रेषा

Submitted by विनायक उजळंबे on 26 June, 2012 - 06:17

माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..
आधी नव्हता असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!

तुझ्या ओठांवर ..त्या
खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू दात चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला ही नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!

तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!

काल तुझा नवरा भेटला होता
अस्वस्थ ,सैर-भैर काही शोधत होता ..
कपाळावर आठी होती,
का कुणास ठाऊक ..
का कुणास ठाऊक?
मला ती आठी ओळखीची वाटली ..
खरं तर त्या आठी ने ओळख दिली त्याची ..
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!

विनायक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!>>>
अरे!मग तुम्ही वाचलातकी,तो डाग नेमका तुमच्या आयुष्य रेषेवर आहे म्हणे!
आवडली.

अरे वा!..आजच सकाळी मी पण असल्याच विषयावर याच शीर्षकाची कविता केलीय फेसबुकवर. छान.

कविता उत्तम आहे मात्र 'आठी' थोडी अवघड वाटली. आईच्या कपाळावरची आठी व प्रियेच्या पतीच्या कपाळावरची आठी यांची विनाकारण सरमिसळ होते.

उमेशजी: आपली कविता कशी शोधावी?