मानस कविता

दुःख तुलाही कळले असते!

Submitted by मुग्धमानसी on 8 July, 2013 - 03:36

मुळे जराशी बळकट असती तर गगनाला भिडले असते
गजांआडूनी ऋतू बघण्याचे दुःख तुलाही कळले असते!

कातर ओली एखादी सर तुझ्या आत पाझरली असती
तर मी कदाचित वसंत होऊन तुझ्या मनी मोहरले असते!

किनार्‍यावरी भिरभिरणारी नजर तुझी जर ठरली असती
क्षितिजावरती न्याहाळणारे तुला... नेत्र ते दिसले असते!

पहाट होते, सकाळ होते, दुपार आणि सांज रात्र मग
त्यानंतरचे मुके बहकणे तू असता तर टळले असते!

दवबिंदूंना पाहून साधे मोघम हसणे सुचले असते
तुझ्या बगिच्यातील फुलांचे हसणे सार्थक फळले असते!

त्या धारांच्या पल्याडचे ते तुला रिक्तपण दिसले असते
या प्रश्नांनी उठता-बसता तुलाही असे छळले असते!

शब्दखुणा: 

जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे...

Submitted by मुग्धमानसी on 27 June, 2013 - 06:42

जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे
तेंव्हा तेंव्हा रात्रभर असेच धुके दाटले आहे

पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!

तुझे भास कुशीत जपत जागते बापडी निज माझी
तिच्या स्वप्नांत तुझे झाड कुणीतरी छाटले आहे.

कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!

तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.

शब्दखुणा: 

’बाय’ असणे...

Submitted by मुग्धमानसी on 25 June, 2013 - 07:07

आज पुन्हा मी जरा वैतागले आहे
रात्रभर गस्तीत माझ्या जागले आहे...

उर पाहून आठवावे दूध आईचे
ते निरागसपण ढळाया लागले आहे...

भूक त्यांची कोणती जी हाय भागेना
भाकरीचे चंद्र सगळे भागले आहे...

माय म्हणते झाक बाळा आबरू सगळी
मी तिच्या डोळ्यांत तरळू लागले आहे...

कुणीतरी सांगा मला हे नीट समजवूनी
नेमके का ’बाय’ असणे चांगले आहे...?

शब्दखुणा: 

ऋतू...

Submitted by मुग्धमानसी on 24 June, 2013 - 05:57

मन पुसून कोरडं कर
पाऊस पडून गेल्यावर
पुन्हा छातीत वारं भर
श्वास सुटून गेल्यावर...

उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर...

तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...

जमेल तेंव्हा जमेल तसं
जमेल तिथे भेटत जा
वसंत पुन्हा दिसणार नाही
एकदा बहरून गेल्यावर...

डोह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...

शब्दखुणा: 

पुन्हा तोल जातो जरासा जरासा...

Submitted by मुग्धमानसी on 19 June, 2013 - 06:44

पुन्हा तोल जातो जरासा जरासा
मला भास होतो जरासा जरासा

मनाच्या तळी दाबलेला उमाळा
तुझा श्वास होतो जरासा जरासा

तुझे पाहणे नेमके या दिशेने
मी बेजार होतो जरासा जरासा

असा उंबरा काळ ओलांडताना
तुही हासला ना जरासा जरासा?

सभोती दिशा फाकल्या एवढ्या की
रडे पिंजराही जरासा जरासा...

पहा आजमावून दूरी जरा ही
पुन्हा लांब हो तू जरासा जरासा

मनाची दिशाभूल ही रोजची रे
तरी त्रास होतो जरासा जरासा...

शब्दखुणा: 

असं कुठे असतं का?

Submitted by मुग्धमानसी on 11 June, 2013 - 07:50

येतोस तरी येतच नाहीस... असं कुठे असतं का?
दिसतोस पण बघत नाहीस... असं कुठे असतं का?

पाऊस म्हणवतोस स्वतःला अन् भिजवून जातोस चिंब पण
मातीत खोल झिरपत नाहीस.... असं कुठे असतं का?

वाटेल तेंव्हा वाटेल तिथे जातोस निघून.... ठिक आहे...
मागे काहीच ठेवत नाहीस... असं कुठे असतं का?

क्षण क्षण शेवरीसारखा भिरभिरत निसटून जाऊ देतोस
चिमूट जराही उघडत नाहीस... असं कुठे असतं का?

हट्ट वगैरे, तत्त्व वगैरे, मुद्दे वगैरे सगळंच ठाम!
झुळुकीनं सुद्धा हलत नाहीस... असं कुठे असतं का?

शब्दखुणा: 

पाऊस फार झाला

Submitted by मुग्धमानसी on 7 June, 2013 - 05:09

पाऊस फार झाला
जीवाच्या पार झाला
पुन्हा ओल्या सरींचा
मला आजार झाला

ढगांच्या पार त्याने
ओढूनी चित्त नेले
इथे उरले धुके अन्
तिथे अंधार झाला

कसा निर्लज्ज पाऊस
शिरे वस्त्रांत माझ्या
मोकळी गात्रं झाली
निळा शृंगार झाला

बिलगला तो असा की
स्मृती सगळ्या निमाल्या
उरी काळ्या मण्यांचा
उगाचच भार झाला

असे त्याचे गरजणे
नी मी चोरून भिजणे
जुन्या सवयींस माझ्या
नवा आधार झाला

बदलती ऋतू तरिही
कोरडे उरे तरिही
दिठीच्या पार नेहमी
पाऊस फार झाला...

शब्दखुणा: 

तुला कधी कळेल का?

Submitted by मुग्धमानसी on 4 June, 2013 - 03:54

भेटलो जिथे पाऊल
पुन्हा तिथे वळेल का?
पुन्हा माझी आठवण
तुला तशी छळेल का?

दूर जायचेच होते
सार्‍या रहाटीपासून
पण तुझे दूर जाणे
मला सांग टळेल का?

आता देशील सोबत
आता धरशील हात
माझे पांगूळले मन
कधी पुन्हा पळेल का?

दोन शब्द हवे होते
तेंव्हा गप्प राहिलास
आता गाईलेस गाणे
माझ्या कानी पडेल का?

वाट पाहता पाहता
जीव कंटाळून गेला
उंबर्‍यात तू दिसावा
असे कधी घडेल का?

असे मन जाळताना
क्षण क्षण हारताना
माझ्या हासण्याचे रडे
तुला कधी कळेल का?

शब्दखुणा: 

आता मला जगणं जरा जमेलंसं वाटतंय...

Submitted by मुग्धमानसी on 3 June, 2013 - 01:34

भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...

थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...

एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...

उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...

जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...

शब्दखुणा: 

तुझ्या चिंतनाची नशा और आहे...

Submitted by मुग्धमानसी on 22 May, 2013 - 03:39

तुझ्या चिंतनाची नशा और आहे
तू नसणे समोरी... तसे गौण आहे!

जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!

फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?

नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!

मनीच्या प्रदेशी तुझे राज्य असते
जरी ते अताशा कोरडे शुष्क आहे!

अशा छान बेबंद जमतात गप्पा...
मध्ये शब्द उच्चारणे.. व्यर्थ आहे!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता