरता?  उदा. मिळंत , शब्दं ,फक्तं, सदस्यंच इथे अनुस्वारांची गरज नाहीये. तसेच गोष्ट, पत्र, चित्र यामधे पण शेवटी अनुस्वार देतात काही जण. पण ते योग्य नाही.

Submitted by maitreyee on 12 September, 2017 - 19:43

हाब, बरेच दिवसांपासून विचारणार होते, आता विचारतेच. तुम्ही लिहिताना असे रँडम अनुस्वार का वापरता? Happy उदा. मिळंत , शब्दं ,फक्तं, सदस्यंच इथे अनुस्वारांची गरज नाहीये. तसेच गोष्ट, पत्र, चित्र यामधे पण शेवटी अनुस्वार देतात काही जण. पण ते योग्य नाही. >> बर्‍याच वेळा अनुस्वार शेवटच्या अक्षराऐवजी त्याच्या आधीच्या अक्षरावर येतो जी टायपिंग मिस्टेक होते. पण जाऊन ती न सुधारणे ह्यासाठी वेळेचे आणि बिनमहत्वाचे लिहिलेले आहे हेच कारण असते. चूक मान्यं आहे आणि दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद, पुढे लक्षात ठेवेन.

ऊदा. मिळंत नाही हे मिळतं किंवा मिळतबरोबर आहे.
रावसाहेबांना हे आयतं गिळायला मिळतं
आणि
रावसहेबांना हे आयत गिळायला मिळत.

Submitted by हायझेनबर्ग on 12 September, 2017 - 19:56

चूक मान्यं आहे ;)

Submitted by धनि on 12 September, 2017 - 19:57

आयतं गिळायला मिळतं >> हे योग्य आहेत.
पण परत तुम्ही " मान्य " वर अनुस्वार दिला. तो नाही बरोबर. नियम समजत असला तरी लिहायचा कसा हे कळत नाही आहे. शेवटी जोडाक्षर असेल तर येत नाही अनुस्वार. मान्य, सदस्य, फक्त, गोष्ट यावर अनुस्वार देत नाहीत . चित्र, पत्र, यक्ष, लक्ष यावर पण नाही देत.
आता धाग्यावर सध्या चाललेल्या चर्चेबद्दल - कुऋ या आयडी चा अजेंडाच जास्तीत जास्त रिअ‍ॅक्शन मिळवणे हा आहे मुळी, त्या निगेटिव असल्या तरी त्याला हव्याच असतात . त्यामुळे त्याच्याकडे सामुदायिक दुर्लक्ष हा एकच उपाय आहे. तसे तर माबोवर होणे नाही. कारण टुकारातल्या टुकार लेखालाही इथे कोणी ना कुणी गळाला लागतातच . बाकी सगळे उपाय फोल आहेत माझ्या मते.

Submitted by maitreyee on 12 September, 2017 - 20:10

आलं लक्षात. 
'शेवटी जोडाक्षर असेल तर येत नाही अनुस्वार' म्हणजे जोडाक्षरांच्या बाबतीत आजवर मी अनेकदा चुकीचं लिहित आलो आहे. पुढे नक्की लक्षात ठेवेन.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद मै आणि धनि.

Submitted by हायझेनबर्ग on 12 September, 2017 - 20:06

मिळतं मिळत बाबतीतला एक नियम -
शेवटच्या एकाराला अकार केला की अनुस्वार बरोबर येतो जोर कुठे द्यावा सांगायला.
असे सारे मिळत जाते = असं सारं मिळत जातं.
अजूनही काही नियम असतील.

Submitted by सोनू. on 12 September, 2017 - 20:53

>>असे सारे मिळत जाते = असं सारं मिळत जातं.<<

आणि " (शिंचे) असें सारें मिळंत जातें" हे "गारंबीचा बापु" तल्या त्या कोकणस्था सारखं... 

(आपुनका भी टाय्माउट)

Submitted by राज on 12 September, 2017 - 21:04

जोडाक्षरावर पण येईल की अनुस्वार. मी चित्र काढले, मी चित्रे काढली, मी चित्रं काढली. बरोबर हे का?

बाकी या धाग्यावर माझे आदरणीय नट राजेंद्र कुमारांचा अपमान झाला आहे त्याबद्दल कोणी चकार शब्द (शब्दं नव्हेत, एकच शब्द  ) काढेना.

Submitted by टवणे सर on 12 September, 2017 - 21:06

मी चित्र काढले, मी चित्रे काढली, मी चित्रं काढली >> चित्रे या अनेकवचनासाठी चित्रं वर आलेला अनुस्वार योग्य. पण मी चित्रं काढलं, पत्रं लिहिलं हे चूक 
सोनू. यांनी लिहिलेले लॉजिक बरोबर वाटते आहे. ( एकाराचा बोली भाषेत अकार केला की अनुस्वार देणे )

Submitted by maitreyee on 12 September, 2017 - 21:10

आपण जर मुळाक्षरांची रचना बघितली तर ती खालील प्रमाणे आहे

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ: (हे स्वर)

क ख ग घ ङ
उदा. वाङ्गमय, लोकमङ्गल,
च छ ज झ ञ
उदा. पञ्चम,
ट ठ ड ढ ण
उदा. कण्ठ, सुण्ठ, दण्डकारण्य
त थ द ध न
उदा. दन्त, अन्त, कुन्द, पन्थ
प फ ब भ म
उदा. पम्प, बम्ब, सुम्भ, खाम्ब
य र ल व श
स ष ह ळ
क्ष ज्ञ

अ ते अ: हे स्वर
क ते घ ही घशातुन उच्चारली जाणारी अक्षरे त्याच्या आधी अनुस्वार असेल तर 'ङ'वापरला जातो
च ते झ ही जिभेने उच्चारली जाणारी त्या आधी अनुस्वार असेल तर 'ञ'वापरला जातो
ट ते ढ ही ताल्य अक्षरे ह्या आधी अनुस्वार असेल तर 'ण'वापरला जातो
त ते ध ही दन्त्य अक्षरे ह्या आधी अनुस्वार असेल तर 'न'वापरला जातो.
प ते भ ही ओष्ठ्य अक्षरे त्या आधी अनुस्वार असेल तर 'म'वापरला जातो..

आपण सरककट सर्वांसाठी टिम्ब वापरतो ते लिहताना केवळ एक सोय म्हणून!
अनुस्वारांचा उच्चार करुन बघा लगेच लक्षात येईल..

असे काहीसे अनुस्वारांचे गणित असावे असे मला वाटते जाणकार जास्त प्रकाश टाकू शकतील !

Pages