काव्यलेखन

पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 July, 2012 - 10:48

आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !

सोबतीने तू तुझ्या घेवून जा ना...
आठवे छळतात ही तीन्ही-त्रिकाळी !

कोरडे ठेवू कसे डोळे असे मी..
रात्र का सरते सख्याविण पावसाळी ?

शोधण्यामध्येच सारा जन्म जातो...
चार दिन नात्यातली टिकते नव्हाळी

'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
वाहतो तो ओंडका, तगती लव्हाळी !

-सुप्रिया.

हट्ट

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 July, 2012 - 08:55

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

पाऊस आला पाऊस आला

Submitted by पुरंदरे शशांक on 24 July, 2012 - 05:53

(शाळेत जी एक विशिष्ट चाल लावून आपण ब-याच कविता म्हणायचो - त्याच चालीत लिहायचा प्रयत्न केलाय.... बघा जमलीये का ती चाल...... 'श्रावणमासी हर्ष मानसी' ची चाल)

सूं सूं सूं सूं वारा वाहे झाडांची पाने हलवी
कागद, पाने, धूळ घेऊनी उंच उंच त्यांना उडवी

धडधडधडधड कानी आली ढगात दंगा कोण करी
लख्लख लख्लख वीज चमकली कोण करे मारामारी

सरसर सरसर धावत आली सर मोठी माझ्या दारी
टप टप टप टप थेंब टपोरे खेळती हे टिपरी टिपरी

खळखळ खळखळ पाणी वाहे अंगणात, रस्त्यामधुनी
चहासारखा रंग ओतला त्यात कळेना आज कुणी

तळे साचले अंगणात हे होड्या सोडू चला चला

शुभं करोतीss

Submitted by दाद on 20 July, 2012 - 01:49

टळटळत्या उन्हानं व्यायली सांज
सावल्यांच्या भरल्या गावात पोरकी होते तेव्हा...
हुरहुरते डोळे पुन्हा पुन्हा चतकोर प्रश्नं होतात, काळोख्या तिठ्यावर..
चवचाल, माणसाळल्या वाटाही
भिऊन वळतात...
त्याच त्या तिठ्यावर, कुणी काळोखशिवली जाणती वात
रोज मिणमिणते.. ’शुंभं करोती...’

म्हणुनच कदाचित माझ्या हिम-शुभ्रं स्वप्नांवर ओरखडाही नाही...
का... ती बहिरी आहेत?
-- शलाका

मुंगळा डोंगळा...

Submitted by पुरंदरे शशांक on 16 July, 2012 - 23:15

मुंगळा डोंगळा कित्ती कित्ती काळा
भर्भर घरभर कुठे बाबा चाल्ला ?

काटकीसारखे पाय तुझे कित्ती कित्ती नाजुकसे
एवढे सारखे चालून चालून दुखत नाहीत ते कसे?

इकडेतिकडे बघतोस काय, खाऊ हवा केव्हढा ?
बारीकसा कण जरी ओढतोस जणू रणगाडा

कधी कसा शिस्तीत रांगेत बरा अस्तोस
आज कसा एकटाच घरभर उनाडतोस

भांडलास वाटंत मित्रांशी, गट्टी फू त्यांच्याशी ??
घेऊन जा साखरदाणे, कर बट्टी दोस्तांशी .......

शब्दखुणा: 

व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल मराठी कविता

Submitted by चिंतातुर जंतू on 12 July, 2012 - 04:23

एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :

  1. कविता छापील स्वरूपात (पुस्तक/नियतकालिक/अनियतकालिक) पूर्वप्रकाशित असावी.
  2. कविता मराठीत असावी.
  3. कवी किमान नावाजलेला असावा.
  4. कवितेत एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं (म्हणजे चित्र, शिल्प, छायाचित्र, चित्रपटातलं दृश्य वगैरे) वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.

''श्यामली'' यांचे अभिनंदन

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 9 July, 2012 - 07:01

मायबोलीवरील कवयित्री,गझलकार श्यामली उर्फ'' कामिनी फडणीस-केंभावी'' यांच्या ''चांदणशेला'' या अल्बुमबाबत गौरवोद्गार असलेला लेख लोकसत्तेच्या कालच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.... श्यामली यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून अनेक उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो हीच सदिच्छा.

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२

चिव चिव चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2012 - 01:32

चिव चिव चिमणी

चिव चिव चिमणी गाते गान
मजेत नाचत छानच छान

पंख छोटेसे हलवून
दाणे टिपते वाकून वाकून

चिऊतै चिऊतै अशाच या
दाणे खा, पाणी प्या

चिवचिव चिवचिव चिवचिवाट
रोज पाहू तुमची वाट...

शब्दखुणा: 

गीत जन्मले काव्यामधुनी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आजपर्यंत गाण्यांवर जे लेख लिहिले ते सहज चाळताना लक्षात आलं की सगळे हिंदी चित्रपट संगीतावर लिहिले. असं कसं झालं? मराठी गाण्यांवरचं प्रेम खरं तर हिंदी गाण्यांपेक्षा जुनं! गदिमा, शांताबाई शेळके, पाडगांवकर, जगदीश खेबुडकर, पी. सांवळाराम या आणि अशा अनेक कवींच्या रचनांमधूनच लहानपण, तारुण्य, आता मध्यमवय सगळं उमजायला मदत झाली. आयुष्यातले सगळे बरे-वाईट अनुभव माझ्या वाट्याला येण्यापुर्वीच त्यांना या गीतकारांनी कागदावर मांडले. या एकेका गीतकारावर एक लेख लिहून पुरणार नाही इतकं अफाट आणि दर्जेदार काम त्यांनी करुन ठेवलं आहे. पण तरी मराठी गाण्यांवर काहीच लिहू नये मी?

प्रकार: 

रेषा

Submitted by विनायक उजळंबे on 26 June, 2012 - 06:17

माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..
आधी नव्हता असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!

तुझ्या ओठांवर ..त्या
खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू दात चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला ही नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!

तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन