जागतिक निद्रा दिन - १५ मार्च च्या निमित्ताने..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 March, 2024 - 12:08

आपण सारे रोजच सहा ते आठ तास झोपत असू. पण सर्वांनाच हे माहीत नसेल की आज १५ मार्च, जागतिक निद्रा दिन आहे.

मलाही सकाळी झोपून उठल्यावरच समजले. जेव्हा व्हॉटसपवर जागतिक निद्रा दिन दिवसाच्या शुभेच्छा देणारा मेसेज आला. त्यासोबत ज्याला शांत झोप लागते तोच खरा सुखी मनुष्य असे म्हणत भरपूर झोपायचा सल्ला आला. आणि माझ्या डोक्यातील चक्रे चालू लागली.

शांत आणि पुरेशी झोप ही नक्कीच आरोग्याच्या द्रुष्टीने छान आहे. पण शांत झोपेचा सुखासमाधानाशी जोडलेला संबंध मला कधीच पटला नाही. ज्याला बिछान्यावर पडल्यापडल्या शांत झोप लागते तो खरा सुखी मनुष्य या फंड्यावर माझा विश्वास नाही. फार तर त्याला दिवसभराच्या कामाने शारीरीकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दमलेली, थकलेली व्यक्ती म्हणू शकतो.

कारण माझ्याशी नेमके उलट होते. मी जेव्हा खुश असतो तेव्हा माझी झोप उडते. किंवा ती कमी येते. कारण मला झोप म्हणजे आयुष्यातील काही न करता वाया गेलेली वेळ वाटते. सुखी आहोत, आनंदी आहोत तर आयुष्य जास्तीत जास्त जगायला आवडते. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास, फॉर्म चांगला आहे तोपर्यंत जास्तीत जास्त धावा जमवून घ्या. अश्यावेळी दिवसाचे चोवीस तास देखील जगायला अपुरे वाटतात. मग तिथे अजून जास्तीचे झोपण्यात वेळ वाया का घालवावा असा विचार मनात येतो.

पिकनिकच्या आदल्या रात्री मला बिलकुल झोप येत नाही. तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतला असेल. कारण पुढचा दिवस धमाल आहे याची एक्साईटमेंट असते, हुरहूर असते. ही एक्साईटमेंट रोजच्या जीवनातच असली पाहिजे. मग त्यामुळे थोडी झोप उडत असेल तर त्यात वाईट काय..

परीक्षेच्या आदल्या रात्री सुद्धा मी हा अनुभव घ्यायचो. मी ईंजिनीअरींगचा बॅकबेंचर विद्यार्थी असल्याने पेपरच्या दोन दिवस आधी एक्झामचा सिलॅबस काय आहे हे बघण्यापासून अभ्यासाची सुरुवात व्हायची. अश्यात आवडीचा विषय असेल, चांगले मार्क्स मिळायची अपेक्षा असेल, टॉप करावे अशी ईच्छा असेल तर जागून अभ्यास केला जायचा. मुळात झोपच यायची नाही. एका ध्येयाने झपाटल्यासारखा अभ्यास व्हायचा. त्याचा रिझल्ट तसाच आनंददायी लागायचा.

पण तेच एखादी परीक्षा, एखादी टर्म सोडूनच द्यायचो. जेमतेम अभ्यास करायचो आणि छान ताणून द्यायचो. ती रात्र निवांत जायची. पण निकाल बिलकुल आनंददायी लागायचा नाही.

शाळा कॉलेजपासून लग्न होईस्तोवर अगणित मुलींच्या प्रेमात पडलो असेन. त्यांच्या आठवणीत, त्यांच्या गोड विचारांत, कैक रात्री जागवल्या आहेत. आज मागे वळून पाहताना त्या रात्री मी उगाच जागलो असे न वाटता उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या गोड स्वप्नात जगलो असेच वाटते.

अजून एक आपल्या सर्वांशीच वा बरेच जणांसोबत होत असेल. पाच दिवस ऑफिसचे काम करून आणि लवकर उठून आपली झोपेची बॅड वाजली असते. फ्रायडे नाईट पर्यंत आठवड्याभराची शिल्लक झोप साठली असते. जणू आज तर बिछान्यावर पडल्यापडल्या झोप येणार असे वाटत असते. पण तेच आता दोन दिवस सुट्टी आहे, लवकर उठायची काही सक्ती नाही या आनंदातच झोप उडते आणि लवकर येत नाही.

लेख जास्त पाल्हाळ लाऊन ताणत नाही, पण आयुष्यात जेव्हा जेव्हा बिछान्यावर पडल्या पडल्या झोप आली नाही वा झोपावेसे वाटले नाही तेव्हा तेव्हा आयुष्य हॅपनिंगच राहिले आहे. आजही पडल्यापडल्या झोप येण्याऐवजी अगदीच झोप अनावर झाल्याशिवाय पडावेसे वाटतच नाही. आणि हेच माझ्यासाठी सुखी असायचे लक्षण आहे.

तर लोकहो, कमी झोपा..
असा संदेश मला बिलकुल द्यायचा नाहीये.
पण इतकेच सांगायचे आहे की जे माझ्यासारखेच असतील ज्यांना शांत वा लवकर, किंवा जास्त झोप येत नाही त्यांनी आपले आयुष्य दुखी आहे समजून आणखी दुखी होऊ नका. उलट तुमचे आयुष्य जास्त हॅपनिंग आहे. तुम्हाला जागतिक निद्रा दिनाच्या स्पेशल शुभेच्छा!!

आणि हो, जाता जाता...
झोप ही नेहमी लहान मुलांसारखी आली पाहिजे.. शांत, निवांत, चिंतामुक्त... पण कधीही केव्हाही सारी दंगा मस्ती करून झाल्यावरच आली पाहिजे Happy

IMG_20240315_211859.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख ठिकठाक वाटला. चमक नाहीये त्यात पण .... आज जागतिक निद्रा दिन आहे हे कळले.

या देवी सर्वभूतेषु निद्रा रुपेण संस्थिता, .....
अनमॅनेज्ड बायपोलरवाल्या लोकांना वाटेल तेव्हा झोप येणे, आणि हवी तेव्हा न येणे हा इश्यु असतो. सर्केडिअन सिस्टिम फॉल्टी असते. औषधांनी टकाटक होउ शकते.

ज्याला शांत झोप लागते तोच खरा सुखी मनुष्य >> याचा अर्थ सुखी मनुष्याला शांत झोप लागते असा नसून शांत झोप ज्याला लागते तो मनुष्य ( आरोग्य चांगलं राहिल्यामुळे) सुखी होतो असा असावा.

सुखी माणूस तो ज्याला पडल्या पडल्या शांत झोप लागते आणि संडासला गेल्या गेल्या पोट लगेच साफ होते. बाकी सगळी मोहमाया.

आयुष्यात झोपेमुळे वेळ वाया जातो हे अतिशय चुकीचे विधान आहे. झोप फार आवश्यक आहे. इच्छुकांनी Why We Sleep: Unlocking the Power of Sleep and Dreams by Matthew Walker हे पुस्तक जरूर वाचावे, अशी शिफारस करीन.

मलाही सकाळी झोपून उठल्यावरच समजले >> Lol

याचा अर्थ सुखी मनुष्याला शांत झोप लागते असा नसून शांत झोप ज्याला लागते तो मनुष्य ( आरोग्य चांगलं राहिल्यामुळे) सुखी होतो असा असावा. >> +१.

वावे, हपा,
मला नाही वाटत त्या वाक्याचा संबंध शारीरिक आरोग्याशी असावा.
शांत झोप येणे म्हणजे चिंतामुक्त असण्याचे लक्षण.. म्हणजे सुखी माणूस.. अश्याच अर्थाने ते म्हटले जात असावे.

अर्थात त्या वाक्याचा संबंध असला नसला तरी झोपेचा संबंध आरोग्याशी आहे हे मात्र मान्य.
पण त्यातही किमान किती झोप गरजेची हे व्यक्तीनुसार बदलत असावे.

माझी स्वतःची झोप फार कमी आहे. आणि मला ती ऍक्च्युली पुरते.
पण मला एक आजार आहे. जेव्हा तो उचल खातो तेव्हा लोकं पहिले नाव माझ्या कमी झोपायच्या सवयीला ठेवतात. पण तो त्यामुळे बळावत नाही हे माझे मला कळते.
माझ्या वडिलांची झोप सुद्धा फारच कमी आहे. आणि याचा त्यांना कधीच काहीच त्रास झाला नाही.
त्यामुळे कमी झोप ही एखाद्याला पुरते यावर माझा विश्वास आहे.

खालील किश्यावर विश्वास बसला नाही तरी ऐका,
माझी एक गर्लफ्रेंड होती जी अमेरिकेत राहायची. माझी रात्र तर तिचा दिवस आणि व्हायसे वर्सा.. मी माझ्या रात्री फक्त चार तास झोपून तिच्याशी गप्पा मारायचो. तर ती मात्र दहा तासांची ब्युटी स्लीप घ्यायची. हा तिचाच शब्द. जास्त झोपल्याने सौंदर्य वाढते म्हणायची. मला कमी झोप पुरायची तसे सर्वांनाच ते शक्य नाही हे तेव्हा मला कळायचे नाही. मी एकटाच जागतो आणि ती आरामात झोपते हे मला अन्यायकारक वाटून त्यावर वाद होऊन आमचे रिलेशन तुटले. पुढे जाऊन अक्कल आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता Happy

आयुष्यात झोपेमुळे वेळ वाया जातो हे अतिशय चुकीचे विधान आहे.
>>>>

अहो ते माझे विधान किंवा माझा दावा नाहीये. तर मला तसे वाटते असे म्हटले आहे. माझी मानसिकता दर्शवली आहे.
जसे आंघोळीची वेळ सुद्धा मला फुकट जाते असे वाटते. कारण आंघोळ करता करता दुसरे काही करता येत नाही. पण रोजच्या आंघोळीचे महत्व मला माहीत आहेच.
तसेच रोजचा बस, ट्रेनचा प्रवास, तो ही जास्त नसावा असे वाटते. अन्यथा ती सुद्धा आयुष्यातील फुकट गेलेली वेळ वाटते. पण तो प्रवास कमी करणे हे मात्र आपल्या हातात असते. यावर हवे तर वेगळा धागा काढूया.

ओके ऋन्मेऽऽष. बाकी <<झोप ही नेहमी लहान मुलांसारखी आली पाहिजे.. शांत, निवांत, चिंतामुक्त.. >> हे पटलं.