येईन नक्की कधीतरी...

Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2015 - 06:05

येईन नक्की कधीतरी
त्याच गल्लीपाशी परत
तोच कट्टा, तोच पार..
’त्या’च मला गोळा करत!

टेकेन जरा अलगद तिथे
हळूच घेईन भरपूर श्वास
माती ओढेन छातीत जरा
पेरीन म्हणते नवीन भास!

इथेच सांडले होते माझे
चिल्लर काही पैसे सुटे
तेंव्हापासून शोधते आहे
ऐहिक माझे गेले कुठे?

’धावून धावून दमेन तेंव्हा
फिरून येईन पुन्हा इथे’
दिला होता शब्द तुला
आठवत असते अधे-मधे...

वाट बघत माझी तसाच
थांबून असशील का रे अजून?
झेलत प्रत्येक संध्याकाळ...
रिचवत सगळे उनाड ऊन...?

ओळखशील ना मला सख्या?
मी... तुझी... ती... असो, जाऊदे!
नाव - रुप नव्हतेच तसेही...
तुला मला अनभिज्ञ राहूदे!

फक्त मला एकदा भेट ना...
त्याच तिथे त्या पारावरती
चिल्लर ऐहिक माझे सारे
उधळून दे ना वार्‍यावरती!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...
नाव - रुप नव्हतेच तसेही
तुला मला अनभिज्ञ राहूदे>>>अगदी मनी मानसीचे गुज...
छान कविता.

छान

सुरेख मानसी! .. चिल्लर ऐहिक!! किती खरं!

मला दोन्ही अर्थी भावली ही कविता. भा.रा. तांब्यांची,' मधुमागसी माझ्या सख्या परी'
' नववधु प्रिया मी बावरते' ह्या कवितांसारखी!!

धन्यवाद!
अंजली> भा. रा. तांबे म्हणजे ग्रेट! माझ्या कवितेला फारच मोठं केलंस तू त्यांचं नाव घेऊन.

होय, अगदी असंच असतं ते ''त्याच मी " च्या शोधात व्याकुळून जुनी संकेतस्थळं शोधणं .किती महत्वाची असते चिल्लर.अवघ्या ऐहिकाची.
सुपर्ब मुग्धमानसी !

सुंदर ! Happy