मानस कविता

माझा पहिला कवितासंग्रह

Submitted by मुग्धमानसी on 4 June, 2014 - 06:26

माझा पहिलावहिला कवितासंग्रह....

IMG00511-20140603-2101.jpg

मायबोलीनं दिलेल्या उभारीमुळे आणि अनेक मायबोलीकरांच्या शुभेच्छांमुळे माझा हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होऊ शकला आहे. मी मायबोली प्रशासनाचे आणि सर्व मायबोलीकरांचे मनापासून धन्यवाद!

हा कवितासंग्रह खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे -

1 Ideal Pustak Triveni-Dadar 022-24304254
2 Majestic Book House-Dadar 022-24305914
3 Majestic Book House-Vileparle 022-26132879

शब्दखुणा: 

एक दु:ख हवे माणसाला...

Submitted by मुग्धमानसी on 30 May, 2014 - 07:04

गडद होत जाणार्‍या अंधाराच्या नसानसांत
भळभळणार्‍या, ठसठसणार्‍या अदृष्य चिघळट जखमेसारखे...

वैश्येच्या लाचार हास्यात काठोकाठ ओथंबून ठिबकत, ओघळत राहिलेल्या
अपमानास्पद थुंकीसारखे...

चौकातल्या नागड्या भिकार्‍याच्या कंबरेवर फडफडणार्‍या एकमेव चिंधीत गुंडाळून ठेवलेल्या
विश्वातल्या समस्त भंपक लज्जेसारखे...
.
.
.
एक दु:ख हवे माणसाला... कायम...
त्याच्याच पायाशी घुटमळणार्‍या... त्याच्याच काळ्या सावलीसारखे!

शब्दखुणा: 

मी थांबले... समजू नको!

Submitted by मुग्धमानसी on 6 May, 2014 - 03:57

तू मला व्यापू नको
जा निघ इथून थांबू नको
मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!

तापली होती उन्हे
दिसली जराशी सावली
माझी उपाशी भूक मग
तेथे जराच विसावली

सैलावली स्वप्ने जरा
आशा जरा रेंगाळल्या
या पावलांतून बोचर्‍या
भेगा जरा सुस्तावल्या

मी नेत्र माझे झाकले
छातीत भरला मारवा
पुढल्या उन्हासाठीच मी
वेचित आहे गारवा...

हे झोपणे समजून तू
माझ्याकडे फिरकू नको
मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!

गाठून एकांती मला
गात्रांत माझ्या झिरपुनी
नकळत असा ’चढतोस’ तू
ओळख तुझ्याशी ही जुनी

रक्तातूनी हृदयाकडे
अन् मग विचारांतून तू...
माझ्याच आतून खेचूनी
नेतोस मजला दूर तू...

शब्दखुणा: 

मी!

Submitted by मुग्धमानसी on 7 March, 2014 - 02:16

भगवंताचे डोळे, त्यातले मी पाणी,
चित्तातला वन्ही, विझविते.

कानड्याचे पाय, त्यातली मी वीट,
तोलताहे नीट, तुझी श्रद्धा!

श्रीरंगाचे बाहू, त्यातली मी मिठी,
अद्वैताच्या गाठी, बांधते मी.

ओंकाराचा नाद, त्यातला मी श्वास,
त्याविण विश्वास, जन्म नाही!

उद्याची माऊली, ब्रम्ह तीचे दास,
उरी नऊ मास, जगविते.

थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी.

नको पडू पाया, नको करू पुजा,
देव्हार्‍यास दुजा, देव शोध.

माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?

आगीतली धग, पाण्याचा ओलावा,
अनुभव घ्यावा, तेंव्हा कळे!

तसे बाईपण, मातीत मुरते,

शब्दखुणा: 

अंतरे...

Submitted by मुग्धमानसी on 25 February, 2014 - 04:57

ही अंतरेच सारी माझ्या तुझ्यातली पण
व्यापून अंतरांना उरतेच तू नि मीपण!

मी अंतरात माझ्या मोजीत बैसते रे
पाऊल एकटीचे मापीत बैसते रे
मी पोचते जरा अन् तू पावलात एका
जातोस लंघूनी हे मम भोवतीचे कुंपण...

तू बोललास माझ्या कानी उगाच काही
नसतेच ऐकले तर असते अजुन प्रवाही
पण थबकले तिथे मी, तेथेच थांबले मी
आता वहायचे तर, आहे कुठे ते जलपण?

ती वेळ योग्य होती, संधी सुयोग्य होती
आले उधाणूनी मी, तू वेचलेस मोती...
मोत्यांस वेचताना भिजलास ना जरासा?
ते तेवढेच... बाकी सारेच कोरडेपण!

आता उजाडताना मी रोज साद देते
माझ्यातल्या तुला मी हटकून मात देते
सगळ्याच अंतरांना अलवार जोडणारा

शब्दखुणा: 

मन

Submitted by मुग्धमानसी on 13 February, 2014 - 01:19

मन... मन... मन...
दोनच अक्षरांत सामावलेलं अनंत, अखंड, अफाट गगन!

कधी ते असतं स्वच्छ निळं, तान्ह्या बाळकृष्णासारखं निरागस
तर कधी असतं धुरकट पांढरं, मिष्कील आणि राजस!

कधी असतं मळभलेलं.... गुदमरणारं, गहिवरणारं...
आणि केंव्हा न सांगताच घनघोर धोधो कोसळणारं!

मन फार उनाड असतं, चंदनाचं झाड असतं,
कधी असतं गुणी बाळ, कधी मोठं द्वाड असतं.
मन मनोहरी गंधांचं,
कधी विषारी नागांचं
विरळ सावली, विरळ उन्हही
कधी निवारा, कधी तापही
मनाच्या पंखांना मनाचाच पिंजरा,
डोक्यातल्या द्वंद्वाला मनाचा आसरा

मन काही बोलत असतं, सतत काही सांगत असतं,
जगाच्या कलकलाटात बावचळून बिचारं...

शब्दखुणा: 

वाट चुकलंय माझं गाव!

Submitted by मुग्धमानसी on 11 February, 2014 - 05:20

कैच्याकै उगाचच.... काहिसुद्धा कारण नाही!
आत्ता तर खिडकीबाहेर जरासुद्धा पाऊस नाही!
मस्त कोवळं पडलंय उन,
तेही उबदार खिडकीतून...
तुकड्या तुकड्यात हलतंय पान
काही नवं, बरंच जून...
दूर दूर सुद्धा कुणी आर्त वगैरे आळवत नाही
उगीच जवळ बसून कुणी हळवं-बिळवं बोलत नाही
तरिसुद्धा कहितरी
बिनसलेलं आहे राव
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!

किबॉर्डाच्या कडकडाटात गहिवरून काय येतंय...
एसीहूनही गार माझं, मन निपचित होऊन जातंय...
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय
हे काही खरं नाही
असं होणं बरं नाही
गूढ डोह असेन मी पण
पाणवठ्याचं तळं नाही!

शब्दखुणा: 

मला ठाऊके...

Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2014 - 07:09

अनाहूत सारी किती अंतरे ही तुझे गीत माझ्या न कानी पडे
तरी त्या सुरांनी असे काय केले कि गेले इथे चांदण्याला तडे

अपेक्षा मला ना तुझ्या आठवांतून येण्याचि वा भासण्याची सुधा
तरीही जरा सांज होताच माझी निघे साऊली त्याच वाटेकडे

तुझा चंद्र होता तुझ्या चांदण्या, नील आकाश होते तुझे... मी कुठे?
पहाटे दंवाचे मुके थेंब झाले, तुला वाहिले कुंद ओले सडे!

कधी धावतो प्राशुनी स्वैर वारा कधी शांत तो रोवल्यासारखा
कधी तो मला भेटतो सांजवेळी... नि देतो उन्हाचे रुपेरी कडे!

शब्दखुणा: 

भेट

Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2014 - 02:45

सखे कुणाला नकोच सांगू कधीच पण हे असेच झाले
पुन्हा एकदा मला भेटताना मी दचकून चक्क उडाले!!!

दिवस असे की घरात माझ्या मलाच झाले अनोळखी मी
मला पाहूनी माझे डोळे हसले, म्हटले - ’अतिथि आले!’

झुळूक उष्णशी अंगावरूनी अशी लहरली... शहारले मी...
कसे तिच्या श्वासांस कळावे तिच्यात मी नखशिखांत न्हाले!

कुठे जरासे धडधडणारे थडथडते ते बघूदे तरी...
म्हणून गेले जरा खोल अन् ह्रदयाला मी डिवचून आले...!

तिथे कुठेसे कोपर्‍यात ते जीर्ण फाटके तुकडे होते
मला पाहूनी स्वप्ने माझी रुसली, मीही कातर झाले...

जिथे तिथे साठून धुळीचा ठसका जाब विचारित होता
धूळ नव्हे ती राख... अपेक्षांची तीही मी झटकून आले.

शब्दखुणा: 

कवडसा

Submitted by मुग्धमानसी on 6 January, 2014 - 02:18

होय होता तोच माझ्या मन्मनीचा आरसा
पण अचानक जाहला होता जरा अंधारसा

कोण कुठले पिस हिरवे उमटूनी बसले तिथे
मी इथे रुतले तरिही उमटला नाही ठसा!

दिवस होते ओलसर अन रात्रही गंधाळशी
त्या ऋतूचा व्हायचा होताच मज आजारसा...

रे हसा भरपूर अन् थट्टा करा माझी अशी
फसवले मज निमिष तो होता सुगंधित धुंदसा!

बंद नेत्रांनी तुला मी शोधणे नाही खरे
डोळसांचा यापुढे घेणार आहे मी वसा...

कुंद ओले दमट नाते सडून जाण्याआत रे
सार पडदे उजळूदे अंतरात सुंदर कवडसा!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता