प्रतिक्षा...

Submitted by मुग्धमानसी on 24 April, 2015 - 03:20

भर ओसरेल सारा
गाळ राहिल तळाशी,
तुझे हरवले सारे
तुला दिसेल मुळाशी...

तुझी गोड सांजभूल
तुझ्या गंधाळल्या रात्री...
तुझे भाबडे चांदणे
तुझ्या धुंदावल्या गात्री!

तुझी सावली सावळी
तुझी गर्द निळे भास
तुझा यमुनेचा तीर
तुझे वादळले श्वास...

तुझ्या तळहातावर
चिकटले काही स्पर्श
ओघळून गेल्यावर...
काही दिस... काही वर्ष!

सारे तुझेच असेल...
पण तूच तुझा नाही!
तुझ्या आत आत आहे
कुणी वाहते प्रवाही!

आता आलेच शेवटी...
वाट पाहणे अनंत!
डोळे मिटून टाळणे
उभ्या जगण्याची खंत!

असे होईल ना कधी...
भर ओसरेल सारा...
आत आतला प्रवाह...
आत आतला उबारा...

आता बघायचे आहे
तिथे मुळापाशी काही
गाळातच मुरलेली...
माझ्या अस्तित्वाची शाई!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह! अप्रतिम! Happy
तुझी गोड सांजभूल
तुझ्या गंधाळल्या रात्री...
तुझे भाबडे चांदणे
तुझ्या धुंदावल्या गात्री!>>> विशेष!!!!!!!!

वाह काय सुंदर आहे...

आता बघायचे आहे
तिथे मुळापाशी काही
गाळातच मुरलेली...
माझ्या अस्तित्वाची शाई!>> मस्त!

सारे तुझेच असेल...
पण तूच तुझा नाही!
तुझ्या आत आत आहे
कुणी वाहते प्रवाही!> वाह!

लोक हितासाठी की कविता वर आणत आहे..:)