वारसदार! - भाग ४ - साधन की साध्य?

Submitted by महाश्वेता on 12 July, 2019 - 07:58

या भागाला 'साधन की साध्य?' किंवा 'नागणेशी!' अशी दोन नावे सुचत होती.
वाचकांनी सांगावं की नेमकं कोणतं नाव चांगलं वाटतंय.
आणि माझा टायपिंगचा स्पीड प्रचंड स्लो असल्याने भाग बहुतेक छोटे होतील, म्हणून दिलगिरी व्यक्त करत आहे.

वारसदार! - भाग ३
https://www.maayboli.com/node/70577

'एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक होता.
या नरसंहारामधून फार कमी लोक वाचू शकले. काही लोकांनी गोळ्या ऐकल्याबरोबर मेलेल्याच सोंग घेतलं आणि खाली पडले, त्यामुळे वाचले.'
---------------------------------------------------------------------------------------------------
विनायक जीव घेऊन पळत होता. त्याच्यामागे चार पाच लोक पिस्तूल घेऊन पळत होते.
पुलावर एका माणसाने गोळी झाडली, आणि विनायक भेलकांडून नदीत पडला.
"डन!" पीटर म्हणाला.
"अजून नाही. नदीत उत्तर चेक करायला." मागून आवाज आला. स्टीफन अंसूरकर धापा टाकत येत होता...
"ओके बॉस!" पीटरने नदीत उडी टाकली.
"संपला साळगावकर!" स्टीफन अंसूरकर गालातल्या गालात हसला!
गोळीचा आवाज ऐकताच गोळी लागल्याचं नाटक करून विनायकने नदीत उडी घेतली, आणि तो पाण्याखालून पोहू लागला, मात्र श्वास लागताच तो वर येत होता. हळूहळू त्याची गात्रे शिथिल पडू लागली, त्याचा दम कमी पडू लागला.
आणि मागून पीटरच्या दोन मजबूत हातानी त्याला पकडले...
विनायक त्याच्या हातातून निसटण्याची क्षीण धडपड करू लागला.
पीटरने त्याला नदीकिनारी आणले, आणि किनाऱ्यावर फेकले.
विनायक पूर्णपणे दमला होता.
"कान खोलून ऐक, तुझ्या बापाला खतम केलाय मोंझेसने, तुझ्या आईला साथीला घेऊन. तुझं घर दार सगळं गेलं. तुला काय वाटलं, मला नेम नाही? मुद्दाम चुकवत होतो, तू वाचावा म्हणून. आता आवाज ऐकल्याबरोर निपचित पडून राहा, आणि पुन्हा गोव्यात दिसू नको." पीटर एका दमात म्हणाला.
...आणि त्याने पुढच्याच क्षणी गोळी चालवली.
विनायक निपचित पडला...
------------------------------
"आणि दुसऱ्या तिजोरीत काय?" मोंझेसने विचारले.
"अरे काय नाय मोंझी. दुसरी तिजोरी रिकामी असेल. साळगावकर रिकामे खेळ करण्यात एक्सपर्ट होता." व्हिन्सी चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणाली.
"मग तूच ओपन कर तिजोरी व्हिन्सी, तूच खेळ." मोंझेसच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य होतं.
विंसीला आता मोंझेसच्या अविश्वासाची पूर्ण जाणीव झाली होती.
ती पुढे झाली, आणि दोन्ही तिजोऱ्यांचं निरीक्षण करू लागली.
पहिल्या तिजोरीवर उजव्या सोंडेचा गणपती, एक सुळा अर्ध्यावर तुटलेला, मात्र दुसरा सुळा प्रचंड मोठा आणि वेडावाकडा चितारलेला. मुकुटावर मण्याच्या जागी सर्पमुख, हातात चंद्रकोरीची तलवार, रागीट मुद्रा, आणि पोटावर व्याघ्रचर्म...
साळगावकरांची कुलदेवता...
दुसऱ्या तिजोरीवर दोन माणसं, एकाच मुख नागाचं, तर दुसऱ्याच शरीर नागाचं. राहू, केतू!
'राहू केतू अरिष्ट आणणारे ग्रह. ही तिजोरी नसावीच,' म्हणून व्हिन्सी दुसऱ्या तिजोरीकडे वळली आणि चावीने तिजोरी उघडू लागली.
तिजोरी उघडली नाही.
"व्हिन्सी, काय झालं."
"मोंझी, वेट." विंसीने तीच चावी दुसऱ्या तिजोरीला लावली, आणि फिरवून बघितली, चावी बरोबर लागली.
म्हणजे या तिजोरीवर त्या तिजोरीची चावी, आणि त्या तिजोरीवर या तिजोरीची चावी!
'साळगावकर, एका क्षणात तू सगळा खेळ गुंतागुंतीचा केलास.'
म्हणजे तिजोरीवरची चिन्हे तिजोरीकडे निर्देश करत होती, कि चावीकडे?
विंसी पुन्हा दोन्ही तिजोऱ्यांचं निरीक्षण करू लागली.
'साळगावकर, काहीतरी इशारा दिलाच असशील तू,' विंसी विचार करू लागली...
...आणि अचानक तिला साळगावकरने सांगितलेली गोष्ट आठवली!
ती हसून मोंझीकडे वळली. "मोंझी एक गोष्ट ऐकायचीय?"
"विंसी काय?"
एकदा गणपती, कार्तिकेय आणि शंकर दोन्हीही कैलासावर बसले होते. कैलासपती म्हणाले, गणेश, तू बुद्धिचातुर्याच्या जोरावर मागचं कार्य जिंकलास. पण बुद्धीबरोबर आत्मबलही महत्वाचं असत. तर आज तुम्ही दोघांनी तुमच्या आवडत्या वाहनावर बसून तीन पृथ्वीप्रदक्षिणा करायच्या आहेत. गणेश, मागच्या वेळेसारखी चलाखी चालणार नाही.
कार्तिकेय मोरावर बसून निघाले. गणपती सरळ विष्णूदेवांकडे गेला, व गरुडाला विनंती केली. गरुडाने उंच भरारी मारली, आणि पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारून, गणपतीला कैलासावर पोहोचवले.
थोड्यावेळाने कार्तिकेय आले, आणि गणपतीची चलाखी पाहून ते क्रोधीत झाले. मात्र गणपतीने एकच उत्तर दिले,
"दादा कुणी सांगितलं मला गरुड आवडत नाही? बाबानी तर आपलं आवडत वाहन घ्यायला लावलं होतं, नेहमीच वाहन नाही."
शंकर हसले, आणि दोघांना जवळ घेत म्हणाले. "कार्तिकेय, कधीही साधनापेक्षा साध्य जास्त महत्वाचं असतं!"
हे ऐकून मोंझीला धक्काच बसला, आणि तो मागे सरकला.
विंसीने गोष्ट संपवली आणि म्हणाली. "मोंझी मला माझं टार्गेट आहे सोनं असलेली तिजोरी, मग त्यासाठी साधन कुठलंही असू दे. म्हणजे, चावी कुठलीही असू दे, तिजोरीकडेच ही चिन्हे निर्देश करतायेत..."
विंसी झटक्यात पुढे आली, आणि तिने गणपतीच्या तिजोरीच दार उघडलं...
विद्युतवेगाने सळसळ करत एक मण्यार बाहेर आला... आणि त्याने विंसीला दंश केला...
विंसी जागीच कोसळली. तो मण्यार मोंझेसच्या दिशेने जाणार तेवढ्यात मोंझेसने त्याच्यावर गोळी चालवली...
वळवळ करून तो मण्यार जागीच शांत झाला.
'साला, नागाचं विष पितो मोंझेस." मोंझेसने बंदूक आत ठेवली.
"मोंझी, मला वाचव..." विंसी कळवळत होती.
"तुझी निवड चुकली विंसी, तिजोरीची आणि माणसांचीही..."
------------------------------------
"मोंझेस तुला एक स्टोरी सांगतो," साळगावकर बारमध्ये पूर्ण झिंगला होता.
"साला याला आज जास्तच झालीये वाटत," स्टीफन मोंझेसला म्हणाला.
"बोल साळगावकर."
'आमचे गॉड म्हणजे, गणपती, कार्तिकेय आणि शंकर दोन्हीही कैलासावर बसले होते. शंकर म्हणजे या दोघांचे बाप. ते म्हणाले, गणेश, बॉस तू डोक्यालिटीच्या जोरावर मागचं काम केलं. पण डोक्याबरोबर पावरही महत्वाची असते. तर आज तुम्ही दोघांनी तुमच्या फेवरीट वाहनावर बसून तीन पृथ्वीप्रदक्षिणा करायच्या आहेत. गणेश, मागच्या वेळेसारखी चलाखी चालणार नाही.
कार्तिकेय मोरावर बसून निघाले. गणपती सरळ विष्णूदेवांकडे गेला, व त्यांचा वाहन गरुडाला विनंती केली. गरुडाने उंच भरारी मारली, आणि पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारून, गणपतीला कैलासावर पोहोचवले.
थोड्यावेळाने कार्तिकेय आला, आणि गणपतीची चलाखी बघून चिडला. मात्र गणपतीने एकच वाक्यात त्याची बोलती बंद केली.
"दादा कुणी सांगितलं मला गरुड आवडत नाही? बाबानी तर आपलं फेवरीट वाहन घ्यायला लावलं होतं, नेहमीच वाहन नाही."
म्हणजे मोंझी काय, कि जी गोष्ट तुम्हाला टार्गेटपर्यंत पोहोचवेल तीच निवडा. तुझ्याकडे भलेही लाखोंची कार असलं, पण समुद्रात भाऊची जुनी होडीच कामात येईल." आणि साळगावकर हसू लागला.
------------------------------------------------
"जी चावी ओरिजिनल तिजोरीकडे पोहोचवत नाही, ती काय कामाची," असं म्हणत मोंझेसने गणपतीच्या तिजोरीवरची चावी घेतली, आणि तो दुसऱ्या तिजोरीकडे वळला.
त्याने तिजोरीच दार उघडलं...
जमिनीखाली काहीतरी हालचाल झाली...
तिजोरी पूर्णपणे रिकामी होती.....
आणि पुढच्याच क्षणी एका भयानक स्फोटात संपूर्ण गोडावून उद्धवस्त झालं!!!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना ।।।खूप दिवसांनी अस खिळवून टाकणार काही वाचतेय ...लवकर येऊ द्यात !!! ,ट्विस्ट तर खतरनाक ....

साधन की साध्य?
अगदी परफेक्ट फिट होतयं

आणि तुमची कथेच्या नावापुढे प्रत्येक भागाचं स्वतंत्र न वेगळ नाव देण्याची कल्पना आवडली.

>>तुझी निवड चुकली विंसी, तिजोरीची आणि माणसांचीही...>>
खणखणीत वाक्य
खणखणीत भाग आहेत एकेक.