अज्ञात
मी एका अज्ञात जागी येउन अडकलेय
हे रस्ते अनोळखी आहेत
घरांचे दरवाजे बंद आहेत
झाडांच्या सावल्या निष्पर्ण आहेत
झर्याच्या पाण्याला ओळखीचा आवाज नाही
पाण्याची चव अनोळखी...
सगळं गाव काळोखी...
धुळीनं माखलेल्या पायांना
या वाटा थारा देईनात
इथं तिथं सगळीकडे... अंधारात पेरलेले सोबती
पण तेही काही साद देईनात
कोलमडून मला स्वत:तच कोसळताना पाहताहेत
पण ते माझ्या हाती हात देईनात
मला वाटा शोधायला हव्यात
की... त्याच भिरभिरत आल्यात अश्या इथवर?
मलाच शोधत?
आणि स्वत:लाच हरवून बसल्याहेत?