मानायचो मी ज्यास माझा आरसा
मानायचो मी ज्यास माझा आरसा
पारा उडाला नेमका त्याचा कसा?
चिरकाल टिकणारे असे तू दु:ख दे
नाही मला दुसर्या कशाची लालसा
केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
आलो तुझ्या दारी भिकार्या सारखा
काळोख मी, तू दे मला चांदणपसा
झोपेल हे मन शांतचित्ताने अता
होणार आहे राज्य त्याचे खालसा
मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा