रखुमाई

ताल धरी पांडुरंग

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 April, 2018 - 02:14

( शशांकजींच्या भक्तिमय रचनांच्या प्रेरणेतून )

ताल धरी पांडुरंग

मनातला भक्तिभाव
प्रगटता कागदावं
भाग्योदय त्याचा झाला
आला आला त्याला जीव

ओळ ओळ रखुमाई
अर्थोअर्थी चंद्रभागा
ताल धरी पांडुरंग
साथ देउनी अभंगा

शाई भक्तिरस प्याली
अक्षरांसी वाचा आली
पान बोलता विठ्ठल
पंढरी दुमदुमली

© दत्तात्रय साळुंके

देवभक्त एकमेका

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2018 - 02:49

देवभक्त एकमेका

घरी दिसेना तुकोबा
जिजा राऊळी धावली
एकलीच रखुमाई
आत पार धास्तावली

येकयेकी पुसताती
आमचे "हे" दिसेना की
जिजा म्हणे वैतागून
काय बोल नशीबाशी

खंतावून दोघी सख्या
वेगी भंडारा चालल्या
काय म्हणावे या वेडा
विठू तुका हरवला ??

भंडार्‍याच्या माथ्यावरी
तुका किर्तनात दंग
साथ देण्यासाठी स्वये
नाचतसे पांडुरंग

दोघीजणी खुळावोनी
हात लाविती डोईला
देव भक्त कळेना की
भक्तिमय पूर्ण काला..

किती भोळी रखुमाई

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2018 - 23:36

किती भोळी रखुमाई...

सावळ्या गं विठ्ठलाच्या
हाती हात कसा दिला
रूक्मिणी तू नाजुकशी
वर रांगडा वरला ?

धावे जनाईच्या मागे
शेण्या उचलीत गेला
कबिराला बोले थांब
शेला विणाया बैसला

सुखे विष पिऊनिया
मीरेपाठी उभा ठेला
किर्तनात करी साथ
नाम्याहाती खाई काला

नाही याला काळवेळ
भक्तकाजि रमलेला
मुलखाची भोळी बाई
वर असा निवडला ?

माय भक्तांलागी तूंचि
खोटेनाटे तुज सांगे
नाही युगत कळली
भाळलीस याच्यामागे

Subscribe to RSS - रखुमाई