मानस कविता

काही बाही

Submitted by मुग्धमानसी on 24 September, 2021 - 13:02

कधी मी असते
कधी मी नसते
कुणाला कळते
कुणा नाही!

मीही हो.. सांगते!
हसतच होते
आताशा दिसते
कुणा नाही!

माझी मीच लुप्त
माझे मन सुप्त
विश्वातून गुप्त...
दिशा दाही!

माझ्या मनातही
उमलते काही
तुला दिसेलही
किंवा नाही!

तरिही इथेही
बहुदा तिथेही
सांडते कुठेही
कुणी नाही!

डोळ्यांतही नाही
काळजात नाही
धगीतही नाही
धूर नाही!

अशी मी बधीर
खरंच अधीर
माझ्यापाशी नाही
फार काही!

शब्दखुणा: 

मला दाट संशय आहे!

Submitted by मुग्धमानसी on 19 March, 2021 - 05:59

मला दाट संशय आहे,
की या पदरी भसाभस पडलेल्या आयुष्याचं मी काहीही करणार नाही!
जगण्याची सगळी माती सुपिक असेलही कदाचित...
पण मी इथं काहीही पेरणार नाही!
अन् मग अर्थातच... काहीही उगवणारही नाही!
मला दाट संशय आहे!

मला दाट संशय आहे की या हातांचा जन्म...
स्वत:चीच पत्रं आणि चित्रं टराटरा फाडण्यासाठी झाला असावा!
यांचे ठसे उमटलेलं एकही काव्य ह्यात राहू देत नाहीत हेच.
आणि कितीही करूणेनं पकडलं तरी निखळून, निखळून, निसटून जातं यांतून सारं
जे खरंतर मला कधीच जायला नको असतं!
हे हात मला फितूर असावेत...
मला दाट संशय आहे!

शब्दखुणा: 

अ‍ॅडम-ईव्ह

Submitted by मुग्धमानसी on 12 March, 2021 - 08:44

किती विस्तिर्ण प्रदेश आपण पार करून आलोय बघ!
थोडी नजर खाली घे. थोडं जरा मागे बघ.

ते जे सारं दिसतंय ना... तो स्वर्ग होता!
हे हे इथं ठसलंय ना... तो स्वर्ग आहे!
माझ्या तुझ्यात विरला ना... तो स्वर्ग होता!
तुझ्या माझ्यात हसतंय ना.... तो स्वर्ग आहे!

शब्दखुणा: 

अज्ञात

Submitted by मुग्धमानसी on 19 January, 2021 - 12:42

मी एका अज्ञात जागी येउन अडकलेय
हे रस्ते अनोळखी आहेत
घरांचे दरवाजे बंद आहेत
झाडांच्या सावल्या निष्पर्ण आहेत
झर्‍याच्या पाण्याला ओळखीचा आवाज नाही
पाण्याची चव अनोळखी...
सगळं गाव काळोखी...

धुळीनं माखलेल्या पायांना
या वाटा थारा देईनात
इथं तिथं सगळीकडे... अंधारात पेरलेले सोबती
पण तेही काही साद देईनात
कोलमडून मला स्वत:तच कोसळताना पाहताहेत
पण ते माझ्या हाती हात देईनात

मला वाटा शोधायला हव्यात
की... त्याच भिरभिरत आल्यात अश्या इथवर?
मलाच शोधत?
आणि स्वत:लाच हरवून बसल्याहेत?

शब्दखुणा: 

अज्ञात

Submitted by मुग्धमानसी on 19 January, 2021 - 12:42

मी एका अज्ञात जागी येउन अडकलेय
हे रस्ते अनोळखी आहेत
घरांचे दरवाजे बंद आहेत
झाडांच्या सावल्या निष्पर्ण आहेत
झर्‍याच्या पाण्याला ओळखीचा आवाज नाही
पाण्याची चव अनोळखी...
सगळं गाव काळोखी...

धुळीनं माखलेल्या पायांना
या वाटा थारा देईनात
इथं तिथं सगळीकडे... अंधारात पेरलेले सोबती
पण तेही काही साद देईनात
कोलमडून मला स्वत:तच कोसळताना पाहताहेत
पण ते माझ्या हाती हात देईनात

मला वाटा शोधायला हव्यात
की... त्याच भिरभिरत आल्यात अश्या इथवर?
मलाच शोधत?
आणि स्वत:लाच हरवून बसल्याहेत?

शब्दखुणा: 

माहीत नाही!

Submitted by मुग्धमानसी on 6 January, 2021 - 00:32

हे जे काही पडले आहे
यात काही जे जडले आहे
माझे होते किंवा आहे,
माहीत नाही...

ते काही जे घडले आहे
त्यातूनच मी घडले आहे
काही आत बिघडले आहे,
माहीत नाही...

काल कालची हुरहुर होती
आज आजची भिरभिर आहे
उद्या कशाची कुरबुर आहे,
माहीत नाही...

जे बोलावे बोलत नाही
कुणी ऐकावे? कुणीच नाही...
तरी कोण... जे ऐकत नाही?
माहीत नाही...

आठवते ते काय असावे?
त्यात काय जे विसरून जावे?
खोडावे नी काय लिहावे?
माहीत नाही...

शब्दखुणा: 

या भेटीच्या नंतर...

Submitted by मुग्धमानसी on 5 January, 2021 - 08:44

या भेटीच्या नंतर थबकून
जाईल हा बनवास ऋतूविण
या झाडांना, फुला-फळांना
बघशील तू निव्वळ भांबावून

या भेटीच्या नंतर उधळील
माती भिरभिर वादळ इवले
असण्या-नसण्याच्या काठाशी
बसताना घे मिटून डोळे

या भेटीच्या नंतर जे जे
उगवून येईल त्या वाटांवर
ते ते सारे घुटमळेल पण
देऊ नको तू त्यांना उत्तर

या भेटीच्या नंतर अलगद
पुसून घे तू सगळी अडगळ
हिरव्या तांबूस उग्र क्षणांचा
टाक पिऊन तो उत्कट आगळ

आणि तरी शुद्धीत रहा तू...
देऊ नको हे पुन्हा निमंत्रण
बघता बघता एका साध्या
धूळभेटीचे होते बंधन!

शब्दखुणा: 

म्हणजे... मला झोप लागेल!

Submitted by मुग्धमानसी on 16 May, 2020 - 11:20

माझ्या अंथरुणापाशी कुणी भळभळत्या सुगंधाचा तो आदीम धूप जाळेल का?
म्हणजे त्या तमातूर घनदाट शुभ्र सुगंधात ही स्वप्नं घुसमटून बेशुद्ध होतील....
आणि.... मला झोप लागेल!

माझ्या खोलीत अपार श्रद्धेनं लाविल का कुणी थरथरत्या शांततेचे ते अथांग दिवे?
म्हणजे त्या अखोल निष्पाप रंध्रमयी उष्म्यात जळून जातील माझे निरागस अपराध
आणि... मला झोप लागेल!

माझ्या कानांपाशी मनस्वी आत्म्यासह कुणी गुणगुणेल का ते अधांतराचे निर्गूण गीत?
म्हणजे मग अस्तित्वाची सगळी थडगी सुरांच्या भुईखाली गुंगून अनाकार अवलय होतील
आणि.... मला झोप लागेल!

शब्दखुणा: 

सवय

Submitted by मुग्धमानसी on 15 April, 2020 - 00:39

चार भिंतींनाही असते दोन डोळ्यांची सवय,
बंद कुलुपालाच कळते काय अन कसली सवय!

बंद खिडक्या आत बघणे टाळती... कुढती जणू!
स्थिर पडद्यांना चिकटते मंद वाऱ्याची सवय!

सावलीतून कोंडलेले उन्ह प्राशून तप्त ती
फरशीवर रांगती अनाहूत पायरव... त्याची सवय!

बैठकी खुर्च्या तपेली जीव ते निर्जीवसे...
एकमेकां सांगती त्या रम्य स्पर्शाची सवय!

त्या पलंगावर पहुडलेल्या डहुळ निद्रेसही
सोडवेना भाबड्या अंगाईगीतांची सवय

त्या पसाऱ्यातून तुंबून राहिला एकांत का?
त्यास पुन्हा लागलेली मुक्त घुमण्याची सवय!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता