गझल

अंधार हा ….

Submitted by कविता क्षीरसागर on 21 January, 2016 - 09:58

अंधार हा ….

युगांचा साचला अंधार हा
घृणेने गोठला अंधार हा

नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा

कशाला माळले तू चांदणे
तुझ्यावर भाळला अंधार हा

नको लाजू प्रिये दे ओठ दे
बरे की लाभला अंधार हा

सरावाने नजर मरतेच ना
तरी का लाजला अंधार हा

पुन्हा झाले रिकामे घर , तसे
छळाया लागला अंधार हा

सुरांनी एवढे केले खुळे
निळासा भासला अंधार हा

उगा नावे कुणी ठेवू नका
खरे तर चांगला अंधार हा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही -

Submitted by विदेश on 20 January, 2016 - 11:47

ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही
ओळख असता टाळत नजरा उलटे फिरती काही

उगवत मातीतून बिजाला आनंदाला भरते
शेवट अपुला अंती माती का घाबरती काही

प्रयत्नांती ईश्वरप्राप्ती माहित हे सर्वांना
देवावर नवसावर श्रद्धा ठेवुन फसती काही

रस्त्यावरुनी पुष्प गुलाबी विकुनी जगती काही
अंथरुणावर स्वप्न गुलाबी बघतच मरती काही

कलियुग आहे कोणालाही कोठे कृष्ण न भेटे
दु:शासन का जागोजागी मिरवत दिसती काही ..
.

शब्दखुणा: 

फणा ...

Submitted by कविता क्षीरसागर on 16 January, 2016 - 13:30

फणा ....

उपटला प्रश्न हा मी तणासारखा
जन्म का रे दिला सरपणासारखा

का तुझा माजला रे अहम् मानवा
जाण विश्वात या तू कणासारखा

तिष्ठते मी किती , वेळ तू पाळ ना
का असा वागतो साजणा सारखा

वाटते नेहमी शरण यावे तुला
आडवा येतसे मीपणा सारखा

तोडले बंध अन् हायसे वाटले
पाळते दिवस तो मी सणासारखा

तत्व जी पाळली … तोडली जर कधी
उकळतो जीव हा आधणासारखा

दंशते जीभ ही गरळ ओके अशी
छाट ना ... काढते ती फणा सारखा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

शक्य नाही ...

Submitted by कविता क्षीरसागर on 3 January, 2016 - 21:50

शक्य नाही ...

वाटले होते तुझा होकार मिळणे शक्य नाही
वाटते आता मला की काय करणे शक्य नाही

ठेविला विश्वास इतका आंधळ्यागत मी तुझ्यावर
मागुनी तू वार केला ... घाव भरणे शक्य नाही

काढले डोळ्यांत पाणी पावसाने या सुगीला
देव घेतो ही परीक्षा मज हरवणे शक्य नाही

कापसाच्या बाहुलीसम देह का देशी असा तू
जाळती दुःखे अशी की श्वास उरणे शक्य नाही

गाळल्या अश्रूंस तारण ठेविले आहे तिने रे
हासणे भेसूर वाटे ... ते विसरणे शक्य नाही

लपव ना रे वर्तमाना काळसर ह्या भूतकाळा
प्राक्तनापासून पण का हे लपवणे शक्य नाही

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

भाकरी ...

Submitted by कविता क्षीरसागर on 25 December, 2015 - 23:49

भाकरी …।

वाढल्या ढे-या तयांना का न रुचते भाकरी
कष्टणा-या झोपड्यांचे पोट भरते भाकरी

लेक मागे लागलेला पुरणपोळी दे मला
आसवे लपवून आई गोड करते भाकरी

दोन भावांच्या मध्ये ही फुट पडली का अशी
कोप-यामध्ये चुलीवर बाल्य स्मरते भाकरी

ध्यान नाही जेवण्याचे वेळ झाला हा किती
वाट पाही घरधन्याची हाय ! झुरते भाकरी

पोट लावी हे कराया चोर नाही तो खरा
दोष सारा हा भुकेचा रडत म्हणते भाकरी

टाकुनीया माजलेल्या भव्य ह्या खानावळी
पोट भरताना भुकेले तृप्त हसते भाकरी

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

ओझे झाले …

Submitted by कविता क्षीरसागर on 20 December, 2015 - 09:28

ओझे झाले …

ही फरफट आयुष्याची बघण्याचे ओझे झाले
रुसुनीया नशिबावरती जगण्याचे ओझे झाले

पण कितिदा गमवायाचे स्वत्वाला माझ्या मी
या मानी -हदया आता हरण्याचे ओझे झाले

जा दुस-या कोणा सांगा ह्या बाता स्त्रीमुक्तीच्या
या मुद्दयांवर पुरुषांच्या फसण्याचे ओझे झाले

बघ उडुनी गेले अत्तर घमघमतो अजुनी फाया
तो गेल्यावरही मागे उरण्याचे ओझे झाले

का शिवरायांच्या नावे तलवारी उठती अजुनी
ह्या इतिहासाच्या पोथ्या जपण्याचे ओझे झाले

पुष्पक धाडा हो त्यांना स्वर्गाची उघडा दारे
ह्या पृथ्वीला संतांच्या असण्याचे ओझे झाले

शब्दखुणा: 

वाटा …

Submitted by कविता क्षीरसागर on 14 December, 2015 - 08:34

वाटा …

ओळखीच्या कशा तिच्या वाटा ?
काय स्वप्नांत पाहिल्या वाटा ?

भास त्याचा उगाच का झाला ?
शोध घेऊन परतल्या वाटा

का पुन्हा मी तुझ्याच दाराशी
हाय ! वाटाच विसरल्या वाटा

बहर सारे जळून गेले रे
मग वसंतात टाळल्या वाटा

का अशी सैरभैर होशी तू ?
या कशाने ग पुसटल्या वाटा ?

हा प्रवासी पसंत नाही तर
बदलल्या पाहिजेत ह्या वाटा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

ध्येय …

Submitted by कविता क्षीरसागर on 12 December, 2015 - 03:52

ध्येय …

संधी अशी दिली तू हे भागधेय माझे
आता गगन जरासे विस्तारतेय माझे

मायेत गुंतलेल्या या शृंखला मणाच्या
एकत्र राहतो हे छकुले न श्रेय माझे

वेडी तहान लागे या पोळल्या मनाला
विरहात सांडलेले अश्रूच पेय माझे

नशिबात मरण नाही पदरात पोर आहे
मोठी तिला कराया जगणेच ध्येय माझे

काही विशेष नाही गझलेत गुंफलेले
जगण्यातलेच काही मी मांडतेय माझे

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

भान …

Submitted by कविता क्षीरसागर on 10 December, 2015 - 13:42

गझल हा प्रकार मला नवा आहे ,प्रयत्न करतेय , येथील दिग्गजांनी कृपया सांभाळून घ्यावे

भान …

बाहेरुनी पहाता सारेच छान आहे
काटे न दाखवावे रानास भान आहे

वास्तूत कोंडलेले दु:खी अनाथ टाहो
मोकाट वासनांचे शापीत दान आहे

ना ऐकती कुणाचे बडवेच माजलेले
त्यांच्याविना विठूचे अडते दुकान आहे

नाचून पाय थकले, गाऊन ओठ सुकले
आयुष्य का तरीही बेसूर तान आहे

अर्ध्यात हात सुटला कळ काळजात रुतली
दाबून दु:ख सारे जगण्यात शान आहे

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

अवघड झाले

Submitted by रोहितकुलकर्णी on 11 June, 2015 - 22:28

वाट पाहणे अवघड झाले
काठ शोधणे अवघड झाले

डोळ्यांमधले सत्व हरवले
सुख भोगणे अवघड झाले

कान झाकूनी गाव झोपले
हाक पोचणे अवघड झाले

मंदिर मशीद फोडून आलो
भीक मोजणे अवघड झाले

आयुष्याने कर्ज काढले
प्राण सोडणे अवघड झाले

- रोहित कुलकर्णी

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल