नमस्कार
राधे ही सिरिज (https://www.maayboli.com/node/51393) नोव्हेंबर २०१४ मधे, लिहायला सुरुवात केलेली; इथे मायबोलीवरच. मायबोलीकरांच्या उत्स्फुर्त प्रतिसादांमुळे मी पुढे पुढे लिहित गेले. ही सिरिज नुकतीच एका मैत्रिणीने, रसिका काकतकर हिने वाचली अन तिने चंगच बांधला की याचे अभिवाचन करायचे. रसिकाने पाठपुरावा केला; केवळ त्यामुळेच हे व्हिडिओ प्रत्यक्षात येऊ शकले. तिच्या मैत्रिणींच्या युट्युब चॅनलवर ही सिरिज प्रसारित करण्याचे ठरले. मग मीही माझी तोडकीमोडकी चित्रकला आणि ॲनिमेशन स्किल वापरायचं ठरवलं.
मानवी जीवनाचे नक्की रहस्य काय असावे असा प्रश्न बऱ्याच वेळेस मला पडतो. मनुष्य म्हणून जगताना आपल्या जीवनाचे नक्की ध्येय काय? पृथ्वीवरील जास्तीतजास्त साधनसंपत्तीचा पुरेपूर उपभोग घेतला म्हणजे ती व्यक्ती यशस्वी जीवन जगली असे म्हणावे का? इतरांशी सतत स्पर्धा करत तथाकथित सुखाचा जास्तीतजास्त वाटा मला मिळावा म्हणून संघर्ष करणे म्हणजे मानव्या ऐवजी पशुत्वा कडे झुकणे आहे हे आपल्या कधीच लक्षात येतं नाही...
मला कधीकधी The Matrix सिनेमातील एजंट स्मिथ चे वाक्य खरे वाटू लागते.....
सलामत रहावी अयोध्या नि काशी
कराया हवी सज्ज प्रत्येक झाशी
जणू ग्रंथ डोक्याजवळ ठेवलेला
असू दे तुझा हात माझ्या उशाशी
इथे पंगती सारख्या मांडलेल्या
कसे ओळखावे अधाशी, उपाशी?
नको थांबणे अन् नको धावणेही
जगाने असा मोजला वेग ताशी
पडू द्या जरा बातमी थंड सध्या
नको द्यायला त्यास आताच फाशी
पहा, कल्पवृक्षास आला शहारा
कवी एक बसलाय त्याच्या तळाशी
https://kulkarnibhushan.wordpress.com/2020/12/20/zashi/
थोर स्त्रीपुरुष सारे झुंजले कशासाठी?
मार्ग रोज मळणारे झाडले कशासाठी?
दुःख वाटले जेव्हा प्रश्न पाहिले सोपे
ज्ञान एवढे सारे मिळवले कशासाठी?
शक्यतो दिसत नाही ध्येय चालतेवेळी
वाटते पुन्हा, इतके चालले कशासाठी?
मूळच्या स्वभावाने लोक वागती सारे
आपल्या मनाला मी जाळले कशासाठी?
वेगळ्याच अर्थाने पाहिले तिला आम्ही
कल्पना म्हणाली, मी जन्मले कशासाठी?
चेहरेच पुतळ्यांचे आठवायचे होते
रक्त मग इथे त्यांनी सांडले कशासाठी?
सागरास मिळण्याचे स्वप्न तेवढे माझे
व्हायचे न मोती तर शिंपले कशासाठी?
थकलेल्या पावलांस आता हीच सांत्वना आहे
चालत असताना रस्ता अर्ध्यात संपला आहे
पुढे पडत असणार्या पायाला कोणी सांगावे
दुसरा मागे दुनियेला रोखून थांबला आहे
वाट चालतेवेळी केवळ हीच माहिती आहे
दोन्ही पायांपैकी सध्या पुढे कोणता आहे
आधी उजवा की डावा, एवढाच निर्णय माझा
पुढे पावलांचा क्रम तर त्यानेच ठरवला आहे
त्याच्या जिम मधले एखादे यंत्र असावी दुनिया
इथे धावणारा एका जागीच राहिला आहे
https://kulkarnibhushan.wordpress.com/2021/01/31/vaatchaal/
तो गोकुळ सोडुन गेला
वाटते लौकिकार्थाने
येथेच बासरी त्याची
येथेच राहिले गाणे
विरहाची भक्ती सोपी
सारखी आठवण येते
वेदना जेवढी उत्कट
आनंद तेवढा देते
मी स्वतःस विसरुन जाते
तेव्हा तो येथे येतो
मी भानावर आले की
तो पुन्हा नाहिसा होतो
तो येथे आणत नाही
कुठल्या युद्धाची धूळ
ती तशीच वाजत असते
मुरलीची मंजुळ धून
एकरूप झाली ह्रदये
मग कसली ताटातूट?
तो आहे अथवा नाही
हे देहापुरते द्वैत
लोकांनी केले प्रश्न
पण राधेला हे कळते
दैवी अवतारालाही
देहाचे बंधन असते
कोपर्यातिल चार ठिपके फक्त पाहत राहिलो
ते कशाचे चित्र होते, हेच विसरत राहिलो
वाटले होते, पुढे होईल काही चांगले
मी स्वतःचा वेळ हारुन द्यूत खेळत राहिलो
कोंडलेला एक नायक, चार भिंती नायिका
त्याच घुमणार्या ध्वनीची गोष्ट सांगत राहिलो
वेळ गेल्यावर पुन्हा माझे मला आले हसू
काय होतो मी, स्वतःला काय समजत राहिलो
कल्पवृृृक्षाला सहज मी सोडले नाही कधी
कल्पनाशक्तीच त्याला जास्त मागत राहिलो
https://kulkarnibhushan.wordpress.com/2021/02/27/thipke/