मानस कविता

आता मला जगणं जरा जमेलंसं वाटतंय...

Submitted by मुग्धमानसी on 3 June, 2013 - 01:34

भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...

थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...

एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...

उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...

जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...

शब्दखुणा: 

तुझ्या चिंतनाची नशा और आहे...

Submitted by मुग्धमानसी on 22 May, 2013 - 03:39

तुझ्या चिंतनाची नशा और आहे
तू नसणे समोरी... तसे गौण आहे!

जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!

फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?

नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!

मनीच्या प्रदेशी तुझे राज्य असते
जरी ते अताशा कोरडे शुष्क आहे!

अशा छान बेबंद जमतात गप्पा...
मध्ये शब्द उच्चारणे.. व्यर्थ आहे!

शब्दखुणा: 

फार कठीण आहे...

Submitted by मुग्धमानसी on 19 May, 2013 - 17:02

फार कठीण आहे... तुला जाताना बघणं
तुझ्यामागे माझं असं कोरडं कोरडं जगणं

वाट बघणं एवढं तरी काम असायचं तेंव्हा
नकोसं वाटतं आताशा ते उंबरठ्यावर झुरणं

रात्रभर मी पावसाच्या सरी झेलत र्‍हायचे
भेगाळलेल्या मनाला आता झेपत नाही भिजणं

युगे युगे चालून तुझ्या जवळ आले होते
तुला बरं जमलं क्षणात क्षितीज दूरचं गाठणं

झोपेत बदलावी कूस तसं नातं पालटून जातं
कुठवर सोसेल तुला-मला हे नातं राखत जागणं?

प्रवाहातल्या दिव्यांसारखे सोडून दिलेत तुझे विचार
प्रेम, सवय, कर्तव्य, माया... जमतंय का तीर गाठणं?

शब्दखुणा: 

अताशा मीच मजला गुणगुणाया लागले आहे...

Submitted by मुग्धमानसी on 17 May, 2013 - 01:24

अताशा मीच मजला गुणगुणाया लागले आहे
होऊनी काव्य मी मजला स्फुराया लागले आहे

तिची ती सावली आहे अजुनही माझिया पायी
तिचे असणे जरी गगनी भिडाया लागले आहे

स्वतःला आरशातून पाहणे मी टाळते हल्ली
तिथे भलतेच काही मज दिसाया लागले आहे

कशिबशी रात्रभर गुंत्यातुनी त्या निसटले होते
पहाटेस स्वप्न ते मज विंचराया लागले आहे

जिव्हारी लागले माझ्या विखारी बोलणे त्यांचे
कुणाचे काय त्यासाठी अडाया लागले आहे?

’मी आहे ना सांग?’

Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2013 - 07:19

’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...

माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...

कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...

कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...

मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...

मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...

फार काही मागत नाही

शब्दखुणा: 

चुकूनसुद्धा...

Submitted by मुग्धमानसी on 14 May, 2013 - 01:55

चुकूनसुद्धा माझा विषय निघू देऊ नकोस
मनात माझ्या क्षणांनाही जगू देऊ नकोस...

हसून सगळं टाळत जा
क्वचित काही बोलत जा
बोलतानाही शब्दांमध्ये
उगाच हसू घोळत जा
दोन शब्दांत जीवघेणं अंतर पडू देऊ नकोस..

देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
पण आठवांच्या उतरंडीला धक्का लागू देऊ नकोस...

पानांमागे विसावलेला
चंद्र हळूच बघताना
गार झुळूक हलकेच तुझ्या
अंथरुणात शिरताना
कवटाळलेल्या स्वप्नांत डोळे भिजू देऊ नकोस...

शब्दखुणा: 

तुझ्याविना सख्या मला...

Submitted by मुग्धमानसी on 7 May, 2013 - 03:45

तुझ्यापासून दूर नेणारा राजमार्ग नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता

सूर सारे, ताल सारे, शब्द सारे सांडले
ओतताना जीव माझा गीत वेडे माखले
ऐकता करवादले ते - हा उसासा नको होता...
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

वाट अश्रुंची कुणी अडवायला आलेच नाही
अन् मलाही का कधी बोलावता आलेच नाही
कोरड्या भेटीस अपुल्या शाप ओला नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

शब्दखुणा: 

बाकी काही नाही!

Submitted by मुग्धमानसी on 23 April, 2013 - 02:38

जरा बरं वाटत नाही... बाकी काही नाही
मनातलं आभाळ फाटत नाही... बाकी काही नाही!

भर सभेत एकटं सोडून मला... मी निघून गेले
स्वतःत मन रमत नाही... बाकी काही नाही!

एका उत्तरापायी प्रश्न सारेच दारी खोळंबले
हल्ली काहिच पटत नाही... बाकी काही नाही!

दोन पावलं चालून फक्त मिटेल सगळं अंतर पण
दिशा तुझी सापडत नाही... बाकी काही नाही!

तुझं येणं-जाणं, असणं-नसणं सगळं चालायचंच
मलाच भेटणं जमत नाही... बाकी काही नाही!

इथे उगवले, सकाळ झाले, आता दुपार आहे तरी
मावळतेपण सुटत नाही... बाकी काही नाही!

शब्दखुणा: 

आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे....

Submitted by मुग्धमानसी on 5 April, 2013 - 07:17

आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे,
माझं वागणं बोलणं काहीच समजत नाही म्हणे...

येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्‍यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...

हजार शब्द सल्ल्यांचे अन् हजार समजुतीचे
ओतत राहतात ते, तरी मी भरत नाही म्हणे...

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...

नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...

तुझेच हसणे, असणे-नसणे, स्वतःत हरवून बसणे,
दुःख अताशा तुझ्या स्मृतींना बधत नाही म्हणे...

वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा

शब्दखुणा: 

...येणे झाले!

Submitted by मुग्धमानसी on 2 April, 2013 - 01:47

कधी अलवार पायांनी असे स्वप्नात येणे झाले
कधी बिजलीप्रमाणे तळपुनी निमिषात येणे झाले
जशी यावी फिरूनी ओठी नवथर ओळ गाण्याची
तसे माझे कितीदा फिरूनी या जगण्यात येणे झाले!

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

दुरूनी ते शब्द आले भेटण्या... नवखेच होते
जरी मी आपले म्हटले तरी परकेच होते
सूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...
जरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता