सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १
२०१३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष', म्हणून साजरं केलं जातंय. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित / संख्याशास्त्र म्हटलं की "भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर", याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची गणितं उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर १९४७ सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट सरकारनं एका कंत्राटदाराला दिलं होतं.