वारसदार! - भाग ५ - संकेत आणि सत्य!

Submitted by महाश्वेता on 18 July, 2019 - 10:02

भाग ४

https://www.maayboli.com/node/70622

"उठ रे!"
गाडीवाल्याच्या आवाजाने विनायक उठला.
खाडSSSS!
विनायकचा गाल लालेलाल झाला.
"साला ×××, बापाची गाडी आहे का तुझी? पोलिसाने चेक केलं असतं केवढ्याला पडलं असतं. चल पैसा निकाल, गोवा टू बोंबे!"
मुंबई!
या अजस्त्र सापाच्या विळख्यात विनायकचा प्रवेश झाला होता...
"पैसे... नाहीत..."
खाडSSSS!
पुन्हा एक मुस्कटात बसली.
"साला ××××!"
आणि पुढच्याच क्षणी विनायकला ढकलून तो ड्रायवर गाडीत बसून निघून गेला.
मुंबईत लोकांना भांडण संपवायलासुद्धा वेळ नसतो हेच खरं...
विनायकला फक्त आपण घाबरून पोलीच्या नाक्यावरच्या एका ट्रकमध्ये लपलो होतो हेच आठवत होतं.
आजूबाजूला चाललेला कलकलाट, गजबज, माणसांची गर्दी, धक्काबुक्की बघून तो घाबरूनच गेला. रस्त्यावर सैरावैरा फिरू लागला. कितीतरी वेळ झाली तो फिरतच होता. मात्र त्याला आता पोटातल्या भुकेची जाणीव झाली!
विनायक हा मुंबईत येणाऱ्या अनाथाचा, घरातून पळून आलेल्या, कुणी पळवून आणलेल्या प्रत्येकाचा प्रतिनिधी होता.
कितीतरी दिवस भीक मागत, टोपणे खात त्याने दिवस काढले.
एके दिवशी असाच रस्त्यावर फिरत असतांना त्याची नजर एका पाटीवर पडली.
'महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट!'
तो सरळ आत गेला. एक माणूस लोखंडी खुर्चीवर आणि टेबलावर पाय पसरून मस्त बसला होता.
विनायकचा अवतार बघूनच त्याने एका पोऱ्याला हाक मारली.
"याकूब, इसको कुछ दे दे!" त्याने पुन्हा मान मागे टेकवली.
"चिल्लर नही, काम चाहीये."
"इधर किसीको भी काम नही मिलता." त्याने न बघताच तुच्छतापूर्ण उत्तर दिले.
...आणि पुढच्याच क्षणी विनायकने गोव्यातील सगळे रूट आणि महाराष्ट्र ते गोवा सगळ्या रूटची खडाखडा माहिती सांगायला सुरुवात केली.
तो माणूस अवाक होऊन बघतच राहिला...
"मी किसीं भी नही हुं!" विनायक त्याच्याकडे रोखून म्हणाला.
आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्टमध्ये विनायकचा प्रवेश झाला...
--------
इस्माईल... इस्माईल खान, इस्माईल साहब...
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचा मालक.
इस्माईल साडेसहा फूट उंच होता, कायम पांढरा पठाणी वेष. लांब नाक, डोळ्यात कायम सुरमा, गोरा रंग, धिप्पाड!
इस्माईल तसा प्रचंड प्रेमळ होता, पण धंद्याच्या बाबतीत कायम कडक.
विनायकची थोडे दिवस सफसफाईवर नेमणूक झाली होती. मात्र कामाचा झपाटा बघून ट्रकवर क्लिनर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली, आणि नंतर तो स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करू लागला.
या सगळ्यात विनायकची राहणी बदलली, भाषा बदलली, अरे ला कारे करण्याची गुर्मी आली.
याकूब, अली, विनायक, चंद, गण्या आणि रामन ही इस्माईलची चालकांची टीम होती. सोबत क्लिनर म्हणून काही पोरं असत.
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचा पसारा प्रचंड मोठा होता. भारतभरात विनायकच्या वाऱ्या असत.
गोवा सोडून...
गोव्याच्या जखमा अजून ओल्या होत्या, आपल्या बापाला विनायक अजून विसरलेला नव्हता...
'पुन्हा गोव्यात पाऊल ठेवू नकोस...' पीटरचे शब्द अजून त्याला आठवत होते.
"विनायक इधर आ," इस्माईलने त्याला हाक मारली.
विनायक टायर बदलत होता. इस्माईलची हाक ऐकून तो इस्माईलकडे गेला.
त्याने काही कागदपत्रे त्याच्याकडे सोपवली.
जन्मदाखल्यापासून बारावी पासपर्यंत सगळी कागदपत्रे विनायकच्या हातात होती.
"हे कुणाला पोहोचवायच का?"
"अरे पागल, ये तेरे दस्तावेज है, बिलकुल नये!!!" इस्माईल डोळा मारत हसत म्हणाला.
"याची काय जरूरत होती? आणि यावर अनिरुद्ध साळगावकर लिहलंय."
"उस कलमबाज सप्रे को मैं वही बोला, लेकीन उसका कहना था की अभी गणपती के सिजन मै सबको विनायक, गणेश ऐसें नाम मंग रहे है, बादमे तेरे को लफडा नको, इसलीये ये नाम डाला."
"माझ्या आईबापांनी चांगलं नाव ठेवलं होतं, विनायक!" विनायक रागाने म्हणाला.
"तो फिर इस बापने ये नाम दिया, याद रखना!" आणि इस्माईल तरातरा निघून गेला.
-------------------------------------------
विनायक आता कलकत्ता ट्रीप मारू लागला होता.
असाच त्यादिवशी माल गाडीत भरत असताना इस्माईलने त्याला जवळ बोलावलं.
"सुन, ये सारी रुई की बोरिया कलकत्ता उतार, और वहासे जितनी भी बोरिया होगी, यहा लेके आ."
"ठीक," विनायक म्हणाला, आणि तिथून जायला लागला.
आणि थोडं दूर गेल्यावर तो परत येऊन म्हणाला.
"लोकांना सांगा, कुठलीही बाटली लिक होऊ देऊ नका, नाहीतर कापसात वास भिनला ना, अक्खा रस्ताभर सगळ्यांना कळेल."
...इस्माईल विनायककडे बघतच राहिला.
"तुझे कैसे पता चला?"
"आजतक तो कभी कलकत्ता रुई गई नही, हप्ताभरापूर्वी दारूबंदी लागल्यावर आज लगेच इतके गड्डे? तिकडून तशाच रिकाम्या बाटल्या येतील."
इस्माईल जोरजोरात हसायला लागला.
"खानदानी स्मगलर लगते हो. ले जा सकोगे ना?"
"घेऊन जाईल, आणि परतही येईन." विनायक म्हणाला.
-----------
मजल दरमजल करत गाडी चालली होती.
एका नाक्यावर मात्र पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
"भाई, पोलीस..." क्लिनर रघ्या म्हणाला. "माल..."
विनायक गाडीतून उतरला. पोलीस प्रत्येक गाडीची कसून तपासणी करत होते.
विनायक पुन्हा गाडीत चढला, आणि हळूहळू त्याची गाडी पोलिसांजवळ आली.
पोलीस गाडीजवळ यायच्या आधीच तो गाडीतून उतरला.
"साहेब हे कागद..."
"*** फार घाई झाली ना तुला."
"नाही साहेब, गाडीत कापूस, सालं वातावरण बदलून ओला झाला, तर मालक लई घोडे लावतो."
"असं, दाखव बरं."
विनायक मागे गेला. आणि पूर्ण ताडपत्री उलगडली.
"आत काही नाही ना?"
"साहेब, कापसाशिवाय काही दिसलं तर जन्मठेप द्या."
संपूर्ण पांढराशुभ्र कापूस होता, मात्र एका ठिकाणी गणपतीचा फोटो होता...
पोलिसाने काठी घेतली, आणि गणपतीचा फोटो काढून कापसात खुपसली...
काठी सपकन आत गेली...
त्याने आजूबाजूला अजून दोन तीन ठिकाणी काठी खुपसली.
"साहेब काही राहिलं असतं, तर काठी गेली असती का? हवं तर बांबूही आणा."
"ठीक हे, निघ आता. जाऊ द्या रे ह्याला."
विनायकने पुन्हा ताडपत्री जशास तशी लावली.
काठी खुपसलेल्या जागेच्या बाजूला पुन्हा त्याने गणपतीचा फोटो लावला...
"भाई, आवाज क्यू नही आयी बॉटल की." रघ्या विचारत होता...
विनायक हसला, आणि म्हणाला, "रघ्या, गोष्ट ऐकणार का?"
"जरूर!" रघ्या म्हणाला.
--------------------------
"विनायका, गोष्ट ऐकणार का?" महेशने विनायकला विचारले.
विनायक चुपचाप महेशसमोर येऊन बसला.
"तर मग ऐक. लक्ष देऊन ऐक हो."
'एक देवी होती, निरंकुश धन असलेली. तिचं धन मात्र समुद्रात एका किल्यात होतं. किल्ला प्रचंड मोठा होता, बंदिस्त. आजूबाजूला अतिशय खोल पाणी, आणि अनेक जलचर.
एका माणसाने तिची प्रार्थना केली, आणि धनाचा मार्ग सांगण्याचा वर मागितला. तिने ते कबूल केलं, आणि मार्ग लिहून दिला, तसच काही संकेतही मार्गदर्शनासाठी देण्याचे कबूल केले.
'बारा फुल, एक चूल, धूळच धूळ...
हत्तीचा दात, सापाची कात, राजावर मात...
माणसाची वाणी, चांदीची दाणी आणि सोन्याच्या खाणी...'
माणसाने किल्ल्यात प्रवेश केला. त्याला तीन समान दरवाजे दिसले.
मात्र खरा दरवाजा एकच होता.
त्याने तिन्ही दरवाजांच निरीक्षण केलं. एका दरवाजावर बारा फुलांची नक्षी होती..
तो त्या दरवाजातून आत गेला. आणि तिथे त्याला तांब्याच्या राशी दिसल्या.
त्याचा आनंदाला पारावर उरला नाही.
पुढे पुन्हा तीन दरवाजे होते, आणि एका दरवाजावर चूल होती.
माणूस आत गेला, आणि तिथे त्याला अतिशय उंची अशी वस्त्रे मिळाली.
पुढचा दरवाजा धुळीने माखला होता, आणि बाकीचे सर्व साफ.
संकेत खरे ठरत होते, आणि तसतसा धनाचा वर्षाव होत गेला.
शेवटी सोन्याच्या खाणीच्या चित्राचा दरवाजा त्याने उघडला...
दरवाजामध्ये पाऊल टाकताच हजारो बाणांनी त्याचा वेध घेतला...
मृत्यूपश्चात तो देवीला म्हणाला, 'देवी तू तर मला धनाचा मार्ग दाखवण्याचं कबूल केलं होतं.'
देवी हसून म्हणाली 'हो वत्सा, पण तू धनाचा मार्ग सांगण्याचा वर मागितला होतास, तुला न मारण्याचा नाही. आणि तसंही मी तुला धनाचा बरोबर मार्ग सांगेन असा वर दिलाच नव्हता.'
गोष्ट संपवून महेश विनायकला म्हणाला.
"विनायक, सगळे संकेत बरोबर मार्ग दाखवतात असं नाही, काही संकेत फसवे असतात, आणि जीवघेणेही. हुशार माणूस अशा संकेतांची पारखही करतो आणि असे संकेत देऊन शत्रूचा नायनाटही करतो."
---------------
"तर रघ्या, पोलिसाला वाटलं हा गणपतीचा फोटो चिकटवलाय, म्हणजे माल इथेच असला पाहिजे. पण मी बोललो होतो.त्या फोटोच्या तीन स्क्वेर फूट आजूबाजूला काहीही ठेवू नका. "
"भाई, भारी गोष्ट होती. कुणी सांगितली तुला." रघ्याने विचारले.
'होता माझा बाप...'विनायक पुटपुटला
गाडी भरधाव वेगाने कलकत्त्याला निघाली होती...
आमार शोनार बांगला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
भाग लवकर लवकर येत आहेत. वाचायला मजा येते.

लै भारी!
एखादी वेबसिरिज पाहिल्याचा फील येतोय Happy

खुप छान
भाग थोडे मोठे असायला पाहिजे होते

सर्वच भाग खूप आवडत आहेत. त्या विनायक साळगावकरचं डोकं बापाच्या डोक्यासारखं तल्लख दिसतय. या कथेवर एक सिरीअल होउ शकते.