गझल

डोळे मिटले तरिही तो असतो जागा टक्क ..

Submitted by कविता क्षीरसागर on 23 February, 2016 - 11:56

डोळे मिटले तरिही तो असतो जागा टक्क
जो असतो अपुल्यामध्ये ना दाखवता हक्क

ज्ञानेशाच्या ओव्या , की शतजन्मांची कोडी
अजुनी ती ना सुटली ... विद्वत्ता झाली थक्क

रानात उमलले जरि ते गंध लपेना त्याचा
हे शहरी अत्तरवाले शोधत आले चक्क

बिब्बा घालावा म्हणुनी यत्न कितींनी केले
तुटणारच नाही मैत्री .. नातंच आहे पक्कं

अंधार जवळचा वाटे माझ्या एकांताला
थोडा उजेड सुद्धा मग वाटत जातो भक्क

लाटांनी या गिळल्या किंकाळ्या तरुणाईच्या
आठवण जरी आली तर काळिज होते लक्क

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

गझल -

Submitted by विदेश on 14 February, 2016 - 14:21

उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही
देवा राहू दे दु:खातच त्याविण करमत नाही

आवड मजला ना पुष्पांची का पसरवली अफवा
होती ती काट्यांची सवयच फूलहि धरवत नाही

हसतो बघुनी परका कोणी स्नेही जणु समजोनी
रस्त्यावर सामोरी दिसता अपुला फिरकत नाही

आवडतो मज माळायाला गजरा ग सखे तुजला
नाही बघवत तो सुकल्यावर यास्तव माळत नाही

रंगत चढते भान विसरुनी लोकांना हसवाया
आनंदी खोटाच मुखवटा कोणा समजत नाही

पथ काटेरी पायाखाली मज सवयीचा आहे
हिरवळ सुखदच बागेमधली मजला वाटत नाही ..
.
........... विजयकुमार देशपांडे

भेटायाचे नाही आता ....

Submitted by कविता क्षीरसागर on 7 February, 2016 - 00:59

भेटायाचे नाही आता ....

काहुर उठले मन कातरले जेव्हा गगनी झांजरले
परतीच्या त्या वाटेवरती सखया काळिज अंथरले

भेटायाचे नाही आता ठणकावुन मी सांगितले
जाई ना पण दुःखच लोचट वेडच त्याने पांघरले

मुरलीच्या त्या धुंद सुरांनी भान हरपले गोपींचे
ठाउक त्यांना की कृष्णाने राधेला होते स्मरले

डबडबले सर्वांचे डोळे करुण कहाणी ऐकुन ती
पाहुन माझे डोळे कोरे मीच स्वतःला घाबरले

आयुष्याचा गुंता झाला प्रारंभ नव्याने केला
देते उत्तर दैवाला "बघ अजुनी नाही रे हरले"

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

गझल -

Submitted by विदेश on 5 February, 2016 - 12:16

गेलो सांभाळत माझा म्हणुनी मी ज्याला त्याला
सोबत माझ्या अन्य कुणी कुत्रा सोडुन ना आला

काळ भिण्यातच वैऱ्याला का आयुष्याचा गेला
वार कसा मम मित्राचा सहजच पाठीवर झाला

असते माया अपुल्याजवळी तोवर सच्ची नाती
दिसती पक्षी सोडुन जाता वठलेल्या वृक्षाला

परगावाहुन परताया करता थोडा आळस मी
अश्रू पाझर तव नयनी अवकाळी वर्षावाला

पाहुन दु:खा पाझरती ढग माझ्या डोळ्यामधले
दुष्काळाला बघुन दया वाटावी आकाशाला ..
.

शब्दखुणा: 

का असे? नशिबास पुसणे, आपल्या हातात नाही...

Submitted by हर्षल_चव्हाण on 4 February, 2016 - 20:52

का असे? नशिबास पुसणे, आपल्या हातात नाही,
एकही रेषा बदलणे, आपल्या हातात नाही...

जवळ येणे, दूर जाणे, हात हातातून सुटता,
त्याक्षणी सारे विसरणे, आपल्या हातात नाही...

मी तुझा झालो कधी, जाणतो कळलेच नाही,
शपथ! झाले ते न घडणे, आपल्या हातात नाही...

अंतरीचे मळभ होते दूर; तू येता नभावर,
पण खुले अवकाश मिळणे, आपल्या हातात नाही...

शहरभर एकांत जे शोधीत फिरते मोकळ्याने,
मन सुने; बंदिस्त करणे, आपल्या हातात नाही...

-हर्षल (५/२/१६ - स. १०.४५)

शब्दखुणा: 

टोचत होते झोप अनावर का स्वप्नांचे भाले..

Submitted by विदेश on 3 February, 2016 - 14:08

टोचत होते झोप अनावर का स्वप्नांचे भाले
शरणागत मी अंथरुणावर जागे होणे झाले

गप्प बसा म्हटले मी होते माझ्या जरि शब्दांना
मौनातुनही बोलत अश्रू नयनातून निघाले

मंत्र तंत्र नवसातुनही पदरी नाही काही
बाबाची होताच कृपा ती जन्मास जुळे आले

एकी दाखवता दु:खांनी कवटाळत मज देही
घाबरुनी का माझ्यापासुन सुख ते दूर पळाले

झाल्या भरुनी झोळ्या त्यांच्या माझ्याही दानाने
मागितल्यावर दान कधी मी चक्क नकार मिळाले ..
.

शब्दखुणा: 

दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..

Submitted by विदेश on 29 January, 2016 - 22:51

बोलतो मी जास्त जेव्हा चुप बसवती का मला
गप्प असतो मात्र तेव्हा बोल म्हणती का मला

वाटते ना कायद्याची आजही भीती कुणा
लाच देता काम होते ते हुडकती का मला

ओळखीचे चांगले ते समजुनी मी भेटता
विसरुनी उपकार माझे दूर करती का मला

सांगतो सर्वास माझी जात मी माणूसकी
घेउनी बाजूस कानी परत पुसती का मला

चार येती कौतुकाचे शब्द कानी ऐकण्या
दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..
.

तुरटी ....

Submitted by कविता क्षीरसागर on 29 January, 2016 - 05:14

तुरटी ..

खुबीने चेहरा तू झाकला
लपविला का घरोबा आपला

गुलाबी पाश सारे तोडले
पुन्हा हाकारती स्वप्नी मला

कुठे मिळते पहा तुरटी अशी
मनाशी गाळ आहे साचला

मनाचा कोपरा देते तुला
व्यथांनी भाग बाकी व्यापला

खुशीने राहुया वृद्धाश्रमी
कुणाचा मोह नाही चांगला

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता ..

Submitted by विदेश on 26 January, 2016 - 14:27

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

शब्दखुणा: 

बरे झाले ..

Submitted by कविता क्षीरसागर on 24 January, 2016 - 01:16

बरे झाले ...

नव्याने भाग्य रेखू ... दैव देणे विसरले तर
कुणी काही करू शकते मनाने ठरवले तर

खुशाली पत्र केव्हाचे उराशी घट्ट धरले
खुळी अजुनी कशी रडते ... कितीही हसवले तर

सुईचे शस्त्रही होते, सुईने सांधता येते
कसा करशील वापर हृदय माझे उसवले तर

कुठे अन्याय होता .. फक्त बघतो, भ्याड आम्ही
लढू शकणार कैसे, हेच हृदयी ठसवले तर ?

बरे झाले मनाला घट्ट करणे जमत आहे
तरी पण व्हायचा तो त्रास होतो .. फसवले तर

मनाचा कौल मोठा, जात नाही, धर्म नाही
नका आणू मधे कोणी गणपती बसवले तर

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल