हळव्या ह्या जखमांना ...

Submitted by कविता क्षीरसागर on 3 January, 2017 - 14:00

हळव्या ह्या जखमांना ...

हळव्या ह्या जखमांना फसवत नाही आता
स्वप्नांचा दरवाजा उघडत नाही आता

हलके हलके माझे यंत्रच होते आहे
जगते त्याला जीवन म्हणवत नाही आता

मेंदीमागे लपल्या तळहाताच्या रेषा
नशिबा जा सामोरी हरकत नाही आता

लाचार भुकेने ती खिडकीपाशी बसली
वाघीण हारलेली बघवत नाही आता

धूसर धूसर झाल्या आठवणी छळणाऱ्या
का हे तरिही सलते उमगत नाही आता

चमडी निब्बर झाली वखवखल्या नजरांनी
निर्मळ साधी दृष्टी पोचत नाही आता

हिरवळ सुंंदर दिसते मळलेल्या वाटेवर
मार्ग नवे कोणीही शोधत नाही आता

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>हिरवळ सुंंदर दिसते मळलेल्या वाटेवर
मार्ग नवे कोणीही शोधत नाही आता<<<जबरदस्त!

उत्कृष्ट खयालांची गझल कविता! तुझ्या गझलेतर कवितेतील व्यासंगाचा प्रभाव गझलेवर पडताना पाहणे फार सुखद आहे. शुभेच्छा!

मनःपूर्वक धन्यवाद सिंथेटिक जिनीयस, सत्यजित , राम भोये आणि बेफिकीरजी ...

बऱ्याच दिवसांनी गझल झाली .. मस्त वाटतेय ..
सर्वांच्या अशाच शुभेच्छा असू देत..

लाचार भुकेने ती खिडकीपाशी बसली
वाघीण हारलेली बघवत नाही आता

हिरवळ सुंंदर दिसते मळलेल्या वाटेवर
मार्ग नवे कोणीही शोधत नाही आता

अप्रतिम .....................

वा