मतला:
ते म्हणतात, शब्दांचा लिहाज मी ठेवत नाही।
ही अदा काय कमी आहे, की कटूतेचा अंदाज मी ठेवत नाही।।
शेर २:
असतील कुणी सुसंस्कृत, ज्यांची शिष्टाई अदबी आहे।
मी भावनांचा प्रेमी आहे, अदबी अंदाज मी ठेवत नाही।।
शेर ३:
माझी रचना ग़ज़ल नसेल कदाचित, नज़्मच आहे।
भावना भिडल्या तर क़ाफ़िया-रदीफ़चा अंदाज मी ठेवत नाही।।
शेर ४:
साहित्यिक तो, जो शब्दांत भावना मिसळतो।
ग़ालिब सारखा भाषेचा अंदाज मी ठेवत नाही।।
मक़ता:
मी ‘मेघ’ आहे, हे आकाश माझेच आहे।
वाहत्या वाऱ्यांचा अंदाज मी ठेवत नाही।।
तु एकदा आली होतीस छतावर हळुच।
तुला चंद्राचं चांदणे लाजले कदाचित।।
ते यमदूत माझ्या समोरुन गले।
त्यांनी मला नाही ओळखले कदाचित।।
त्याला पाहुन डोळ्यांत आले पाणी।
शब्द फुटले नाहीत,रोडावले कदाचित।।
अंधारात या आशेचा दिवा लावून।
मी मुर्त क्षणांना शोधले कदाचित।।
'मेघ', गणगोत पकडून ठेव घट्ट ।
पहा लागेबांधे विस्कटले कदाचित।।
शुक्रवार, १२/९/२५ ,७:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ
मेघ दाटले नभात सारे
हलके हलके वाही वारे
सळसळत्या त्या उन्हाळ्याने
पळ काढला आज कसा रे
थेंब बरसले भूमी वरती
रिमझिम रिमझिम नाद ते करती
कडकडाट तो नभी गुंजला
पावसाला आली भरती
झरझर झरझर झरती धारा
वेग घेऊनी आला वारा
चिंब भिजविले झाडे वेली
धुंद झाला सारा नजारा
जिकडे तिकडे गंध पसरला
मातीचा सुगंध पसरला
तरसत होती धरणी ज्याला
आज तिचा तो विरह सरला
आता होतासी
लपलासी कोठे
सख्या पांडुरंगा
शोधू तुज कोठे
लपंडाव देवा
का खेळिसी
पोच माझी नाही
तुज शोधू मी
मन ना निर्मल
बुद्धी ना विमल
मी दुर्बल सर्व ठायी
कागा विठाई परिक्षिसी
धरी हात आता
का देसी चिंता
भवार्ण तरावया
मज बळ नाही
जरी तु देवा
आला न भेटीस
नाव रख्माईस
बघ सांगेन मी
या उपरी जरी
तू न कृपा करी
चंद्रभागा कुशीत
देवा जाईन मी
'मेघ' म्हणे देवा
तिढा सोडवा हा
खेळ तो मांडावा
किती तव भक्ताचा
एकांतात दुरुन बोलावी कोण मला
सावल्या कुणाच्या खुणावतात मला
गुप्प अंधार,आणि दुसरे ना काहीच
त्या गडदांत सुद्धा कोण दिसे मला
मन बेचैन, भीतीने दाटले रोमांच
सुर भयाण, निरंतर ऐकु येती मला
ते डोळे मजवर सतत नजर ठेवून
काळोखातून वटारत असती मला
सांगा कुणी तरी कोण ते अनोळखी
ज्यांची ओळख वाटते नकोशी मला
गुरुवार , २८/०३/२०२४ , ०४:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
तुझ्या स्मरणांचे हृदयातले पान जीर्ण झाले आता
भेटून पुन्हा नव्याने ती जुनी ओळख ताजी करू आता
तुझ्या आठवांचे स्मरण चित्र पुसट झाले आहे
मोगऱ्याचा स्मृतिगंध तुझ्या तरी श्वासांत आहे
तू गायल्या गीतांची झाली विरळ लकेर आता
आपल्या नात्याची ओळख कशी दाखवू आता
कॉलेज च्या चौका समोरचे कॅफे आहे तिथेच
विद्यार्थ्यांची गर्दी तशीच,फक्त नाही तू नी मीच
हे सर्व घट्ट पकडून ठेवले तरी चालले निसटून
काय करू,आणू कसे जे गेले क्षण विसरून
कधी तरी तुला आठवतात का ते दिवस जे गेले निघून
की क्षण काही सोडता बाकी सारे तुही गेली विसरून
हळूहळू स्मृती पटलावरून तुझा चेहरा पुसट होत आहे !
आई तु केलेला संस्कार मात्र हृदयांत घट्ट मुळ धरुन आहे
तु भरवलेल्या काऊचिऊ च्या घासाची रुच अजुन जिभेवर आहे
तुझ्या हातच्या शेवयांच्या खीरीची चव न कधी परत मिळणार आहे
आजार पणात आमच्या आई तू रात्र रात्र जागवली आहे
आई तुझ्या शुश्रूषे वरच हा पिंड इतका मोठा झाला आहे
घरच्या अंगणांत ले तुलसी वृंदावन नेहमी आठवते मला
आज अंगण नाही, फ्लॅट मध्ये तरीही तुळस हवी मला
देव्हाऱ्यात ला तुझा बाळकृष्ण अजून तसाच दिसतो
मी म्हातारा झालो आई , तरी तो अजून बाळच दिसतो
आई जन्माष्टमी ला आता मी सुद्धा उपवास करतो
मज दुःखा चे वावडे नाही
की सु:खा ची कांक्षा नाही
अंता ची आहे जाणिव
मात्र मृत्यू चे भय नाही
काटे अनेक रुतले मनात
तरी हृदयांत वेदना नाही
जरी दुखावले मन माझे
कोणतीही कटुता नाही
जीवनाची वाट आहे कठिण
मात्र सोबत कुणी ही नाही
रात्र संपत आली तरी ही
या प्राचीस तरी सुर्य नाही
तो जरी म्हणवतो मित्र माझा
पण मज तो ओळखत नाही
फुले वेचली बकुळी ची
का त्यांना सुगंध नाही
आयुष्य चालले पुढे सरकत
दिशा मात्र का अजूनही नाही
देव्हारा हृदयाचा का रिकामा
देवा ची प्रतिष्ठा अजुन ही नाही
कधी वाटते मी कृष्ण मेघ व्हावे
पाऊस होऊनी बरसत रहावे
कधी कवीच्या त्या लेखणीतून
कविता होऊन बाहेर रिसावे
कधी वाटते मी वारा व्हावे
बेभान होऊन सुसाट वाहावे
मंद तुझा मी स्पर्शुन गंध
धुंद होऊन परत फिरावे
कधी वाटते मी स्वप्न बनावे
आणि अवचित मी तुला पडावे
स्वप्नातुन तुला येताच ग जाग
अंगावर तुझ्या रोमांच शहारावे
कधी वाटते मी चांदणे व्हावे
चकोर होऊन तु मला प्यावे
तृष्णेने न कोणत्या च उरावे
जे वांछीले ,ते कैवल्य मिळावे
शुक्रवार, २२/३/२०२४ , १२:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।
शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।
कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।
शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।
विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।