मी जगतो त्या आयुष्याची मजाच न्यारी

Submitted by मिल्या on 23 February, 2015 - 01:57

मी जगतो त्या आयुष्याची मजाच न्यारी
सावजही मी, मीच बाण अन् मीच शिकारी

रोज मनाच्या खिडकीवरती टकटक करतो
देह जणू हा सिग्नलवरचा कुणी भिकारी

फुटो पाहिजे तितक्या वाटा ह्या रस्त्याला
नेतीलच त्या फक्त तुझ्या अन् तुझ्याच दारी

तो आला, पोहला, पोचला पैलतिरावर
केव्हाचा अदमास घेत मी उभा किनारी

अर्ध्या रात्री जो रस्ता अंगावर येतो
अंग चोरुनी बसला असतो तोच दुपारी

अपुल्यामध्ये सेतू येईलही बांधता
पसार कोठे झाल्या पण मौनाच्या खारी

सूर्य, चंद्र, तार्‍यांची येते दया मला तर
कैद्यांना येइल का घेता कधी भरारी?

शब्दांच्या काही पारंब्या मनात रुजल्या
अर्थ कोणते बघू तरी घेतात उभारी

मिलिंद छत्रे ( 18 - 02 - 15 )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांगसुंदर गजल - खूपच आवडली...

रोज मनाच्या खिडकीवरती टकटक करतो
देह जणू हा सिग्नलवरचा कुणी भिकारी >>>>>> विशेष आवडले Happy

सुंदर

सूर्य, चंद्र, तार्‍यांची येते दया मला तर
कैद्यांना येइल का घेता कधी भरारी?

शब्दांच्या काही पारंब्या मनात रुजल्या
अर्थ कोणते बघू तरी घेतात उभारी<<<

व्वा मिलिंद! तुमच्या ह्या खालील शेरावरून

>>>रोज मनाच्या खिडकीवरती टकटक करतो
देह जणू हा सिग्नलवरचा कुणी भिकारी<<<

मला माझा एक जुना शेर आठवला. Happy

चौकामध्ये गाडी पुसुनी टकटक करते पोर भिकारी
खिशातून रुपया काढेतो लाल बावटा राहत नाही