भाकरी ...
भाकरी …।
वाढल्या ढे-या तयांना का न रुचते भाकरी
कष्टणा-या झोपड्यांचे पोट भरते भाकरी
लेक मागे लागलेला पुरणपोळी दे मला
आसवे लपवून आई गोड करते भाकरी
दोन भावांच्या मध्ये ही फुट पडली का अशी
कोप-यामध्ये चुलीवर बाल्य स्मरते भाकरी
ध्यान नाही जेवण्याचे वेळ झाला हा किती
वाट पाही घरधन्याची हाय ! झुरते भाकरी
पोट लावी हे कराया चोर नाही तो खरा
दोष सारा हा भुकेचा रडत म्हणते भाकरी
टाकुनीया माजलेल्या भव्य ह्या खानावळी
पोट भरताना भुकेले तृप्त हसते भाकरी
कविता क्षीरसागर