धार्मिक-साहित्य

दत्त धावतो गर्दीत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 August, 2019 - 09:49

दत्त धावतो गर्दीत
दत्त दिसतो वर्दीत
दत्त उगाच गुर्मीत
जाब मागे

दत्त घुसतो डब्यात
दत्त राही लटकत
दत्त चाले ढकलत
दाराकडे

दत्त सिग्नली धावतो
दत्त भिक्षेकरी होतो
दत्त दत्ता धुत्कारतो
गूढ मोठे

दत्त दप्तरी दाखल
दत्त वाहतोय माल
दत्त हप्त्याचा दलाल
रोज ठाम

दत्त दत्ताला ओळखी
दत्त दत्ताला नाकारी
दत्त दत्ताची चाकरी
करू जाणे

दत्त विक्रांत मनात
दत्त व्यापून जगात
दत्त सागर थेंबात
सामावला

स्वीकारले जीणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 August, 2019 - 13:30

स्वीकारले जीणे
आहे तैसे दत्ता
जगता जगता
जाय पुढे

दुःखाचे ओझे न
सुखाची काळजी
रित जगण्याची
जाणियली

केवढा हा पसारा
सांभाळसी प्रभू
माझी मात सांगू
काय तुला

घडावे स्मरण
तुझे प्रेम भरी
तेणे उपकारी
सुखीया मी

आणिक ती काही
वांछा मनी नाही
सारे तुझ्या पायी
वाहीयले

शब्दखुणा: 

ॐ नमो ज्ञानेश्वराय ।

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 July, 2019 - 09:07

‍ॐ नमो ज्ञानेश्वराय ।
दिव्य स्वयंप्रकाशाय।
महानंदस्वरुपाय।
चिद्घनमुर्ते॥

मी बालक तुझा नेणता ।
ना कळे मार्ग चालता।
धरुनिया तू हाता ।
ने ई गे माय॥

घोर या संसार वनी ।
पडलो मी येऊनी ।
कडेवर घेऊनी ।
नेई गे माये ॥

कर्म काही कळेना ।
स्वधर्म हाती येईना ।
अंधकार मिटेना ।
सांभाळ गे माय ॥

भक्तीचीया वाटा।
नेई मज आता ।
पांगुळ मी पडता ।
चालवी गे माये ॥

विक्रांत हा भ्रमाला।
मायेत या अडकला ।
तव प्रेमा आसावला।
धाव गे माये ॥

शब्दखुणा: 

माता शारदा ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 28 July, 2019 - 10:23

करतो मी स्तुती
माता शारदेची
माझ्या जीवनाची
सर्वस्व जी II

हंसवाहिनी ती
विद्येची देवता
व्यापूनिया चित्ता
राही सदा II

तिच्या वीणा नादी
ॐ कार गुंजती
लक्ष प्रकाशती
सूर्यकण II

आई अधिष्ठात्री
चौदाही विद्येची
चत्वार वाचेची
जननी जी II

तिचा प्रसादाने
साहित्याची लेणी
आकाश भरूनी
मूर्त होती II

शुभ्र कमलासना
मूर्त शुचिता जी
मज मती माजि
वास करो II

विक्रांत नेणते
लेकरू मी तिचे
आजन्म विद्येचे
स्तन्य मागे II

शब्दखुणा: 

वारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 July, 2019 - 11:33

वारी
***

सर्वव्यापी सनातन
ज्ञानदेव पुरातन
पंढरीसी येणं जाणं
एकपणी रसपान

जाणीवेच्या मातीमध्ये
उगवणे जागेपण
अवकाश व्यापूनिया
विरलेले देहभान

पादुकांची स्पर्श भेट
जोडणारे जनमन
एका भाव एक ध्यास
लाखो चालती चरण

चालण्याच्या सोहळयात
जन्म जगण्या वेढून
वाटेचे निमित्त फक्त
आत स्थिरावला क्षण

चाल बापा त्या पथाने
स्वरूपात मुरलेला
वाहणारे पाय वाहो
शब्द थांबो चाललेला

शब्दखुणा: 

गिरनार पौर्णिमा.

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 July, 2019 - 13:45

गिरनार पौर्णिमा.
*************
शुभ्र चांदण्यात
लख्ख पायवाट
रुपे पावलात
पसरले ॥

व्यापून नभास
शुभ्र पूर्ण चंद्र
भरला आनंद
पर्णो पर्णी ॥

दूरवर कुठे
गुरूंची शिखर
पदपदावर
परी भेट .॥

भोवती लहरी
वायूच्या नाचती
जणू की सांगती
चाल पुढे ॥

घडले दर्शन
पुण्य आरतीत
दाटे अंतरात
उजेड तो ॥

कुणी दिली भेट
कळे ना कुणास
विक्रांत पूर्वेस
सूर्य झाला॥

परानुभूती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 July, 2019 - 13:13

परानुभूती
*******

अधाशी मनाला
उन्मनी वाटली
नशा काही केली
दुसऱ्याची

परी काही केल्या
जाईना तो तोल
सरेना नि बोल
अडकला

फुकटची नशा
चढत नसावी
इथली असावी
रित काही

आणि खिसा खाली
नाहीं छण छण
कलाल कुठून
काय देई

जावे खाल मानी
इथून निघून
तोंड लपवून
ऐसे होते

झिंगल्याचा भास
हरवून जाता
तुज दारी दत्ता
पुन्हा आलो

सतरावीचे स्तन्य
देई मज दत्ता
तुर्येच्या अमृता
पान करी

शब्दखुणा: 

नेई मज दत्ता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 July, 2019 - 12:00

नेई मज दत्ता
****************
नेई मज दत्ता
पुन्हा चांदण्यात
पुन्हा पावलात
स्वर्ग नांदो ॥

पुन्हा माथ्यावरी
झळाळो तो चंद्र
ओघळावा सांद्र
तुही मनी॥

तीच लवलव
हिरव्या पानात
चंदरी रसात
दिसू दे रे ॥

कभिन्न कातळी
हरूनियां भान
माझे हे मी पण
जाऊ दे रे ॥

दरीतला वारा
येऊ दे भरारा
मनाचा पिसारा
फुलू दे रे ॥

साद कानांवर
जय गिरनार
पुन्हा एकवार
पडू दे रे ॥

लोभस ती मूर्ती
दिसू दे चरण
डोळ्यात भरून
पाहू दे रे ॥

शब्दखुणा: 

नेमिनाथ देरासरी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 June, 2019 - 11:26

नेमिनाथ देरासरी
*****************
गिरनार पर्वता वर पहिल्या सपाटीवर भ.नेमिनाथ देरासार आहे . परमेश्वर हिंदू जैन बौद्ध असा नसतो . किंबहुना दत्त, नेमिनाथ हा भेद आमच्यासाठीच आहे .एक गिरनार तत्व तिथे संपूर्ण स्वयंभू सर्वव्यापी आहे .तिथे आलेला हा सुंदर अनुभव .
***************
नेमीनाथ देरासरी
होता ऊर्जेचा सागर
खाली नमिता श्रद्धेने
माझी भरली घागर ॥

मूर्त उदार गंभीर
लखलखीत सावळी
मंद प्रकाशात पित
दिसे सुवर्ण झळाळी ॥

शांत भगिनी समोर
जणू प्रत्यक्ष विरक्ती
लाख आशिष भेटले
तया पदी जाता दृष्टी ॥

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य