विक्षिप्त

Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2015 - 02:13

कशासाठी जगता जगता
खुणा ठेवत जायचं मागे?
एकेक श्वास ओढता-सोडता..
पुसत जावेत सर्व धागे...!

कशासाठी हुळहुळावं
नाव माझं कुण्या ओठी?
माझं माझं गाणं आहे
माझ्या पैंजणांच्या ओठी!

अनामी मी...
मला कुणी ठेवो नावे... मला काय?
चालताना मी मातीतही
उमटत नाहीत माझे पाय!

वार्‍याला मी गंध-बिंध
काहीसुद्धा देत नाही...
खरंच मला तुझ्या जगाची
जरासुद्धा रित नाही!

असंबद्ध वाचाळ काही...
निरर्थक बेताल काही...
अवांतराचे लांब गुर्‍हाळ
बिभत्सतेचे चर्‍हाट काही!

नैतिकतेचे बेसूर ढोल
इथून तिथून सगळंच फोल!
पाळा किंवा पाळू नका..
शेवटी सगळं मातीमोल!

आता जरा निवून जाते
माझी माझ्यात मिटून जाते
तुमच्यातच बसते तरी...
तुमच्यातून निघून जाते.

बोलत जाते.. हसत जाते..
सांडते-वेचते उगाच काही!
आताशा कळलंय मला सारं...
विक्षिप्त असणं... गुन्हा नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच मला तुझ्या जगाची
जरासुद्धा रित नाही!
>>
वाह!

पुन्हा पुन्हा वाचली
जियो मानसी!

वाह वाह!

आता जरा निवून जाते
माझी माझ्यात मिटून जाते
तुमच्यातच बसते तरी...
तुमच्यातून निघून जाते.>>> जबराट!