चला फोटो काढूया : कोणता कॅमेरा वापरू ?

Submitted by याकीसोबा on 29 August, 2022 - 21:05

चला फोटो काढूया : कोणता कॅमेरा वापरू ?

नमस्कार,

नुकतीच एका प्रचि धाग्यामध्ये फोटो काढण्याबद्दल एक स्वतंत्र धागा असावा अशी चर्चा झाली त्यामुळे हा धागा काढत आहे. आधीपासून असा स्वतंत्र धागा असल्यास मला त्याची कल्पना नाही.

मी एक हौशी फोटोग्राफर असून गेली काही वर्षे निरनिराळी उपकरणे वापरून फोटो काढत आहे. यात कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा, DSLR आणि सध्या मोबाईल फोन हि उपकरणे येतात.

नोकरीला लागल्यावर पहिल्या (आणि अख्ख्या) पगारात माझा पहिला कॅमेरा canon powershot sx100 घेतला होता. त्या वेळी त्यात असलेलं 10x ऑप्टिकल झूम ही काहीच्या काही भारी गोष्ट होती. हा कॅमेरा मी अक्षरशः रोज आणि प्रत्येक ठिकाणी घेऊन फिरायचो. इंटरनेटवर फोटोग्राफी आणि कॅमेरा सेटिंग्स याबद्दल बरेच लेख वाचून ते प्रयोग कॅमेरा वापरताना करून बरंच काही शिकायला मिळालं. पुढे काही वर्षांनी canon चाच DSLR (EOS 600D) घेतला आणि मग आणखी प्रयोग.

गेली काही वर्ष बराच विचार आणि अभ्यास करून हे वजनदार प्रकरण वापरण्याऐवजी मोबाईल वापर करून बघू असे ठरवून तीनएक वर्षांपूर्वी फोटोग्राफी हे मूळ उद्दिष्ट ठेवून आयफोन 11 हा मोबाईल घेतला. तेव्हापासून त्यातूनही बरंच कायकाय शिकायला मिळत आहे.

ही माझ्या प्रचि छंदाबद्दल थोडीशी माहिती.

आता मला आजपर्यंत पडलेले काही प्रश्न आणि मलाच माझी सापडलेली काही उत्तरे

प्र. कोणते उपकरण फोटोग्राफीसाठी उत्तम आहे ?
उ. ज्यातून फोटो काढता येऊ शकतो असं कोणतंही उपकरण फोटोग्राफी शिकायला पुरेसं आहे असं मला वाटतं. जसजसं आपल्याला यातील वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतात, तसं आपोआप आपल्याला आपली आवड, आपल्यासाठी कोणतं उपकरण उपयुक्त आहे इत्यादी गोष्टी लक्षात येत जातात.

प्र. DSLR नेच उच्च प्रतीचे आणि उत्तम फोटो येतात का ?
उ. या प्रश्नाचं उत्तर खरं तर व्यक्तिसापेक्ष आहे असं मी म्हणेन. तसं बघायला गेल्यास या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी हो असंच म्हणायला लागेल. दिवसागणिक अनेक उत्तम फीचर्स असलेले DSLR बाजारात येत आहेत. आणि ही उपकरणं केवळ आणि केवळ फोटो/व्हिडीओ काढण्यासाठीच बनवलेली असल्यामुळे त्यातून काढलेल्या फोटोजची सर ही इतर कशाला येईल असं म्हणता येत नाही.
- परंतु, बरेच जण याचा गैरअर्थ घेऊन "चांगले" फोटो काढायचे म्हणजे एक DSLR घेतला की आपलं काम झालं ह्या गैरसमजात असतात. आजच्या काळात पूर्वीच्या मानाने हे कॅमेरे विकत घेणंदेखील फारसं अवघड राहिलेलं नाही. "मी आजपासून फोटोग्राफी करणार" असं ठरवून लगेच DSLR विकत घेतला म्हणजे झालं, असं नाही. महागडे कॅमेरे घेऊन फोटो मात्र ऑटोमेटिक मोडवर काढायचे आणि फोटो छान आले नाही कि कॅमेऱ्यात फॉल्ट दिसतोय म्हणायचं ही बऱ्याच हौशी छायाचित्रकारांची तक्रार दिसते.

--------------------------------------------------------------------------

- उपकरण निवडताना लक्षात घेण्याच्या काही गोष्टी
- मी वर लिहिल्याप्रमाणे DSLR चा वापर हा व्यक्तिसापेक्ष असून उदाहरणार्थ व्यावसायिक फोटोग्राफी क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी DSLR ला पर्यायच नसतो असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना त्यातून अपेक्षित असलेली क्वालिटी, फोटोजचं आऊटपुट (raw file) यांसारख्या गोष्टींवर त्यांचा पूर्ण भर असतो.
- याउलट हौशी फोटोग्राफर्सना मात्र कॅमेऱ्यांमध्ये निवड करण्यासाठी बऱ्यापैकी जास्त वाव असू शकतो. आता खिश्यात मावणारे, हलक्या वजनाचे आणि व्यक्तिगत वापरासाठी उत्तम दर्जाचे कॅमेरे बाजारात आहेत. यातील बऱ्याच मॉडेल्स मध्ये एखाद्या DSLR मध्ये उपलब्ध असतात तसे मॅन्युअल मोड देखील दिलेले असतात.
- मोबाईल कॅमेरेदेखील याबाबतीत मागे नाहीत. बरीच मॅन्युअल ऑप्शन्स, उत्तम दर्जाचे फोटोज काढण्यासाठीचे सेन्सर्स हे आता भरपूर मोबाईलमध्ये उपलब्ध असतात. त्याचबरोबर यांमुळे हौशी फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी एक स्वतंत्र डिव्हाईस बाळगायची गरज शिल्लक राहत नाही.
- लास्ट बट नॉट द लीस्ट म्हणजे DSLR. हे कॅमेरे आधीच नमूद केल्याप्रमाणे फोटो काढण्यासाठी सर्वोत्तम म्हटले जाऊ शकतात परंतु प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचा वापर करावा कि इतर कॅमेरे वापरावेत हे ठरवावं. यात बऱ्याच बाबी येऊ शकतात जसे कि
- किंमत: आजकाल DSLR देखील पूर्वीसारखे दुर्मिळ किंवा केवळ लग्नसमारंभात असलेल्या फोटोग्राफर्सनेच वापरायची वस्तू राहिली नसून हटकून बऱ्याच लोकांकडे दिसतात. प्रत्येकाने आपापल्या हौसेप्रमाणे यावर किती खर्च केला जाऊ शकतो हे गणित मांडणे योग्य ठरेल. कारण नुसता DSLR घेऊन खर्च तिथे थांबत नाही तर आपल्याला ज्या प्रकारचे फोटो काढायची इच्छा असेल त्या प्रकारचे फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लेन्सदेखील स्वतंत्र विकत घ्यायला लागू शकतात. सामान्यपणे कॅमेरा घेताना त्याबरोबर येणारी लेन्स हि सामान्य वापरासाठी उपयुक्त असते पण लेन्सेसचे काही विशिष्ट प्रकार उदा. प्राईम, झूम, वाईड अँगल इ. वापरून जे इफेक्टस मिळतात ते कॅमेऱ्याबरोबर मिळणाऱ्या लेन्समधून मिळणं शक्य होत नाही.
- आकार आणि वजन: DSLR कॅमेरे हे सामान्यतः इतर कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यांच्या तुलनेत आकाराने मोठे आणि जड असतात. आता बाजारात तुलनेने हलके मिररलेस कॅमेरेसुद्धा आले असले तरी कोणत्याही कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यापेक्षा ते मोठेच असावेत. आपण हौस म्हणून हा कॅमेरा कुठेही घेऊन फिरू शकतो का हा विचार प्रत्येकाने ज्याचा त्याचा करायला हवा.
- विविध फंक्शन आणि मोड्स: मॅन्युअल, ऍपर्चर, प्रोग्रॅम आणि असे वेगवेगळे मोड वापरून फोटोज काढायची मुभा एक DSLR देतो. फक्त ते कधी, कुठे आणि कसे वापरावेत हे पूर्णपणे कॅमेरा वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातात आहे. या गोष्टींची माहिती नसेल तर आपण DSLR चा पुरेपूर वापर करत नसतो. लक्षात घ्या, दर वेळी हे मोड्स वापरलेच पाहिजेत असं मी म्हणत नाहीये परंतु मी आत्ता अमुक अमुक मोड्स वापरून एकच फोटो इतक्या प्रकारे काढू शकतो हे आपल्या मनात स्पष्ट असलं तर उत्तम. यावर मार्ग एकच आणि तो म्हणजे फोटोग्राफीच्या बेसिक गोष्टी आणि कॅमेरा सेटिंग्सचा अभ्यास.

आता फोटोग्राफीच्या बेसिक गोष्टी आणि कॅमेरा सेटिंग्सचा अभ्यास म्हटल्यावर एखाद्याला कधीकधी असं वाटू शकतं कि मला केवळ छंद/आवड म्हणून फोटो काढायचे आहेत तर मी ह्या गोष्टींमध्ये पडावे का ? पण खरंच सांगतो, हे काही खूप क्लिष्ट अथवा किचकट नाही परंतु थोडीफार कल्पना आल्यास आपलेच फोटो आपण जरा वेगळ्या पद्धतीने काढून बघायला लागतो आणि आपल्यालाच फरक जाणवू लागतो.

तात्पर्य: डिजिटल कॅमेरा, DSLR आणि मोबाईल या सर्व उपकरणांचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. आपण एकएक करून सर्वांना पुरेसा वेळ दिल्यास आपण आपल्यापुरता निर्णय घेऊ शकाल.

लेख जरा लांबला असं वाटतंय त्यामुळे सध्या इतकंच.

--------------------------------------------------------------------------

मला शिकायला मदत झालेल्या काही लिंक्स खाली देत आहे.

फोटोग्राफी बद्दलच्या बेसिक संज्ञा आणि त्यांचे अर्थ :
https://digital-photography-school.com/digital-photography-tips-for-begi...

कॅमेरा सेटिंग बदलून कोणते इफेक्ट कसे मिळवता येतात यासाठी हा एक उत्कृष्ट सिम्युलेटर आहे :
http://www.canonoutsideofauto.ca/play/

यासारख्या असंख्य वेबसाईट्स/युट्युब चॅनेल्स आपल्याला पाहिजे ती माहिती देण्यास सज्ज आहेत. एकदा सर्च करत गेलात कि आपोआप एकेक सापडत जातील.
--------------------------------------------------------------------------

टीप : मी एक हौशी फोटोग्राफर असून मला फोटोग्राफीबद्दल जी काही मोडकीतोडकी माहिती आहे ती वेगवेगळ्या वेबसाईट्स, लेख, युट्युब व्हिडिओज आणि हे सर्व बघून/वाचून स्वतः केलेले प्रयोग यावर आधारीत आहे. मला अजून खूप काही शिकायचं शिल्लक आहे आणि कायमच काही ना काही शिल्लक राहील. सर्वांनी या विषयावरची आपापली मतं, सल्ले, काही उपयुक्त लिंक्स असल्यास नक्की शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

आवडला लेख. मोबाईल मध्ये झूम वापरलं कि फोटो चा दर्जा घसरतो असे वाटते (one प्लस 5 / आय फोन 6s) यावर काही उपाय आहे का? Online काही क्लिप ऑन स्वरूपाच्या लेन्सेस मिळतात त्याचा उपयोग होतो का?

Dhanyawad

@मोद.. धन्यवाद

कोणत्याही डिव्हाईसमध्ये (मोबाईल किंवा डिजिटल कॅमेरा) डिजिटल झूम केलं कि फोटोचा दर्जा घसरतो हे खरं आहे. कॅमेऱ्यातून ऑप्टिकल झूम म्हणजे खरोखर लेन्सेस पुढे मागे करून जे झूम होतं केवळ त्यामध्ये दर्जा तितका घसरत नाही.

मोबाईलसाठी चांगल्या दर्जाच्या क्लिपऑन लेन्सेस मी स्वतः वापरून पाहिलेल्या नाहीत. साध्या वापरून पाहिल्या पण त्यातून अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. moment सारख्या कंपनीच्या क्लिपऑन लेन्सेस वापरून काढलेले फोटो/व्हिडीओ बरेच चांगल्या दर्जाचे वाटतात.

@_उदय...
अतिशय उपयुक्त लेख आहे

साधा सोपा आणि छोटासा लेख आवडला.
शिवाय
सर्वांनी या विषयावरची आपापली मतं, सल्ले, काही उपयुक्त लिंक्स असल्यास नक्की शेअर करा.
हे फा र आवडलं.

मोबाइलच्या क्याम्रात ओप्टिकल झूम असले की किंमत आणखी वाढवतात. त्यापेक्षा कॉम्पक्ट क्याम्रात पंधरि हजारात ते मिळालं तर तो घेईन.

छान लेख. बरीच मेहनत घेत आहात हे दिसून येते. शुभेच्छा!
छंद म्हणून फोटोग्राफी करत असला तरी आपल्याला कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करायची हे एकदा पक्के केले की कॅमेरा आणि लेन्स निवडणे सोपे जाते. तरीही ५० mm आणि 135 mm दोन्ही प्राईम लेन्स विविध प्रकारच्या फोटोग्राफीच्या बऱ्याचशा गरजा पूर्ण करू शकतात. खूप महागड्या ( 2 लाखाच्या पुढे ) , आणि ऑब्जेक्टच्या जवळून फोटो काढावे लागणे ह्या मर्यादा आहेत. परंतू डोळ्याचे पारणे फेडतील असे फोटो काढण्याची क्षमता आहे ह्या दोन्ही लेन्स मध्ये.
माझ्याकडे ' प्रॅक्टिका ' चा एसएलआर (फिल्म ) कॅमेरा होता आणि प्राईम लेन्स होत्या ( 50 mm 1.8, 135 2.8) . खूप कमी प्रकाशात फ्लॅश न वापरता फोटो काढले होते. १०० , २00 आणि ४०० आयएसओ ह्या व्यतिरिक्त कोणत्याच स्पीडच्या फिल्म वापरल्या नाहीत. १०० आयएसओ माझी आवडती फिल्म. एन्लार्ज केलेले फोटो फाटत नसत. स्पोर्ट्स किंवा वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करायची नसल्याने झूम लेन्स घेतली नव्हती. आताच्या Cannon DSLR बरोबर झूम मिळाली आहे परंतू फार वापर केला नाही. अजूनही ५० mm च वापरतो.

@अज्ञानी...
हो नक्कीच... सॉरी, खरं पाहता वरच्या लेखात जिथे जिथे मी डिजिटल कॅमेरा लिहिलंय, तिथे मला पॉईंट अँड शूट अभिप्रेत आहे...

आत्तापर्यंत मी पॉईंट अँड शूटवर जेवढे फोटो काढले आणि प्रयोग केले आहेत बाकीच्या दोनवर (DSLR /मोबाईल) त्या मानाने कमी असतील. एखादा हायएन्ड पॉईंट अँड शूट कॅमेरा वापरताना आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी (झूम, वाईड अँगल, मॅक्रो इ.) हा एकच कॅमेरा वापरून करू शकतो. आणि त्यासाठी वेगवेगळ्या लेन्स बाळगाव्या लागत नाहीत. तसेच ह्यात मॅन्युअल मोड्स उपलब्ध असतील तर थोडेफार DSLR च्या जवळ जाणारे प्रयोगदेखील करता येतात.

बाकी मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एखादा कॅमेरा वापरून जितके जास्त फोटो आपण काढत जाऊ तसातसा आपोआप तो कॅमेरा आपल्या "हातात बसत" जातो.

@Srd...
धन्यवाद... मोबाइलपेक्षा ऑप्टिकल झूम असलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा कधीही चांगले रिझल्ट देईल...

@आग्या१९९०
धन्यवाद.
खरंय... DSLR घेतल्यानंतर बहुधा ९०% लोकांची पुढची खरेदी म्हणजे ५०mm प्राईम लेन्स असावी. आणि खरोखर त्यावर येणाऱ्या फोटोजना (खास करून पोर्ट्रेट्स) तोड नाही. माझ्याकडे १८-५५ व्यतिरिक्त असलेली हि एकच लेन्स आहे.

बाकी फिल्म कॅमेरा वापरण्याचा मला शून्य अनुभव असला तरी आत्ताचे कॅमेरे वापरल्यामुळे फिल्म कॅमेरे वापरत असताना त्यात केवढी जास्त चॅलेंजेस असतील हि कल्पनाच करणं अवघड आहे.

छान लेख याकीसोबा.
विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद
ईथे येणारे प्रतिसादही उपयुक्त ठरतील. वाचतोय...

छान लिहिलं आहे.

मिररलेस/ डीएसएलआर विकत घेणे आणि महाग लेन्सेस विकत न घेता, लागतील तेव्हा भाड्याने घेणे हा एक पर्याय असतो. मी करते तसं कधीकधी. कॅमेराही भाड्याने मिळतो अर्थात. तात्पुरता भारीपैकी कॅमेरा हवा असेल, तर तसंही करता येईल.

छान लेखमाला. तुमचे सदस्यनाव पण या विषयासाठी अनुरूप !
लेखातील माहिती माझ्यासाठी सामान्यज्ञान म्हणून उपयुक्त. बाकी आता मोबाईल व्यतिरिक्त मुद्दामहून अन्य कशाने फोटो काढणे होणे नाही.

माझ्या विद्यार्थी दशेतील काही आठवणी :

घरी एक जुना Cintagon Argus या नावाचा मॅन्युअल कॅमेरा होता. वजनाला जड. Aperture/ शटर speed या गोष्टी एक चक्र हलवून आपणच लावाव्या लागत.
त्याला एक B नावाचे पण बटन होते. ते दाबून ठेवले की ठराविक सेट केलेल्या वेळासाठी त्यात प्रकाश सतत येत राही. या प्रकारे चंद्राचे फोटो काढण्याचे उद्योग केले होते ! अर्थात त्यांचा दर्जा यथातथाच होता.

त्याकाळी हा छंद स्वस्तात बसावा म्हणून अनेक लटपटी केल्या जात. चित्रपट निर्मात्यांनी न वापरलेल्या जुन्या फिल्म अगदी कमी भावात कुठेतरी उपलब्ध असायच्या. माझा एक मित्र त्या घेऊन येई.

36 फोटो काढून झाले की मग एक बटन दाबल्यावर फिल्मचा रोल पुन्हा एकदा उलटा फिरून त्या रिळात जाई. मग कॅमेरा उघडून तो बाहेर काढावा लागे. नंतर ते बटन बिघडले. मग सगळे फोटो काढून झाल्यावर आपण कॅमेऱ्यासकट पांघरूण घेऊन गुडूप अंधारात जायचे आणि मग तो रोल हाताने फिरवून रिळात घालायचा. असे पण केल्याचे आठवते
अशा त्याकाळच्या गमतीजमती.

त्याला एक B नावाचे पण बटन होते. ते दाबून ठेवले की ठराविक सेट केलेल्या वेळासाठी त्यात प्रकाश सतत येत राही.
माझ्या फिल्म कॅमेरात B mode ( bulb) बटन वर अशी वेळेची सेटिंग नव्हती. जितका वेळ शटर बटन दाबून ठेवाल तितका वेळ कॅमेऱ्याचे शटर ओपन राहायचे. ह्याचा उपयोग मी कमी प्रकाशात १०० आयएसओ फिल्म वर फोटो काढण्यासाठी वापर करायचो. त्यासाठी ट्रायपॉड आणि बटन दाबून ठेवण्यासाठी रिलीज केबल वापरायचो.

कॅमेऱ्यासकट पांघरूण घेऊन गुडूप अंधारात जायचे आणि मग तो रोल हाताने फिरवून रिळात घालायचा.
हा उद्योग मी फिल्म लोड करताना करायचो. अंधारात स्पुलमध्ये फिल्मचे फक्त टोक अडकवायचे आणि कॅमेऱ्याचे झाकण बंद करून फिल्म पुढे गुंडाळायची. ३६ च्या रोलमध्ये ३९ फोटो सहज काढता यायचे.

यकिसोबा
पुन्हा धन्यवाद ह्या धाग्यावर
@उदय
मिपा लेख खूप छान उदाहरणासहित...धन्यवाद

छान लेख
मी माझा कॅनॉन 550डी घेऊन भरपूर भटकंती केली आहेत, ट्रेक्स केलेत, सायकल एक्सपीडिशन, हिमालयीन ट्रेक्स सगळं केलं
पण आता मला ते लोढणे घेऊन फिरायचा सिरियसली कंटाळा आला आहे
सध्या मोबाईल कॅमेरा ची क्वालिटी बघता त्यातच इन्व्हेस्त कराव असं वाटत आहे

लेखात दिलेल्या डीएसलर च्या सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन
लोकं अपरचर मोड किंवा मॅन्युअल ला जाऊन फोटो काढायचे धाडस करतच नाहीत किंवा कंटाळा करतात
थोडीशी मेहनत घेतली तर समजण्यासाठी फार अवघड नाहीये तो विषय

@ऋन्मेऽऽष, अभि_नव, वावे, कुमार१, manya, आशुचँप, त्रिशंकू
धन्यवाद... आपणदेखील आपापले अनुभव/सल्ले देत रहा.

@कुमार१, आग्या१९९०
फिल्म कॅमेराजचे अनुभव मस्तच...

@आशुचँप
550डीच्याच मागे होतो मी... फक्त कॅमेरा घेणेबल परिस्थिती होईपर्यंत 600डी आला होता नवीन...
लोढण्याबद्दल म्हणाल तर म्हणूनच मी मोबाईलवर शिफ्ट झालो आहे...

मी पण ५५० डी वाला आहे!!
तो घेतला तेंव्हा मिररलेस कॅमेरे येणार आणि ट्रॅडिशनल DSLR चे मार्केट झोपवणार अशी हवा होती
मिररलेस चा कुणाला अनुभव आहे का?
सध्या फक्त कुठे ट्रीपला वगैरे जाणार असेल तरच फोटोसाठी DSLR वापरतो इतरवेळी मोबाईलच जास्त हॅन्डी वाटतो

माझ्याकडे सोनी अल्फा 6000 हा मिररलेस आहे.
घेतल्या घेतल्या पहिल्या काही दिवसांमध्ये मी लेन्स बदलत असताना धुळीचा कण आत गेला (असावा). फोटो काढताना लक्षात आलं. सोनी सर्व्हिस सेंटरला कायमस्वरूपी सर्व्हिसिंग मोफत आहे. त्यांनी सेन्सर स्वच्छ करून दिला. डीएसएलआरमध्ये लेन्स काढल्यावर सेन्सर थेट समोर नसतो (मिरर असल्यामुळे). मिररलेसमधे मिररच नाही, त्यामुळे थेट सेन्सर समोर येतो. (त्यामुळे जास्त जपायला हवं असं मला वाटलं. सर्व्हिस सेंटरवाले असं काही म्हणाले नाहीत)
बाकी फोटोच्या गुणवत्तेचा प्रश्न नाही. टेलिलेन्स घेतली तर ती कॅमेऱ्याच्या मानाने फार जड होते. पण त्याचं एवढं काही नाही.

मस्त धागा, सावकाश वाचेन, मी पॉईंट अ‍ॅन्ड शूटची कायमस्वरुपी फॅन आहे. डीएसएलआर मला जमण्यासारखे नाही.
मी आतापर्यंत Nikon P600, Canon PowerShot SX60 HS, Panasonic Lumix FZ80 वापरुन पाहिलेत, त्यापैकी निकॉन वरुन माझे फोटो फार चांगले निघाले.
P600 हे मॉडेल आता उपलब्ध नाही, म्हणून आता मी नुकताच Nikon coolpix B600 ऑर्डर केलाय बघूया कसा आहे ते.

@वावे
मिररलेसबद्दल मला शून्य अनुभव आहे... तुम्हाला काय काय फरक जाणवले ? (पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह)
माझ्या ओळखीचे एक व्यावसायिक फोटोग्राफर काही वर्षांपूर्वी Canon ५D वरून Sony alpha ७ वर शिफ्ट झाले तेव्हापासून Sony मिररलेस बद्दल कुतूहल आहे...

@वर्षा
तुम्ही एकसे एक कमाल हाय झूम कॅमेरे वापरले आहेत की... खूपदा DSLR काढून Canon PowerShot SX60 HS घ्यावा का असा विचार मनात यायचा (अजूनही येत असतो) पण सध्या मोबाईलवर बऱ्यापैकी काम होतं त्यामुळे सिरिअसली विचार करत नाही. अर्थात झूम हा माझा आवडता फॅक्टर आता खूप दिवस मिस करतोय मी...

सोनीचे vlogging camera क्याम्रे फार डिमांड मध्ये आहेत म्हणे. कारण फोटो काढून करायचं काय हा प्रश्न. यूट्यूबवर चानेल टाकणे हे प्रकरण जोर पकडत आहे.