मानस कविता

देव जाणे!

Submitted by मुग्धमानसी on 22 October, 2013 - 07:02

पूर्ण रात्रभर कोण सतत ते ठोकत होते... देव जाणे!
रात्रीत एका कुठले देऊळ बांधत होते... देव जाणे!

ठाक-ठूक, खाट-खूट छिन्नी हथोडा दगडमातीचा ढीग सारा...
कुठलं कायकाय खोल खोल ते गाडत होते... देव जाणे!

तोडत होते, कापत होते, खोदत होते सततच काही
लपवत होते स्वतःस की ते शोधत होते... देव जाणे!

लोखंडी गज, पितळी दारे खणा-खणा ती वाजत होती
कुणास नक्की तुरुंगात ते कोंडत होते... देव जाणे!

उंच मनोरे, प्रदिर्घ शिखरे... पहाटे परी कोसळणारी...
ठिसूळ भिंती घामाने का सिंचत होते... देव जाणे!

शब्दखुणा: 

लहान झाले आहे....

Submitted by मुग्धमानसी on 22 October, 2013 - 06:12

तुटता तुटता आता मी
एवढी लहान झाले आहे
माझे मलाच कळते आहे...
मी ’महान’ झाले आहे!

मनात कुठलेच किंतू नाहीत
डोक्यात कसले जंतू नाहीत
आटून आटून आता मीच
माझी तहान झाले आहे!

आगीत अलगद विहरते मी
वादळात सहज तरंगते मी
अणू अणूंच्या दिव्यत्वाचे
मी विज्ञान झाले आहे!

अथांग सागर आणि धरती
मला कशाची कुठली गणती?
अंश अंश मी या विश्वाचा
इतकी सान झाले आहे!

आता तोडून दाखवा ना...
मला खोडून दाखवा ना...
माझे मिटणेच माझ्या मागे
माझे निशाण झाले आहे!

शब्दखुणा: 

ठरलंय!

Submitted by मुग्धमानसी on 7 October, 2013 - 02:23

प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!

पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!

कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!

तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!

तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!

तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!

कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!

शब्दखुणा: 

बोल ना जरा....

Submitted by मुग्धमानसी on 2 October, 2013 - 03:28

अवघड अवघड बोलत असते
तरी मला मी सांगत असते
बोल जरासे माणसातले
राहूदे जरा काळजातले
स्पर्शांमधली अतर्क्य कळकळ
डोळ्यांतील नेहेमीची खळबळ
श्वासांमधले उष्ण उसासे
हृद्यी घुमती पोकळ वासे
कधी पहाते नुसते भेदक
कधी हासते विषण्ण सूचक
कसे कळावे सांग कुणाला
सर्व इंद्रिये लाव पणाला...

गाठ जरासे शब्दही कधी
ऐक मनाचे सांगही कधी
बोल कधीतरी बोल ना जरा
ओठही कधी खोल ना जरा
सोपे सोपे जोड शब्द अन्
ओव अर्थ त्यातून भाबडा
खोल, गूढ, अन्वयार्थ सारे
टाक! ठेव तो शब्द रांगडा!

हळवे कातर अशक्य काही
सदैव धुमसत काचत असते
आत कुणीतरी सदा सर्वदा
स्वप्न फाटके टाचत असते
’त्यास’ एकटे सोड कधीतरी

शब्दखुणा: 

कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

Submitted by मुग्धमानसी on 11 September, 2013 - 07:28

सांधायला गेलं की तुटतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

डोळ्यांच्या आत... बाहेर जगात...
ढगातल्या पाण्याला नसतेच जात!
बघावं तेंव्हा काळीज फोडून
आत आत कुणीतरी रडतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

मनात तसंही नसतंच काही
अगदिच नसतं असंही नाही
मनाच्या गाळात खोल खोल तळात
जीवात काहितरी रुततंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

सगळंच तसं चाललंय छान
नियमित बहरून येतंय रान
मातीच्या खाली ओल्या पावली
हळूहळू रान सारं जळतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

स्पर्शानं आताशा मोहरत नाही
ठरवून सुद्धा काही आठवत नाही!
सोबत नी गप्पा नी वाट नी धुकं...
सगळंच अलवार झालंय मुकं.

शब्दखुणा: 

काय चाललंय काय?

Submitted by मुग्धमानसी on 28 August, 2013 - 08:24

काय चाललंय काय
कुठे ओढताय पाय
कशी डोक्यात धूळ
तरी ओठांत साय

हौस सारी पुरवली
तिची कूस उजवली
सारी पैदास माजली
तरी रडतेच माय

सारे घर विटाळले
मग देऊळ बाटले
त्याने फक्त विचारले
’याचे कारण काय?’

संत देवाघरी बरे
इथे काही नाही खरे
चार खांबावर घरे
पण छप्पर नाय

झाले अनंत भोगणे
उर फाडून घोकणे
त्याची चाहूल ऐकणे
ज्याला नाहीत पाय

माझ्या मना तुझे मन
पहा निर्ढावले कसे
ज्याला जगी कुणी नसे
त्याला सोडून जाय...

शब्दखुणा: 

मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!

Submitted by मुग्धमानसी on 8 August, 2013 - 07:36

मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!
नकोस लागू नादी माझ्या बजवणार आहे!

असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!

पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे जगणे
हाच श्वास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!

तू काटे दे वा उन्ह, वादळे, चटके दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ दमवणार आहे!

तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!

धाव धाव रे आयुष्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या वळणावर गाठणार आहे!

शब्दखुणा: 

’जगते’ म्हणजे

Submitted by मुग्धमानसी on 29 July, 2013 - 08:35

’असते’ म्हणजे थोडेफार
शुद्धित असतात माझे भास
नाहितर नुसतेच घुम्यासारखे
छातीत झिरपत असतात श्वास!

’हसते’ म्हणजे काळजातून
उगवू देते चांदणवेल
नाहितर दृष्टीआड सगळे
असतेच नेहमी आलबेल

’जाते’ म्हणजे माझ्यामधून
उडून जाते अत्तर बनून
नाहितर बंद रेडिओत सुद्धा
रेंगाळतेच ना चिवट धून...

’रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार

’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात!

शब्दखुणा: 

अन्... तुझा जन्म झाला!

Submitted by मुग्धमानसी on 11 July, 2013 - 04:01

एकदा रातीला
चांदणे पेरताना
गार झुळूकीनी चंद्रास धक्का दिला
पात्र हेलावूनी
सांडले चांदण्याचे
झेलले मी इथे अन्... तुझा जन्म झाला!

तिथे दूर मेघांत
काही पर्‍या
हरवल्या वेचताना दंवाच्या लडी
मला भेटल्या अन्
दिले भेट मोती
मी स्वीकारले अन्... तुझा जन्म झाला!

एकदा पावसाने
बरसता बरसता
आणिले वाहूनी स्वर्गीचे अमृत
थेंब तो एक छोटा
मला गवसला
ओंजळी लपवला अन्... तुझा जन्म झाला!

शब्दखुणा: 

दुःख तुलाही कळले असते!

Submitted by मुग्धमानसी on 8 July, 2013 - 03:36

मुळे जराशी बळकट असती तर गगनाला भिडले असते
गजांआडूनी ऋतू बघण्याचे दुःख तुलाही कळले असते!

कातर ओली एखादी सर तुझ्या आत पाझरली असती
तर मी कदाचित वसंत होऊन तुझ्या मनी मोहरले असते!

किनार्‍यावरी भिरभिरणारी नजर तुझी जर ठरली असती
क्षितिजावरती न्याहाळणारे तुला... नेत्र ते दिसले असते!

पहाट होते, सकाळ होते, दुपार आणि सांज रात्र मग
त्यानंतरचे मुके बहकणे तू असता तर टळले असते!

दवबिंदूंना पाहून साधे मोघम हसणे सुचले असते
तुझ्या बगिच्यातील फुलांचे हसणे सार्थक फळले असते!

त्या धारांच्या पल्याडचे ते तुला रिक्तपण दिसले असते
या प्रश्नांनी उठता-बसता तुलाही असे छळले असते!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता