व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल मराठी कविता

Submitted by चिंतातुर जंतू on 12 July, 2012 - 04:23

एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :

  1. कविता छापील स्वरूपात (पुस्तक/नियतकालिक/अनियतकालिक) पूर्वप्रकाशित असावी.
  2. कविता मराठीत असावी.
  3. कवी किमान नावाजलेला असावा.
  4. कवितेत एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं (म्हणजे चित्र, शिल्प, छायाचित्र, चित्रपटातलं दृश्य वगैरे) वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.
  5. कवितेत ज्याचं वर्णन आहे ती दृश्य प्रतिमा प्रत्यक्षात अस्तित्वात असायलाच हवी अशी अट नाही. एखादं काल्पनिक चित्र, शिल्प, छायाचित्र वगैरे दृश्य प्रतिमा यांचं पद्यात वर्णन असलेलं चालेल.

संतसाहित्यात विठोबाच्या दृश्यरूपाविषयी असं काव्य झाल्याचे पुष्कळ दाखले आहेत. उदाहरणादाखल : 'पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती' (ज्ञानेश्वर) किंवा 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा' (तुकाराम). पण इथे देवाच्या मूर्तीपेक्षा माणसाच्या दृश्य प्रतिमेचं पद्यात आलेलं वर्णन अभिप्रेत आहे. उदाहरणादाखल - 'अरुण कोलटकर यांच्या 'भिजकी वही' या काव्यसंग्रहात अशा काही कवितांचे संच आहेत. त्यांपैकी एक संच हा पिकासोच्या चित्रांविषयी आहे. पिकासोनं आपली प्रेयसी डोरा मार हिला चित्रविषय बनवून काढलेली काही चित्रं हा या संचाचा विषय आहे. तर व्हिएतनाम युद्धाच्या काळात गाजलेल्या एका छायाचित्रातली किम ही मुलगी (नापाम बॉम्बहल्ला - http://upload.wikimedia.org/wikipedia/en/d/d4/TrangBang.jpg) हा याच संग्रहातल्या आणखी काही कवितांचा विषय आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौमित्रच्या 'आणि तरीही मी'मधे व्हिन्सेन्ट (व्हॅन गो)च्या कविता आहेत.
ना. धों. महानोरांच्या अजिंठ्यात तिथल्या शिल्पांची वर्णनं तसंच व्यक्तिचित्रणं (मे. गिल आणि पारो(?))ही आहेत.
'विशाखा'त कुसुमाग्रजांची सैगलवर कविता आहे. (गायकीबद्दल आहे, 'दृश्य' रंगरूपावर नाही.)
त्यातच 'टिळकांच्या पुतळ्याजवळ' कवितेत पुतळ्याच्या दृश्य स्वरूपाबद्दल उल्लेख आहे.
भा. रा. तांब्यांच्या झाशीच्या राणीवरील कवितेत (घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगि तलवार इ.) दृश्य स्वरूपाबद्दल उल्लेख आहेत.

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

हे गणपतवाणी मधून

जुनं काहीतरी आठवतंय...
'बाल शिवाजी'- नाकेला अन गुल्जार सावळा नी सुंदर भासे कसल्याश्या करून बेता मधमधून किंचित हासे..(साधुदास)
'सावळ्या तांडेल' व्यक्तिचित्रण आहे कवि नाही आठवत शेवटचं कडवंच आठवतंय-'आहेस इमानी माझा चेला खरा चल इनाम घे हा माझा शेला तुला पण बोल सावळ्या बोल पुनः एकदा-खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राईराईएवढ्या..'

नंतर बहुधा लोककवी मनमोहनांची 'जिऊ;- येता सुदिन सणांचा पुतळ्यांची माळ ती गळा घाली, तेव्हा शृंगाराच्या माहित नव्हत्या नव्या तर्‍हा चाली.. जाई आईसंगे मळ्यात किंवा खळ्यात ती कन्या साधी निसर्गसुंदर दिसे तदा देवता जणो वन्या..'

करंदीकरांची अजरामर 'धोंड्या न्हावी' मुक्तःछंद म्हणून पटकन ओळी आठवत नाहीत..

बापटांची 'सकीना'- सैल लहंगा बिलगे अंगा फुलवेलांची वर नक्षी..'

अशा काही.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. एक किंचित स्पष्टीकरण - कविता निव्वळ व्यक्तीबद्दल नाही, तर तिच्या विशिष्ट दृश्य प्रतिमेबद्दल असायला हवी. म्हणजे एखादं चित्र किंवा शिल्प किंवा छायाचित्र यांचं वर्णन हवं. त्यामुळे कवीनं प्रत्यक्षात पाहिलेल्या किंवा कल्पलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी कवितेत वर्णन असेल, तर ते पुरेसं नाही. कुसुमाग्रजांची 'टिळकांच्या पुतळ्याजवळ' ही चौपाटीवरच्या पुतळ्याविषयी सांगते म्हणून ती या निकषांत बसते. पण 'थांब उद्याचे माउली' ही बहुधा मर्ढेकरांनी पाहिलेल्या कुण्या स्त्रीचं वर्णन आहे त्यामुळे ती या निकषांत बसत नाही.

आणखी एक कविता - गुरुदत्त मेल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती त्यासोबत आलेल्या गुरुदत्तच्या छायाचित्रावरून दिलीप चित्रे यांनी 'टाईम्सच्या पहिल्या पानावर आढळतो गुरुदत्त मेलेला' अशी कविता लिहिली होती.

आणखी कविता आठवल्या तर नक्की सांगा.