धार्मिक-साहित्य

गणपती बाप्पा मोरया

Submitted by मधुमंजिरी on 22 August, 2020 - 10:20

एक सांगते बाप्पा तुला, माझ्या मनीची खंत
तुझ्या आगमनाने व्हावा देवा, महामारीचा अंत।

तुझ्या इच्छेनुसार चाले, जगाचा हा रथ
का रे देवा खप्पामर्जी, कसली धाडलीस साथ?

तुझीच ना रे सारी पृथ्वी, करतोस ना रे फेरा?
तरी सुद्धा वाजले रे, जगताचे या बारा।

कशी झाली हालत बाप्पा, तुझ्याच लेकरांची
निसर्गावर मात करण्या, धावे मती मानवाची ।

साधन होता साध्य, शस्त्र झाले शास्त्र
अशी कशी फिरते बुद्धी, हाती येता अस्त्र।

गणराया, तूच दिला ना धडा हा अनमोल?
मानवाने निसर्गाशी साधावा समतोल।

नमो भालचंद्रा नमो एकदंता

Submitted by पुरंदरे शशांक on 21 August, 2020 - 23:18

नमो भालचंद्रा नमो एकदंता
गणेशा सुमुखा जनी विघ्नहर्ता
कृपा हो जयाची समाधान चित्ता
गिरीजात्मजा रे नमो बुद्धीदाता

अती साजिरी मूर्ती विघ्नाहराची
रुळे शुंडही, कोर माथा शशीची
प्रभा फाकली नेत्री ती दिव्यतेची
मुसावूनि लाभे गुणानिर्गुणाची

सुवर्णासवे रत्नभारे किरीटी
टिळा शोभलासे विशाळा ललाटी
फडत्कारी कर्णे वरी एकदंती
रुळे शुंड वेधी अती दिव्य कांती

मना निर्मळा हो जरी त्वत्कृपेने
प्रतिष्ठापना भालचंद्रा स्वयेने
अकारे उकारे मकारे मिळोनी
जसा निर्गुणी तू स्वभक्ता सगुणी

सोहम ध्वनी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 August, 2020 - 12:33

ध्वनी
*****

सोहमचा ध्वनी
आत उमटता
वृतीलागी दडा
पडे जेव्हा॥

तया त्या शून्यात
उरतो एकांत
पाहणारा आत
लीन होतो ॥

शब्दांविन शब्द
मनाला धरून
जाय उतरून
मनापार ॥

तेथे तो बहिरा
होत असे खरा
मातृकांच्या परा
जाऊ शके ॥

विक्रांता सहज
असतो कठीण
माय बापाविन
जन्म असा ॥

*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शब्दखुणा: 

बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म

Submitted by पुरंदरे शशांक on 4 August, 2020 - 15:26

बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म

जनी सज्जनी आज आनंद मोठा
अयोध्यापुरी सोहळे थोर होता
स्वये श्रीप्रभू येउनी मंदिरी या
प्रतिष्ठापिली धर्मकिर्ती ध्वजा या

बळे पेली कोदंड रक्षार्थ धर्म
झणी निर्दळी दुष्टशक्ती कुकर्म
अति प्रेमभावे स्वभक्ता सहाया
पदी राघवाच्या मनोबुद्धी काया

जनी मानसी आज संतोष मोठा
अयोध्यापुरी व्यापूनि भक्तीलाटा
जनी दावितो नित्य कर्तव्यनिष्ठा
स्मरुया गुणा राघवाच्या तदर्था

सदा अंतरी सर्वदा रामराया
जरी भाविता तोचि येतो सहाया
मुखी नाम येणे कृपा ही तयाची
समाधान हे साक्षचि जाण त्याची

पळस

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 11:00

पळस
*****
भर उन्हाळ्यात
रणरणत्या उन्हात
जात असता
उजाड रानावनातून
अचानक
त्या तपकिरी सुकलेल्या
हिरवट पिवळट झाडीमध्ये
दिसतो उठून..
पळस !
अरण्यातील संन्याशागत
स्थिरपणे उभा स्तब्ध
जणू साधनामस्त
आपल्यातच मग्न
अंगावरील काट्याचे
जीवनातील ओरखड्यांचे
हरवून भान
लावून ध्यान
प्रखर उन्हात
जणू तळपत
तपस्येच्या तेजानं
सारे आसमंत
विखुरल्या पानांचे
निष्पर्ण देहाचे
हरलेल्या लढ्याचे
असते अगतिक मूक मलुल
सारे काही हरवून
सारे काही टाकून .

कापुराची माया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 10:58

कापुराची माया
************
कापुराची माया
आगीला कळावी
समरस व्हावी
मिठी मग ॥

तैसी घडो भेटी
देवा तुझी माझी
हौस नसण्याची
पुरवावी ॥

मिठाची बाहुली
भेटावी सागरा
भेदाचा पसारा
नुरुनिया ॥

तैसे घडो काही
जिवलगा नेई
आणुनिया पाही
प्राण डोळा ॥

सरो देह भाव
जळो मन राव
निरंजनी ठाव
देई मज ॥

दत्ताचे घर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 10:55

दत्ताचे घर!
**********
माझिया दत्ताचे
घर किती न्यारें
चंद्र सूर्य तारे
छपराला ॥
माझिया दत्ताचे
दार किती न्यारे
जगताचे वारे
वाहे त्यात ॥
माझिया दत्ताचे
अंगण विश्वाचे
आकाशगंगेचे
विलक्षण ॥
माझिया दत्ताच्या
गूढ माळ्यावर
अद्भूत विवर
कृष्णमेघी ॥
माझेया दत्ताच्या
रंग तो भिंतीचा
नित्य नाविन्याचा
क्षणोक्षणी ॥
दत्ताच्या घरात
दत्ताला शोधत
राहतो फिरत
तरीसुद्धा ॥

**

राम - साहित्य : श्रवणभक्ति

Submitted by प्रगल्भ on 17 July, 2020 - 12:13

मी किंवा मनुष्यप्राण्याने धार्मिक असणं नसणं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरण दिलयं
इतर धर्माचे लोक हे त्या विशिष्ट धर्माचे कधी ठरतात तर,
त्या व्यक्ति त्या त्या धर्माचं धार्मिक कार्य करतात.
त्यांच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींच पालन करतात.
त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन त्यांच्या धर्मात देवाचं ज्या प्रकारचं स्वरूप आहे त्याची प्रार्थना करतात.

शब्दखुणा: 

वारकरी संप्रदायाचे महत्त्व

Submitted by Asu on 30 June, 2020 - 15:08

वारकरी संप्रदायाचे महत्त्व
वारी आणि वारकरी-
वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एकादशीला किंवा इतर पवित्र दिवशी जो नियमित वारी करतो, त्याला ‘वारकरी’ किंवा ‘माळकरी’ म्हणतात. आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ किंवा ‘भागवत धर्म’ म्हणतात.
वारकऱ्यांची लक्षणे-

श्री दत्त सोनार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2020 - 11:33

*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥

वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥

करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य