ध्येय …

Submitted by कविता क्षीरसागर on 12 December, 2015 - 03:52

ध्येय …

संधी अशी दिली तू हे भागधेय माझे
आता गगन जरासे विस्तारतेय माझे

मायेत गुंतलेल्या या शृंखला मणाच्या
एकत्र राहतो हे छकुले न श्रेय माझे

वेडी तहान लागे या पोळल्या मनाला
विरहात सांडलेले अश्रूच पेय माझे

नशिबात मरण नाही पदरात पोर आहे
मोठी तिला कराया जगणेच ध्येय माझे

काही विशेष नाही गझलेत गुंफलेले
जगण्यातलेच काही मी मांडतेय माझे

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद सर्वांचे …

होय भरत , ते मणाच्या असेच आहे

पण सत्यजित तुम्ही सुचवलेला बदलही आवडला

या शृंखला मनाच्या … असे ही चांगले वाटतेय

कृपया मला सांगा ना कोणते जास्त चांगले आहे ?

कविताजी,
सुरुवातीला मला तो टायपो असावासा वाटला होता!
'मणाच्या शृंखला' मधून ओझे वाटावे अश्या अवजड बंधनांची जाणिव होते तर 'मनाच्या शृंखला'मधून,जोडून ठेवणाऱ्या कड्यांची हळुवार गुंफण जाणवते!(वै.म.)
आपणांस अपेक्षित असलेली भावना चपखल व्यक्त होणे महत्वाचे! मीही हेच शिकण्याचा प्रयत्न करतो!
बाकी,या गझलेचा सर्वस्वी अधिकार आपलाच आहे!

छान

ओह , धन्यवाद बेफिकीरजी आणि सुप्रिया …
टायपो चूक लक्षात आणून दिल्याबद्दल
लगेच दुरुस्ती करते …

धन्यवाद अरविंदजी

वेडी तहान लागे या पोळल्या मनाला
विरहात सांडलेले अश्रूच पेय माझे

नशिबात मरण नाही पदरात पोर आहे
मोठी तिला कराया जगणेच ध्येय माझे

काही विशेष नाही गझलेत गुंफलेले
जगण्यातलेच काही मी मांडतेय माझे >>>> हे शेर विशेष आवडले