मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
उगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...
हाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग
इथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार
आणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग
पण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं
संध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं
त्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
माझ्या घरात देव्हारा नसेल
उगवतीच्या धगीने पाठ शेकत माझं घर
एका थंडशार मावळतीच्या वाटेकडे डोळे लाऊन बसेल
आनंदाची सोटमुळं पायाशी अंथरून,
अथांग परिपूर्ण दु:खाच्या अनाकार फांद्यांनी ते अवकाशभर हसेल
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.
मध्यान्हीच्या कवडशांनी माझे कोनाडे सजतील
चंद्राच्या दग्ध धारांनी माझ्या भिंती भिजतील
पाऊस... कधी बाहेर कधी आत
खूपसारे गंध असतील माझ्या घरात
तरी तिथं कुणालाही असं ’अधिष्ठान’ वगैरे नसेल
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.
उष्ण देही वाकलेले
ते धगीने माखलेले
थंड पाषाणात झाका
पाय ओंगळ फाकलेले
हे असे छातीवरी
पर्वत उभे शिखरांसहित
त्यांस कोंबा चापूनी
ठेवा खुले... पण झाकलेले!
आगजाळे नेत्र..
जाडे ओठ... नाके फेंदडी...
कोरकोरूनी करा नाजूक
अन् मोहाळलेले....
अन् तिची योनी?
तिथे झरतात शक्तीचे झरे...
ते असे विसरा...! (असे घसरा...
मनातच चाखलेले!)
ते तिचे सौंदर्य
अन् आवेग तुजला भिववितो!
गलितगात्रे चोळतो
पुरुषत्व तू मग राखलेले!
त्यापेक्षा ना.... मला एक घर दे.
बाकी काही नको.
खिडक्या नकोत!
आतल्या आत कोंदटलेलं माझं जग मला तिथून कुठेही भिरकावून द्यायचं नाही.
त्याला उबदार जोजवायचंय. घट्टमुट्ट निजवायचंय.
तुझ्या कुशीत.
दारंही नकोत!
माझ्या दुखर्या पांगूळलेल्या श्वासांना बाहेरच्या ’सुदृढ’ हवेत नेऊन मला दुखवायचं नाही.
त्यांना अलवार पसरायचंय. अलगद उष्ण पेरायचंय.
तुझ्या छातीत.
छप्पर तर नकोच!
माझं अवकाशभर भिरभिरणारं अनाकार एकटेपण त्याला आपटून धडका देऊन रक्तबंबाळ होईल.
त्या एकटेपणाचे मळभदार ढग उंच उंच नेऊन मला गच्च बरसायचंय...
तुझ्या ओंजळीत.
हेही हवंय... तेही हवंय...
जगणं म्हणजे स्साली नुस्ती श्वास घ्यायची सवय!
तरी येडं धावतंय म्हणतंय... हेही हवंय... तेही हवंय...
मिळत नाही... मिळत नाही... तगमग तगमग काहिली!
दोन मायेच्या शब्दांची वीज दूssssssर कडाडत राहिली....
होना? म्हणून रडतोस ना?
हाय हाय करत फिरतोस ना?
पाऊस झेलण्याइतकं वेड्या वीज झेलणं सोप्प नाही
ओल्या गात्री जळतानाही... धूर झाकणं सोप्प नाही!
नसतानाचं झुरणं बरं...
असतानाचं ओझं राजा... जड आहे! हलकं नाही!
हवंय ना? हे घे तर. तुझ्यासाठीचं प्रेम घे...
दारात उभं आहे तुझ्या.... हसून त्याला आत घे...
कुणालाही न व्हावा हा असा आजार आहे
तुला सांगू कसे मज कोणता आजार आहे...
मला दिसतात सारी माणसे इतस्त: सांडलेली
निथळलेली पसरलेली मुळातुन गंडलेली
शहर सारे जणू एक चामडे मेल्या जिवाचे
भुशागत त्यात सारी माणसे ही कोंबलेली
अभावानेच कोणा मस्तकाचा भार आहे...
इथे रस्ते जणू हे माणसांचे घट्ट ओघळ
किती कोंदट चिकट घाणेरडे भलतेच ओंगळ
इथे धावून यांचे पाय हे बलदंड झाले
विचारांची अवस्था जाहली भलती अजागळ
इथे जगणार मी? माझाच हा आकार आहे?
हा धागा काही अपरिहार्य कारणास्तव काढून टाकते आहे. क्षमस्व. आभारी आहे.
आठवत राहिलास... रात्रभर!
टिचभर चांदण्याच्या मुठभर प्रकाशात,
आकाशभर रात्र... कणकण जळत-उजळत राहिली.
मनभर उगवलेले तुझ्या आठवांचे चंद्र....
तेजाळलास, उजळलास, स्नेहाळलास...
माझ्या आत आत दिव्यावरच्या काचेसारखा काजळलास...
मावळला मात्र नाहीस!
उधळत राहिलास.... रात्रभर!
तशी तुझी एकही खूण नाही माझ्याजवळ.
अंगावरले व्रणही पुसट होत होत नाहिसे झालेले.
तु घुसळलेले माझे केस... त्यानंतर कितीकदा पुन्हा पुन्हा बांधलेले.
तरिही तिथे उमटलेल्या तुझ्या ठशांनी...
झुळुकीच्या निमित्तानं अंगभर लगटणार्या तुझ्या श्वासांनी...
साधे पुस्तकाचे पान पलटतानाही झालेल्या आवाजानी...
तुझा मेघ ओला
तिची वीज ओली
तुझ्या पावसाने
तिची शेज ओली
तुझे भास ओले
तिची कूस ओली
तिच्या आत आत
किती आर्त खोली!
तुझे स्पर्श ओले
तिची नीज ओली
तिचे स्वप्न ओले
तुझी याद ओली...
तुझा गंध ओला
तिचे श्वास ओले
तिचा गर्भ ओला
तुझे बीज ओले
जळी सांडलेला
निळा चंद्र ओला
खुळी रात्र ओली
लुळा देह ओला...
तिच्या चौकटीला
अलांछित अबोली
उसळत्या सुखाची
मुकी बंद खोली...!
तुम्हीच का ते? ज्यांच्याबद्दल
ती शेवटी बरळत होती?
तुमचीच छबी बहुदा तिच्या
डोळ्यांमध्ये तरळत होती...
तुम्ही थोडे चांदण्यातल्या
डोहासारखे दिसता का?
तुमचाच गंध पहिल्या पावसात
मातीत उमलून येतो का?
तसं असेल तर तुम्हीच ते...
ज्यांची बाधा जडून तिनं,
रात्री काढल्या तळमळून अन्
धगीत लोटलं सगळं जिणं!
शेवटी शेवटी सांगते अश्शी
लालबुंद रक्ताळलेली...!
डोळे जड मधाळलेले...
थोडी थोडी स्वप्नाळलेली...
काय होतंय?... कुणालाही
सांगू शकली नाहीच ती
अखेरपर्यंत तुमचं नाव
घेऊ शकली नाहीच ती...
फार हाल झाले तिचे...
तुमच्यापायी झुरताना...
निरोप द्यावा कुणापाशी?