तुझे मुग्ध देणे...

Submitted by मुग्धमानसी on 11 December, 2014 - 02:34

तुझे कुंद ओले सडे झेलताना
कधीची उभी मी इथे पावसात
छ्ते मेघ झाली, कुठे भिंत गेली?
मला सापडेना मी माझ्या घरात!

पुन्हा हा मला ओढतो श्वास आत...
उरातील सारी तळे चाळवितो
पुन्हा एकदा जन्म मांत्रिक होतो
मला मंतरूनी स्वत:शीच नेतो!

कसा छान वाटे सुखाचा दिलासा
जसा आईचा हात डोईवरी...
जरा शांत झाले मतीचे नगारे
मनीचा पडे सूर कानावरी!

तुझे मुग्ध देणे... मी वेचित जाणे...
असा जन्म जाणे किती नेटके!
कधी मीच झोळीत वेचून काटे
रडावे ’मिळाले मला फाटके!’

मला प्रिय आहे गड्या दु:ख माझे
मला तेही ’त्यानेच’ आहे दिले...
असे हास्य माझे करी झेलताना
उपेक्षू नको अश्रू डोळ्यांतले!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!!

छ्ते मेघ झाली, कुठे भिंत गेली?
मला सापडेना मी माझ्या घरात!

जरा शांत झाले मतीचे नगारे
मनीचा पडे सूर कानावरी!

असे हास्य माझे करी झेलताना
उपेक्षू नको अश्रू डोळ्यांतले! >>>> फारच छान

कवितेतील विचार सुंदर आहेत.

वृत्त पाळलेच पाहिजे. त्यासाठी शंभरवेळा वाचून उच्चाराशी (मात्रांशी) मेळ घालणारे शब्द मिळे पर्यंत अस्वस्थ वाटले पाहिजे; तरच कवितेची मजा स्वतःला आणि इतरांना येते.

चु.भू.दे.घे.

कल्पना मांडण्याची घाई होते आणि वृत्त सभाळलील जात नाही हा माझाही अनुभव आहे.
शक्यतो काळजी घ्यावी ही रास्त सुचना आहे.
कल्पना निश्चित अप्रतीम आहे.

जे तुम्हाला येथे वृत्ताबाबत सल्ले देत आहेत (जे सल्ले खरे तर योग्यच आहेत) त्यातील एकांनी गझल परिचय ह्या लेखाखाली दिलेला एक प्रतिसाद पूर्णपणे उलट्या अर्थाचा आहे म्हणून हसू आले.