विठाई

लपलासी कोठे

Submitted by Meghvalli on 31 March, 2024 - 01:05

आता होतासी
लपलासी कोठे
सख्या पांडुरंगा
शोधू तुज कोठे

लपंडाव देवा
का खेळिसी
पोच माझी नाही
तुज शोधू मी

मन ना निर्मल
बुद्धी ना विमल
मी दुर्बल सर्व ठायी
कागा विठाई परिक्षिसी

धरी हात आता
का देसी चिंता
भवार्ण तरावया
मज बळ नाही

जरी तु देवा
आला न भेटीस
नाव रख्माईस
बघ सांगेन मी

या उपरी जरी
तू न कृपा करी
चंद्रभागा कुशीत
देवा जाईन मी

'मेघ' म्हणे देवा
तिढा सोडवा हा
खेळ तो मांडावा
किती तव भक्ताचा

विठा‌ई मिठाई

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 July, 2020 - 07:33

विठाई मिठाई

विठाई विठाई अशी मिठाई
साख-याला गोडी तूझीच गं आई

या मिठाईचा असे श्रीहरी हलवाई
देई भरभरुनी हरेका हवी ती गोडाई
फुकटची लूट धन मागत नाही
गोकुळीचा चोर बालवयाचा ज्ञानाई

हरी नावाचा ब्रॅंड न मिळे बाजारात
लागे सहजची हाती, डोकावता अंतरात
चाखा अविरत, अखंड मिठाई नामाची
खा कितीही गोड नाही भिती मधूमेहाची

खावी कुठेही, कशीही भूक भागत नाही
मन तृप्त तृप्त दुजे काही लागत नाही

© दत्तात्रय साळुंके
10-07-2020

शब्दखुणा: 

धाव धाव गे विठाई

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 May, 2018 - 23:12

धाव धाव गे विठाई

धाव धाव गे विठाई
सुख नाही संसारात
कर दगड पायीचा
राही तव सानिध्यात

पाय संताचे लागता
पापे सारी झडतील
माझे मीपण जळता
जीव शिव भेटतील

बसेन मी दारातच
तव रुप न्याहळीत
तुझे ऐकूनी भजन
दाटे हुरुप मनात

सुखावेल अंतरी मी
माथा टेकताच कुणी
हरीमय आशीर्वच
उठतील मनोमनी

© दत्तात्रय साळुंके

Subscribe to RSS - विठाई