मराठी गजल

मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 6 July, 2019 - 13:38

जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भर
मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर

तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळा
मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर

वाटले रात्र साथ देईल पुन्हा एकदा
मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्र भर

त्यांच्या सुंदरतेची सर नव्हती कश्यास
स्वर्गाच्या पऱ्या स्वप्नी दिसल्या रात्र भर

उगा कधी एक एक तारे मोजताना
'प्रति' तुझ्यावरच कविता लिहिल्या रात्र भर
©प्रतिक सोमवंशी

काव्य प्रकार :- त्रिवेणी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 13:01

त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो.
पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा सम्पूर्ण विषय बदलून टाकते
अश्याच माझ्या काही त्रिवेण्या इथे आपल्या समोर सादर करतो ....
.
त्रिवेणी
.
1) तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
.
2) इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
.
3) रडताना पहिलीय माय रात्रभर

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत

Submitted by प्रतिक सोमवंशी on 19 June, 2019 - 13:31

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत
माझ्या गजलेचे काही शेर मुद्दाम चुकले आहेत

आम्हा भुकेचे व्याकरण भूक लागल्यावर कळत नाही
भुकेल्या पोटापुढे पोरं अक्षरांना मुकले आहेत

बागेमध्ये बसलेली कित्येक पाखरं प्रेम करतात
त्यांच्या अमर नावांमुळे कित्येक खोडं दुखले आहेत

मी काय म्हणतो, तुम्हाला कश्याला तो गुलाब हवा?
त्याच गुलाबाच्या नादात किती काटे रुतले आहेत?

स्वप्न सारी दाखवून ते मत घेऊन गेले होते
सांगा तर निवडून आल्यावर ते कुठे खपले आहेत?
©प्रतिक सोमवंशी

दिलातील जळजळ

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 June, 2019 - 08:25

घेऊन चला जिथे नभांची हळहळ आहे
ओकायची तिथे दिलातील जळजळ आहे

बरसायचे आहे मुक्त माझ्या जाणिवांना
माझ्या उरात दाटली त्यांची वळवळ आहे

खूप दाटले आहे हे धुके उन्हाळ्यात
वाटते सावलीत माजली खळबळ आहे

दाही दिशात पळती हे रुधिराचे घोडे
नसानसांत भरली त्यांची चळवळ आहे

नसेल उदयाच्या वेशीला तिमिराचे तोरण
लावलेल्या तिथे दिवट्या ही बळबळ आहे

अथांग सागराला का विचारतात प्रश्न
उत्तरात लपलेली त्याची कळकळ आहे
©प्रतिक सोमवंशी

या वांझोट्या रात्रीला, कधी चंद्र जन्म देतो

Submitted by प्रतिक सोमवंशी on 28 May, 2019 - 13:14

या वांझोट्या रात्रीला, कधी चंद्र जन्म देतो
कधी चांदणे सुखाचे, कधी अंधार मर्म देतो

मी पाहिले अंतरीचे, प्रताप कोवळे होते
जो येतो काळजीने, नेहमी तोच दम देतो

तू यातना पाहत होती, मी फुले मोजत होतो
ना भाव भावनांचे झाले, मी विकत कर्म देतो

खूप लावून झाले आमचेच प्रेत टांगणीला
एक थेंबही रक्ताचा काळजावर वर्म देतो

शून्यच नाही उरले आता हिशोब मांडताना
‛प्रति’ आकडे तुम्हाला कधी सम कधी विषम देतो
©प्रतिक सोमवंशी

बोलता बोलता तुला सांगायचच राहून गेल

Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 May, 2019 - 12:10

बोलता बोलता तुला सांगायचच राहून गेल
मी बघत होतो तुला अन गाव सार पाहून गेल

लाटा होत्या खोट्या, त्या शब्दांच्याच का असेना
गाव त्या बघत होत, पण स्वप्न माझ वाहून गेल

गोल गोल फिरत असत, बघ नेहमी नियतीच चक्र
काल होतो घामात, आज डोक्यावरच ऊन गेल

काय सांगू कुणाला, मी डोळ्यात लपवले गुपितं
शब्द नव्हते त्यात, तरी कुणीतरी वाचून गेल

‛प्रति’ तुझ्या गजलेत, नाही दिसला म्हणतात राम
मी भावना लिहत होतो, ते त्यांना टोचून गेल
©प्रतिक सोमवंशी

तू जवळ हवासा

Submitted by प्रतिक सोमवंशी on 6 May, 2019 - 00:20

एकटीने मज राहवेना, तू जवळ हवासा
बघून स्वप्नी तुला, मज मिळतो जरा दिलासा

रात अवसेची, चांदण्यांचे गोडवे गाते
रडून थकलेली मी, टाकते जरा उसासा

मिटताच डोळे पुन्हा, तू का उठवायला येतो
होतात हाल माझे, जसा पाण्याविन मासा

छळणे तुझे बटांना, मज मुळीच नवे नाही
तो स्पर्श जाणीवेचा, वाटतो नवा नवासा

बघ कस नभपटलावर, चांदण खुलून आलय
त्या शुभ्र चांदण्यांमध्ये, दिसतोस तू जरासा

©प्रतिक सोमवंशी
Instagram @shabdalay

असेही काही नाही

Submitted by प्रतिक सोमवंशी on 4 May, 2019 - 08:57

वाटते तुला रोज पाहावे, असेही काही नाही
तुझ्यासवे रोजचे बोलावे, असेही काही नाही

सूर्यास्तानंतर का माहीत, ही सांज लाडात येते
तुला मी सांज समजून घ्यावे, असेही काही नाही

मी बसतो गणित मांडून, नेहमीच ‛ति’च्या आठवांचे
म्हणून ‛तुला’च दूर करावे, असेही काही नाही

तु पण बसतेसच की कवटाळून, तुझ्या जुन्या जखमांना
मीही नवे घाव त्यावर द्यावे, असेही काही नाही

ये जरा जवळ, बस शेजारी, कुरवाळू एकमेकांना
या आठवांना आठवावेच, असेही काही नाही
©प्रतिक सोमवंशी
Instagam @shabdalay

दिसत नाही का रे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 March, 2019 - 00:49

रस्त्यावर चालताना तुला खड्डा दिसत नाही का रे?
रोजच्या चौकात तुला हल्ली कुणी पुसत नाही का रे?
.
तुझ्या समोर नुसता डोळ्यांनीच तिचा बलात्कार होतो
नाक्यावरच्या षंढावर तुझा हात उठत नाही का रे?
.
सावळ्याच लेकरू वाचवायला तर माऊली आलती
त्या पेठेच्या चिखलात तुझा पाय रुतत नाही का रे?
.
खूप बेचव झालीय रे आज तुझी आवडीची आमटी
देवळातून चोरलेल खोबरं तू खिसत नाही का रे?
.
रात्रीस 'प्रति' काय विचारतो जरा लक्षपूर्वक ऐक
लाच देऊन स्वर्गात थोडी जागा मिळत नाही का रे?
©प्रतिक सोमवंशी
इंस्टा @shabdalay

शब्दखुणा: 

--खूप आहे--

Submitted by Nilesh Patil on 23 April, 2018 - 08:21

--खूप आहे--

अंतरीच्या मनाला भाव खूप आहे,
माझिया प्रेमाला नाव खूप आहे..।

कधीतरी यावे ओठांवर ते गीत,
माझिया मनावर घाव खूप आहे..।

भरकटले ते सारे आसवांचे मेघ,
वळणावर लागले मज गाव खूप आहे..।

विस्तवातील ठिणग्या जाळ धरु लागल्या,
ह्रदय जाळणारे ते आव खूप आहे..।

गेले आकाशी सारे,स्वच्छंदी अशी पाखरे,
भूईवर राहिले ओरडणारे काव खूप आहे..।

प्राण सोडूनि गेले,भाव भक्ष झाले,
नाठाळ लांडग्यांनी मारले ताव खूप आहे..।

--निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गजल