गणेश शिंदे

तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..

Submitted by दुसरबीडकर on 24 May, 2017 - 05:11

'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!

डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!

एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!

'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!

पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!

एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!

गणेश शिंदे दुसरबीडकर

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..

Submitted by दुसरबीडकर on 13 December, 2015 - 05:24


जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..

आनंदी आयुष्याची एखादी ओळ..

Submitted by दुसरबीडकर on 9 November, 2014 - 09:06

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!

शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

हे असे आभासवाणे चांदणे(तरही)

Submitted by दुसरबीडकर on 12 October, 2014 - 22:26

तरही गझल...
मूळ मिसरा आदरणीय गझलकारा संगिताताई
जोशी ह्यांचा...!!
'हे असे आभासवाणे चांदणे आता नको..'

स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा..
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!!

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

संपुदे वनवास देवा एकदा हा प्राक्तनाचा..

Submitted by दुसरबीडकर on 6 October, 2014 - 11:52

बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!!

केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!

पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!!

रात्रभर बाहेर मी आलोच नाही हाय! दैवा..
अन सकाळी चांदणे संपून गेले यार तोवर..!!

संपुदे 'वनवास' देवा एकदा हा प्राक्तनाचा..
मग हवे तर 'राज्य'ही नाकारतो बघ मीच सत्वर..!!

झोप डोळ्यातील आता जाणवू दे ना जराशी..
जायचे आहे सकाळी 'नीज रात्री' तूच लवकर..!!

फार झाल्या आजवर चोर्या उगाचच
ह्या कफल्लक...

हा देहाचा सुर्य कलू दे...

Submitted by दुसरबीडकर on 5 October, 2014 - 12:16

हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!

इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!

हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!

काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!

हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!

दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!

-गणेश शिंदे..!!

देहास जाळण्याला मी ही अधीर नाही..

Submitted by दुसरबीडकर on 4 October, 2014 - 08:40

देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही..
अग्नीस जोर यावा,ऎसा समीर नाही..!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,नयनात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही..
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

देहास जाळण्याला मी ही अधीर नाही..

Submitted by दुसरबीडकर on 4 October, 2014 - 08:40

देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही..
अग्नीस जोर यावा,ऎसा समीर नाही..!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,नयनात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही..
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

तू गेल्यावर.....!!

Submitted by दुसरबीडकर on 2 July, 2014 - 12:01

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

Pages

Subscribe to RSS - गणेश शिंदे