चैतन्य

याचक

Submitted by पुरंदरे शशांक on 6 October, 2019 - 22:47

याचक

हिरव्या रानातून बहरसी
वृक्षलता होऊनी डोलसी
रंगबिरंगी फुलाफुलातुनी
तूच विलसशी धरा होऊनी

शुभ्र हिमाच्या शिखरामधूनी
कडे कपार्‍या खोल दर्‍यातुनी
कुरणे गवतांची लसलसती
तूच नटसी हे रुप घेऊनी

अथांगशी मरुभूमी असो का
लाटा गंभीर सागरात का
चराचरात चैतन्य जागता
तूच प्रकृती जगती होऊनी

नानाविध रुपांनी सजूनी
भाव भावना अगणित खाणी
सरे वर्णना थकली वाणी
याचक मी तर तुझ्या अंगणी

रंगगर्भ...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 24 February, 2017 - 06:08

सावळ त्याचा रंग घनासम ।
गोरी मी संगमरवरी ।
बाह्याकारी तो आकर्षक
मी साधीशी व्रजनारी ।।
त्याचे कुंतल काळे कुरळे
माझी लांब सरळ वेणी ।
कुंदकळ्या हास्यातुन माझ्या
त्याच्या मोत्यांच्या श्रेणी।
माझ्या डोळा भाव भाबडा
गहन डोह त्याच्या डोळा ।
मी चवथीची कोर, चंद्र तो
उधळी सोळा सर्व कळा ।
कदंब तो तर सदाहरितसा
मी जल यमुनेचे काळे ।
तो माझी ओढणी कुसुंबी
मी त्याचे अंबर पिवळे ।।
त्याचे माझे नाजुक नाते
निळे जांभळे मोरपिशी ।
रंगगर्भ श्रीरंग तसा तो
आणिक मी रंगार्त अशी ।।

मागणे .

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 April, 2013 - 01:13

दयायचेच असेल तर
तुझे वेड मला दे
ज्ञानदेव चैतन्याची
जिथे पाऊले पडली
त्या वाटेची माती
या माथ्याला लागु दे
नाथ नामदेवांनी
जसे तुला जाणले
त्या युक्तीचे प्रेमाचे
दान फक्त मला दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

हट्ट

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 July, 2012 - 08:55

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

सुचते काही

Submitted by चैतन्य दीक्षित on 13 November, 2010 - 05:00

सुचते काही, अनाम दुःखाहून खोलसे,
परंतु लिहितो सगळ्यांना जे रुचते-पटते।
इमान नाही दुःखांशीही, शब्दांशीही,
इमान माझे उरले नाही माझ्याशीही ।

कुठे तळाशी मनात आता, अतीव निश्चल
सुचलेली ती अनाम दुःखे, शब्द तयांचे...
वरवर असते रिमझिम कविता, अतीव चंचल,
आवडते जी सगळ्यांना, अन् शब्द तिचेही ।

ह्यांच्या मध्ये बोथटलेली जाणिव माझी-
-गोठुन असते, युगायुगांच्या अंधारासम !
वागवते ती ओझे केवळ त्या कवितांचे,
जपते बहुदा त्या दुःखांचा अनाम ठेवा ।

गुलमोहर: 

सायली...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 4 November, 2010 - 02:00

सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
गुंफुनी गजर्‍यात अन् वेणीत त्या माळू कसा रे?

मान्य आहे, ती तशी नाजूक आहे, पण तरीही,
तो फुलांचा अन् लतेचा बंध मी मोडू कसा रे?

टोचता तुम्हा सुईने यातना होतील ज्या,
त्या व्यथा माळून मी, प्रेमास त्या घेऊ कसा रे?

गुंफुनी दोर्‍यात किंवा लावुनी गळफास तुम्हा,
रेशमी केसांत जो ये, गंध तो घेऊ कसा रे?

माळता गजरा, कदाचित चुंबने देईल ती,
देउनी मृत्यू तुम्हाला, अमृता प्राशू कसा रे?
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?

- चैतन्य

गुलमोहर: 
Subscribe to RSS - चैतन्य